डॉक्टर म्हणाले, “गावकऱ्यांचा कॉल आल्यानंतर मी इथे आलो. तू बेशुद्ध अवस्थेत होतास. गावकऱ्यांनी मला पूर्वकल्पना दिल्यामुळे मी ॲम्बुलन्स आणि माझे काही साथीदार घेऊन आलो. जेव्हा जंगलात तिघांच्या देखील डेडबॉडीज मिळाल्या तेव्हा मी घरात तपास केला. घराची झडती घेतल्यानंतर तुमच्या घरातला नोकर, म्हणजे टिण्याच्या खोलीमध्ये मला अझलानच सगळं सामान सापडल. पासपोर्टमुळे मला ओळख पटली.”
“त्या सामानाबरोबर तुझ्या आणि पवनच्या काही वस्तू आणि काही रोख रक्कम देखील त्याच्या खोलीत सापडली. तसेच त्याच्या खोली जादूटोणा करण्याचं सामान आणि दिवाणखान्यात असेच जादूटोण्याचे सामान सापडलं होत. असं काही करून टिन्या तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, असा माझा अंदाज आहे. आणि जेव्हा त्याच पितळ उघड पडायला आल्यानंतर त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने तुझ्यावर हल्ला केला तेव्हा पवन तुला वाचवायला आला. त्याच झटापटीत पवन आणि त्याचा मृत्यू झाला.”
“हो मी एकटाच होतो घरात आणि अचानक सगळे दिवे विझले. पण अझलानचं प्रेत जंगलात कसं सापडलं? तो इथे नव्हता.” सुबोधने विचारलं.
“खरंतर टिन्याने सर्वात पहिला त्याच्यावर हल्ला केला. अझलानवर सर्वात पहिला हल्ला करून त्याच सगळं सामान आपल्या खोलीत लपवून ठेवल आणि अझलानला देखील कुठेतरी गायब केलं. जंगलातच त्याला जखमी करून ठेवलं असावं. अचानक अझलान गायब झाला असा संशय येऊ नये म्हणून तो पवनला मेसेज करत राहिला. त्याच्याकडे अझलानचा मोबाईल सापडला आहे.”
“म्हणून टिण्या आणि अझलान त्या सकाळी मला दिसले नव्हते.” सुबोध बडबडला. “त्याचा साथीदार कोण?”
“रघु! टीण्याची अशी अवस्था बघून रघुने हंबरडा फोडला होता. त्याला सोडाव अशी विनंती तो पोलिसांना करत होता. त्याला संशयीत म्हणून पोलीस घेऊन चालले होते. पण तो ‘मी निर्दोष आहे मी काहीही केलं नाही तिने नही काही केलं नाही तुम्ही नीट तपास करा ती दोन पत्र तिथेच त्याच घरात असतील’ असं काहीबाही बडबडत होता.”
सुबोध शांत बसला होता. “हे सगळं खरं नाही असू शकत.” तो म्हणाला.
“हे बघ स्वतःला त्रास नको करून घेऊ! माझ्या मित्राचा मुलगा आहेस. तू मला माझ्या मुला सारखा आहेस! मी नेहमी तुझ्या मदतीला असेन. काही दिवसातच आता तुझ्या आई-बाबांना जाऊन एक वर्ष होईल. त्यात पवनपण वारला. तू इथे नको राहुस माझ्याबरोबर माझ्या घरी चल! तिथे तुला काही ही कमी पडणार नाही.”
“नाही मी इथेच राहणार आहे.” सुबोध संथपणे म्हणाला.”पवनच घर आहे हे आणि मी ते सोडून जाणार नाही.”
“पण एवढ्या मोठ्या घरात तू एकटा कसा राहणार.” डॉक्टरांनी विचारले.
“मला काही वेळ राहू द्या इथे” सुबोध म्हणाला.
“तुला जस योग्य वाटेल मी येत जाईल अधून मधून”
संध्याकाळ झाली. सुबोध दिवाणखान्यात बसला होता. समोर शेकोटी पेटली होती. त्याच्या मांडीवर एक पत्र्याची पेटी होती. त्यात त्याच्या काही आठवणी, डायरी, फोटो, पत्र वैगरे होत. अजून काही खास गोष्टी देखील होत्या. शेकोटीची ऊब त्याच्या शरीराला लागत होती. पेटीतील एक एक वस्तू बाहेर काढून तो आपल्या आठवणी जाग्या करत होता. आता याच आठवणी सोबतच त्याने एकट जगायचा निर्णय घेतला होता.
