रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती ‘इनसाईड मॅडेलाइन’ वाचत पडलीय. छकुलीचापण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रूममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापूर्वीच तिचे मिस्टर दूर कुठेतरी दोन दिवसांच्या ऑफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करून ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करून घेतली.
दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागून राहलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणून बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती.
तेवढ्यात बेल वाजली. दार उघडून तिने त्याला लगबगीने आत घेतलं. आज त्यानं चक्क बियरचं आणलीये. गेल्या वेळीस म्हटला होता तसचं. तिनंही तशी इच्छा दर्शविली होती. त्या चवीत आज तिलाही धुंद व्हायचं होतं.
“तुझा हजबंड गेलाय ना नक्की टुरवर, नाहीतर मधूनच परतायचा?” टीव्ही ऑन करून बेडवर बसत त्यानं विचारलं.
“ट्रॅव्हल भेटलीये त्याला, आता दोन दिवस तरी नाहीये. फोन केला होता.” त्यानं आणलेली बियर ग्लासमध्ये ओतत तिनं उत्तर दिलं.
“आणि तुझी ती मुलगी, छकुली?”
“तिलाही झोपवलयं.”
कधीही आला तर त्याचे हे सुरवातीचे प्रश्न ठरलेले. मुद्दाम विचारल्यासारखे. या प्रश्नांनीच त्याला चेव फुटायचा.
हल्ली तो नेहमीच यायला लागलाय. त्याचे प्रश्नही नेहमीचेच झाले होते. हा व्यभिचारही ठरवून केल्यासारखा वाटत होता. ‘आता यातही नीरसपणा आलाय का?’ तिनं स्वतः लाच विचारलं. पण चेंज म्हणून त्याने आज बियर आणली होती.
“ए आज तू घेतलीच पाहिजे, थोडीशीच, बघ ट्राय करून.” कमरेत हात घालत त्यानं तिला जवळ ओढलं.
तिनंही लटकं ‘नको नको’ करत थोडीशी घेतलीच. थोडी थोडी करत अर्धा ग्लास संपवला.
“मस्त आहे रे हे, पण चव नाही आवडली.” छताकडं उत्तान बघत ती म्हणाली.
ही नशा काही वेगळीच होती. राहलेली त्यानं संपवली.
“मग आज काय ट्राय करायचं?”
तिला असले प्रश्न आवडायचेच नाहीत. केवळ अबोल प्रणय. तिला हवाहवासा. शब्दांवाचून सगळं त्याला कळलं पाहिजे. त्याच्या कुशीत ती तशीच झेपावली.
या रात्रीचा कैफ काही औरच होता. अंगभर रोमांच पसरलेले. ऊन्माद ठासून भरलेला. आज त्याला ती वेगळीच वाटली. ज्वानीच्या आगीत बहरून गेल्यासारखी. एखाद्या नववधूसारखी आज ती हुंकारत होती. तोही अगदी कसलेल्या कलाकारासारखा तिला सुखावत राहिला.
आसुससलेली ती, उत्तुंग तो, उधानलेला प्रणय आणि ही व्याभिच्यारी रात्र. या रात्रीचा क्षणनी क्षण उपभोगला गेला. धुंद प्रीतीचं गीत गातच ही रात्र सरली.
सकाळी तो उशिरापर्यंत बेडरूम मध्येच पडून राहिला. तिनंही लवकर उठून सगळं आवरलेलं. छकुली उठायची वेळ झालीय, आता याला लवकर जायला सांगायला हवं. ती बेडरूममध्ये गेली. त्याला उठवायचा प्रयत्न केला. तोही डोळे चोळत चोळत जागा झाला.
दरवाजा उघडाच होता. आतली चाहुल लागून छकुली पळत पळतच बेडरूममध्ये शिरली. त्याला बघून ती गोंधळली. दोन हात पुढे करत त्याच्या पोटावर पडली. त्याचे गालगुच्चे घेत आश्चर्यानं म्हणाली,
“अरे पप्पा, तू गेलाच नाही का टुरवर? मज्जा! आज आपण वॉटरपार्कला जाऊया, पिकनिक करायला.”