अखिलेशची चिडचिड झाली की अरूंधती संभाषण पुढे नेत नसे. बारा वर्ष ती त्याच्या आवडी निवडी संभाळत होती. तसा बघायला गेलं तर नवर्या बायकोचा संसार म्हणजे एक संघर्षच असतो. ‘तो’ आणि ‘ती’चा संघर्ष. कधी त्याची जीत असते तर तिची जीत. पण इथे जीत मात्र सदैव त्याचीच होती. म्हणजे तो काही एवढा विचारी किंवा हुशार नव्हता. पण तो ‘तो’ होता ना! तेवढंच जीत व्हायला पुरेसं होतं. ‘तो’ असणं हाच खरा त्याचा प्लस पॉईंट होता. मतभेद झाले, निर्णय चुकले तरी सदैव ‘तो’च बरोबर. कारण त्याचं स्टेटस होतं. ‘तो’ म्हणजे बोटांचा V घेऊन जन्माला आलेला. सगळं त्याच्या मुठीत. साधा सिनेमाचा जायचा विषय घ्या ना; तिला तिचा आवडता सिनेमा कधीच पाहता आला नाही. कारण तिला आवडायचे रोमँटिक सिनेमेे. ते त्याला अगदी संथ आणि रटाळ वाटायचे. मग ह्यात सुद्धा जीत सदैव त्याचीच व्हायची. कधी जोरात बोलणं नाही. कधी ओरडणं नाही. सदैव अर्जवी शब्दात बोलणार. अरूंधतिच्या ह्या स्वभावाला सुद्धा कारण होते. ते म्हणजे तिला वाटणारी असुरक्षितता. लहानपणीच तिचे आईवडील तिला सोडून गेले होते. नातेवाईकांनी तिची जबाबदारी स्वीकारायचे टाळले. आजीने मोठ्या मुश्कलीने तिला लहानाची मोठी केली. अरूंधती लहानपणापासूनच हुशार होती. बेताच्या परिस्थितीमध्ये तिने आपले मानसशास्त्रात शिक्षण पुर्ण केले. लग्नानंतर दोन महिन्यातच तिच्या जवळ असणारी आजी तिला सोडून गेली. त्यानंतर अरूंधतीने आपले अस्तित्व जपण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाही. नवर्याला आणि त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त प्रेम देण्यातच आपले सुख मानले.
अखिलेशने सुरवातीपासून तिच्यावर ताबा मिळवला होता. ती आपली त्याच्या आनंदातच आनंद शोधायची. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या सौन्दर्याला पाहून तो घायाळ झाला होता. पण त्या रात्रीचा शृंगार त्यांचा एकतर्फी झाला. आणि नंतर तो कधी व्यवस्थित फुललाचा नाही. तिच्या इच्छेला, मताला, विचारांना कधीच स्थान मिळाले नव्हते. त्याचमुळेच तिने कधीच पुढाकार घेतला नाही. नंतर एकतर्फी शृंगार सुद्धा कालांतराने त्यांच्या आयुष्यातून नाहीसा झाला.
काही महिन्यापूर्वीच अरूंधतीला तिच्या स्वप्नात ‘तो’ भेटला. पण हा ‘तो’ त्या ‘तो’पेक्षा खूप वेगळा होता. तिचा स्वप्नरूपी प्रियकर. त्याची यायची वेळ झाली होती. अखिलेश पण लॅपटॉप बंद करून झोपायाच्या तयारीत होता. अरूंधती बेडवर आडवी झाली. एकाच बेडवर झोपून सुद्धा नवरा- बायकोमध्ये दुरावा आला होता. अरूंधतीने डोळे मिटून घेतले. क्षणातच ती झोपेच्या आहारी गेली.