संध्याकाळ झाली. सुबोध दिवाणखान्यात बसला होता. समोर शेकोटी पेटली होती. त्याच्या मांडीवर एक पत्र्याची पेटी होती. त्यात त्याच्या काही आठवणी, डायरी, फोटो, पत्र वैगरे होत. अजून काही खास गोष्टी देखील होत्या. शेकोटीची ऊब त्याच्या शरीराला लागत होती. पेटीतील एक एक वस्तू बाहेर काढून तो आपल्या आठवणी जाग्या करत होता. आता याच आठवणी सोबतच त्याने एकट जगायचा निर्णय घेतला होता.
पेटी उघडून त्याने पवनचा फोटो बाहेर काढला. एक नजर त्यावर पडताच त्याचे अश्रू अनावर झाले. त्याने तो फोटो बाजूला ठेवला. आपली डायरी उघडली आणि एक पत्र काढलं त्यातून. ते त्याच पत्र नव्हतं, ना त्याला कोणी ते लिहलं होत. पुढे वाकून त्याने ते पत्र शेकोटीच्या अर्धवट जळलेल्या लाकडावर टाकलं. त्या लाकडाच्या न जळलेल्या भागावर ते पत्र पडलं आणि तो ते पत्र वाचू लागला.
टिण्या,
मी घरी आलेलं पवनला आवडणार नाही. म्हणून हे पत्र लिहून पाठवतोय. तुझ्यापर्यंत ते बरोबररित्या पोहचेल. तू मला पवनने दरवाजा उघडल्याचं सांगितलं आणि त्याच बरोबर सुबोधचीपण तब्येत खालीवर झाल्याचं बोलास. म्हणून मी त्याच्या घरला गेलो. माझी काही पवनशी दुश्मनी नाही. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पर स्वतःच्या अहंकारात बुडालेला तो मला खूप वाईट साईट बोलला. मी ही नकळत त्याला काहीबाही बोललो. पण नंतर मला त्या बेचाऱ्या पोराचा चेहरा राहून राहून समोर येऊ लागला. सुबोध. ऐन जवानीत असा खुर्चीवर बसून राहिलेल्या त्या निष्पाप पोराचं काही वाईट होऊ नये म्हणून मी मागच सगळं विसरलो.
दूर एका गावात गेलो. एक ओळखीचा मांत्रिक होता. त्याच्याकडून एका विधीच समान घेतलं. त्याचे मंत्र आणि तो विधी कसा करायचा हे सगळं दुसऱ्या पत्रात आहे बघ.
पण हा विधी फक्त आणि फक्त रात्री करायचा आहे. कोणाच्याही नजरेत न पडता. जमल्यास तोंड झाकून घे. त्यासाठी तुला पूर्ण दिवसरात्र त्या घरात थांबव लागेल. काही विधी घरात झाल्या नंतर शेवटचा विधी हा जंगलात करायचा आहे. मला खात्री आहे पवन आणि सुबोधचा शत्रू तिथेच असेल. त्यांच्याच ओळखीतला, त्यांच्याच जवळचा कोणी तरी त्याच्या विरोधात कट कारस्थान रचतोय अस मला माझं मन संकेत देतंय.
पवन कितीही उलट बोलला, वाईट म्हणला तरी ही तू माझ्यासाठी हे कर. काहीही झालं तरी तो मालक आहे. त्याच्यामुळे आपल्या घरची चूल पेटती आहे हे लक्षात ठेव. मी बरोबर एक फोनपण पाठवत आहे काही लागलं तर फोन कर.
सुबोध दुसऱ्या पत्रावरून नजर फिरवु लागला. त्याला ते वाचण्यात काही रस नव्हता. कारण त्यावर फक्त काही मंत्र लिहलं होते. काही लिंबू धागे… ज्यासाठी विधी करायचा आहे त्या व्यक्तीच सामान… घर भर रात्रीच्या वेळी फिरून भुकटी पसरवणे… असे काही शब्द होते ते. सुबोधने चोळामोळा करत ते पत्र शेकोटीमध्ये फेकून दिलं.
लाकडाची आग खाली सरकली. पत्र जळून गेलं. टिन्या निर्दोष असल्याचा पुरावा जाळून गेला.
आता सुबोधने पेटीतून एक वस्तू बाहेर काढली. तिच्याकडे बघून तो हसत हसत उभा राहिला. चालत शेकोटीच्या जवळ जाऊन वाकून बसला. ती वस्तू त्याने डोळ्या समोर धरली आणि म्हणाला,
“सॉरी पवन, सॉरी अझलान आणि रिअली सॉरी टिन्या.”
एवढं बोलून त्याने तीक्ष्ण, लांब, टोकदार, अणकुचीदार आणि रक्ताने माखलेल ते लाकूड पेटत्या शेकोटीमध्ये फेकून दिलं. शेकोटीमध्ये धूर झाला. घरभर विचित्र वास आणि धूर पसरला.