अरूंधतिच्या स्वप्नाचे दार उघडले. तिने दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. समोर तिला हिरव्या रंगाचा टुमदार कौलारू बंगला दिसला. अंगणात हिरवळ. कंपाउंडला रंगीत फुलांच्या गुच्छानी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच वृक्षांची रांग. मधून जाणारी छोटीशी पायवाट. अरूंधती त्या वाटेने चालत चालत पुढे गेली. फाटका- जवळ जाताच तिने आजूबाजूला पाहिले. तिला कोणीच दिसले नाही. फाटक उघडून तिने बंगल्यात प्रवेश केला. ती आता बेचैन होऊ लागली. बंगल्याच्या सर्व खोल्या तिने उघडून पहिल्या. तो कुठेच नव्हता. नेहमी तो स्वतःहून यायचा आणि तिला मिठीत घ्यायचा. पण त्याचा आज कुठेच पायरव नव्हता. कुठे गेला हा नक्की!! भेटायचे नव्हते तर मला तरी कशाला बोलवले. हाक मारून बघायचे का??? पण त्याने आपल्याला नावच सांगितले नाही तरी हाक तरी कशी मारणार!!
“ये… हेलो… कुठे आहेस तू… मी आले आहे, प्लिज तू पण ये ना!! नको ना असा छळूस रे… ये ना प्लिज.
अरूंधतीची झोपेतच मिटलेल्या पापण्यातील डोळ्याची बुबळे इतरत्र फिरत होती. शरीर कंप पाऊ लागले होते. कपाळातल्या घामाचा थेंब सरकत मानेच्या दिशेने जात होता. पण त्याचवेळी तिच्या पायाजवळ एक हालचाल झाली. तिच्या पायावरून गाऊन दुमडत वर येत होता. तिचे पाय उघडे पडले. संथ गतीने गाऊनचा कपडा वर खेचला गेला. तिच्या नग्न गोर्या पोटर्याना मागे टाकत गाऊन वर वर सरकत होता.
अरूंधतीने बंगल्याच्या फाटकातून बाहेर पडली. तिची नजर त्याला इकडे तिकडे शोधत होती.
“असा कसा अचानक तू गायब झाला रे, मला पण तुझ्यासोबत राहायचंय. प्लिज येऊन मला घेऊन जा ना”
अरूंधती स्वप्नामध्ये गुंग झाली होती. आपल्याबरोबर काय घडतंय तिला काहीच कल्पना नव्हती. गाऊनचा कपडा तिचे गुडघे ओलांडून आणखी वर आला होता. तिच्या भरगच्च मांड्याचे प्रतिबिंब वर फिरणार्या पंख्याच्या पात्यांमध्ये गर्र गर्र फिरत होते. गार गार वार्याची झूळूक मांड्याना लागून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अरूंधतीने खाडकन डोळे उघडले. तिची पहली नजर खाली गेली. तिचा गाऊन तिला स्वयंचलितपणे मांड्यापर्यंत येऊन पोचला होता. तिने अखिलेशकडे पाहिले. त्याचे तोंड उघडून घोरणे चालू होते. तिने लगेच हात खाली नेला आणि गाऊन खाली खेचू लागली. पण तेवढ्याच ताकदीने तिला प्रतिकार झाला. तिला आता भीती वाटु लागली. ती किंचाळण्यासाठी तोंड उघडणार तोच कोणाच्यातरी हाताचा स्पर्श तिच्या ओठांवर जाणवला. कोणीतरी तिचे तोंड घट्ट दाबून ठेवले होते.
“शुस्स्स्सस्स्स्सश. दबक्या आवाजात कोणीतरी बोलल्याचा अरूंधतीला आवाज ऐकू आला. पण तोंड दाबल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती.
“ओरडू नकोस, …नवरा उठेल तुझा”… परत तोच दबका आवाज. पण आवाजात जरब अजिबात नव्हती. एक प्रेमळपणा तिला भासला.
“हे बघ, मी तुझ्या तोंडावरून हात काढतो. पण तू ओरडणार नाहीस हे मान डोलावून सांग मला… आवाज समजवण्याच्या स्वरात म्हणाला.
अरूंधतीला काहीच कळत नव्हते. ‘ बाबा रे माझ्या तोंडावर तुझा हात आहे का पाय आहे हेच मला दिसत नाही आहे. मग मी मान तरी कोणाला डोलावून दाखवू. काय चालू काय आहे?? आपल्याला खरंच भूताने पकडल आहे ह्याची अरूंधतीला खात्री झाली. तिने मान डोलावून होकार दिला. तोंडावरचा दाब हळू हळू नाहीसा झाला.
“क्…क् कोण आहेस… तू.आणि मला दिसत का नाही आहात…अरूंधती घाबरत घाबरत बोलली.
“अगं माझं दिसणं महत्वाचं नाही आहे… माझं असणं महत्वाचं आहे.
“म्हणजे तू भूत आहेस?? माझ्या मागे का लागलास रे बाबा…हे बघ मला रामरक्षा येते हा… उगाच तुला त्रास होईल.” अरूंधती सुद्धा त्याच्यासारखी दबक्या आवाजात बोलत होती.
“ॐ अस्य श्री रामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः, श्री सीतारामचन्द्रोदेवता, अनुष्टुप् छन्दः, सीताशक्तिः, श्रीमद्हनुमान कीलकम् श्रीसीतरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः…त्याने एका दमात तिच्यासमोर रामरक्षेचा श्लोक बोलून दाखवला.
” अं? म्हणजे तुला रामरक्षा सुद्धा येते…मॉडर्न भूत आहेस…वाटतं. अरूंधती आश्चर्यचकित होत म्हणाली.
” मी भूत नाही आहे”… त्याचा आवाज आता शांत आणि गंभीर येत होता.
“मिस्टर इंडिया?? हो नक्कीच… तुझ्या मनगटावर नक्की गॅझेट असणार… थांब मी लाल बल्ब लावते म्हणजे तू मला लाल प्रकाशात दिसशील…असे म्हणत ती बेडवरून उठु लागली. तसे त्याने तिला धक्का देत खाली बसवले.
“ये फिल्मी मॅड… उगाच काही फालतू तर्क विर्तक लावु नकोस.
“असं कसं… म्हणजे तू मला दिसत सुद्धा नाहीस, आणि मी काही तर्कवितर्क लावायचे नाहीत. हे बरं आहे.
“हे बघ अरू, मी सांगतो तुला मी कोण आहे ते… पण तू अशीच माझ्याशी गप्पा मारत राहिलीस तर तुझा नवरा नक्की उठेल. आणि तुला अशी एकटी बडबडताना पाहून तुला नक्की तुझ्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तुझ्यावर ट्रीटमेंट चालू करेल.
अरूंधतीला आता धक्काच बसला. ह्याला आपले नाव सुद्धा माहिती आहे. आणि आ पण हॉस्पिटलमध्ये जॉब करतो हे सुद्धा जाणून आहे. ती आता शांतपणे विचार करू लागली. हे भूत जर खरंच मानुगटी वर बसायला आलं असेल तर आपली सुटका नाही. त्याला काय हवंय त्याच्याकडून काढुन घ्यायला हवं तिने त्याच्याबरोबर शांतपणे बोलण्याचा विचार केला.
“भूत दादा… तुला काय तू तर दिसत नाही. उगाच तो मला वेड लागलं म्हणून समजायचा. तू एक काम कर किचनमध्ये चल. आ पण तिकडे बोलू या.
“किचनमध्ये?? मला वाटलं मस्त एखाद्या रोमँटिक जागी मला तू घेऊन जाशील.
“ओये रोमँटिक…चला किचनमध्ये.
अरूंधती बेडमधून उठली आणि चोरट्या पावलांनी किचनमध्ये आली. किचनचा लाईट लावून ती त्याला इकडे तिकडे शोधु लागली.
” हॅलो… आलास का तु??
” हो आलो.
“बरं आता सांग मला…कोण आहेस तु??… सकाळी लिफ्टमध्ये, रिक्षामध्ये तुच होतास ना?? आणि मी हास्पिटलमध्ये जॉबला आहे हे पण तुला माहिती आहे?
“हो सकाळी लिफ्टमध्ये मीच होतो आणि रिक्षामध्ये सुद्धा मीच. तत्र, इतरत्र सर्वत्र.
“उगाच फालतू डायलॉग मारू नकोस, आधी सांग तू माझ्या मागे का लागला आहेस… तुझी काय अपूर्ण इच्छा राहिली असेल तर ती मी नाही पुर्ण शकत.
“अगं मानसतज्ज्ञ आहेस ना तू… मग असा भूतांवर विश्वास काय ठेवतेस.
” मग आहेस तरी कोण??
“कमाल आहे तुझी राव, तुच हाका मारून बोलवलंस मला.
” मी…मी तुला हाका मारल्या?? कधी??
” तुझ्या स्वप्नामध्ये?? आ पण गेले काही महिने रोज भेटतो आहोत.
“काय?????? म्हणजे तो… तो… तू आहेस… अरूंधती बोलता बोलता थांबली. तिने एकदा स्वतःला चिमटा घेत झोपेत नसल्याची खात्री करून घेतली. अचानक फ्रिजच दार आपोआप उघडलं. त्यातून एक थंड पाण्याची बाटली हवेत तरंगत बाहेर आली. ओट्यावरच्या ग्लासामध्ये पाणी ओतून ग्लास हवेत हवेत तरंगत तरंगत तिच्या समोर आले.
” हे घे… पाणी पी… तुला गरज आहे.
अरूंधतीने पाण्याचा ग्लास घेऊन ओठाला लावला. थंड पाणी पोटात जाताच तिला बरं वाटले. तिला ह्या गोष्टीवर हळूहळू विश्वास बसायला लागला होता. ती आता शांत झाली होती.
“हे बघ, तू जे बोलतो आहेस कदाचित खरं सुद्धा असेल. पण मला आता तुझी खूप भीती वाटतेय.
“मग भीती मनातून काढुन टाक. मी काही तुला इजा पोहचणार नाही आहे.
“अरे पण तू असा वास्तवात येशील असं मला कधीच वाटलं नव्हतं.
“काही गोष्टी आपल्या विचार करण्याच्या पलीकडे असतात.
“तु काय बोलतोयस… मला काहीच कळत नाही आहे.
“जास्त विचार करूच नकोस ना… फक्त माझं अस्तित्व स्वीकारून घे.
“ह्या जगात माझच अस्तित्वच नाही. तुझं अस्तित्व कसं स्वीकारू.
“तुझं अस्तित्व परत मिळवून देण्यासाठीच तुझ्या जगात आलोय.
“तुझं जग खूप सुंदर आहे रे….माझं जग खूप वाईट आहेत. माझ्या जगात तुला मी स्थान नाही देऊ शकत. तू परत जा, आ पण तुझ्या जगात भेटूया.
“मी परत जाण्यासाठी नाही आलोय अरू,… मी तुझ्या सोबतच राहणार.
“इथे माझा संसार आहे, नवरा आहे, माझी मुलगी आहे. त्यांना सोडून तुझ्यासोबत कशी राहु. प्लिज समजून घे ना रे.
“मी त्यांना सोडायला तुला सांगतच नाही आहे. तुझ्या संसारात मी लुडबुड करणार नाही. मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. आ पण आपलं एक वेगळं विश्व तयार करू.
“खरंच असं होऊ शकतं?
“हो अरू, तुझी फक्त साथ मला हवी आहे.
“मला तुझं नाव सुद्धा माहिती नाही. मी तुला हाका मारायचा सुद्धा प्रयत्न केला. पण… मला तुझं नावच माहिती नव्हतं. तुझं नाव काय आहे.
“ह्या जगात ‘नाव’ असं काहीच नसतं… असतं ते प्रत्येकाचं व्यक्तीमत्व…. पण तुला मला नावच द्यायचं झालं तर तू पार्टनर म्हणु शकतेस.
“पार्टनर!!
अरूंधतिच्या स्वप्नातला प्रियकर तिच्यासमोर होता. त्याला भेटण्यासाठी ती नेहमीच आतुर असायची तोच पार्टनर! ज्याच्या मिठीत जाऊन विलीन होऊन जगाचा विसर पडायचा तो पार्टनर!. तोच तिच्या आयुष्यात वास्तववादी रूप घेऊन स्वप्नातून बाहेर आला होता.
तिचा खराखुरा पार्टनर!!