“ये बस. तुला असे एकदम बोलावणे पाठवले म्हणुन आश्चर्य वाटले असेल ना?” प्रेरणाच्या चेहेर्याकडे बघून राजश्रीने ताडले. प्रेरणाची मान नकळत हलली. आपला होरा बरोबर आलेला बघून राजश्रीच पुढे बोलायला लागली.
“अग आकाशला भेटून त्या दिवशी दिल्लीला गेले तेव्हाच ठरवले होते की तुला लवकरात लवकर भेटायचे.
आकाशकडून तुझे इतके वर्णन ऐकले होते आणि तो तुझे इतके गुणगान करत होता की तुला भेटायला मी उतावीळ झाले होते. पण दिल्लीला गेले आणि अडकूनच पडले. आधी एका नात्यातल्यांच्याकडे डेथ झाली. नंतर कंपनीच्या कामासाठी बंगलोरला जावे लागले. परत आले तर एक लग्न अटेंड करायचे होते. मध्ये वेळच नाही मुंबईला यायला. आणि इतके नक्की ठरवले होते की पहिल्यांदा तुझ्याशी बोलायचे ते प्रत्यक्षच… फोनवरून नाही… शेवटी काल एक सेमिनार कॅन्सल झाला आणि लगेच मी हा प्रोग्रॅम ठरवला. तुला काही प्रॉब्लेम नाही ना झाला?”
टिपीकल बायकी पद्धतीने राजश्री गप्पा मारायला लागली. तिच्या वागण्या बोलण्यात कुठेही बडेजाव नव्हता का संपत्तीचा गर्व नव्हता. एका मैत्रिणीने निखळ माहिती पुरवावी तितकी सिंपल गोष्ट होती ती. तिच्या स्पष्टीकरणानंतर तिच्यावर राग धरणे प्रेरणाला शक्य झाले नाही. अगदी सावध सुरवात करत ती राजश्रीशी गप्पा मारायला लागली. तिचे एक मन कायम सावध होते की राजश्री कधीतरी आकाशचा विषय काढेल… ‘त्या’ रात्रीचा विषय काढेल… पण तसे काहीही झाले नाही. राजश्रीचा गप्पांचा झरा निखळपणे वाहत राहिला. खूप प्रयत्न करूनही प्रेरणा स्वतःला काठावर ठेऊ शकली नाही. नकळत ती राजश्रीच्या मैत्रीच्या गप्पांमध्ये गुंतत गेली. जितकी जास्त गुंतली तितकीच जास्त मोकळी झाली. आर्थिक परिस्थिती खालावल्यावर तसेही तिच्या ‘मैत्रिणींना’ तिच्यासाठी वेळ मिळेनासा झाला होता. त्यामुळे नव्याने मिळालेली मैत्रीण तिला आवडू लागली.
त्या दिवशी त्या सुटमध्ये त्या दोन स्त्रियांमध्ये मैत्रीची एक घट्ट वीण निर्माण झाली. दोघी प्रथमच एकमेकींना भेटत आहेत हे दोघीनाही खरे वाटेना, इतक्या त्या रममाण झाल्या. गप्पा मारताना बायकांना तसेही विषयाचे बंधन नसतेच. इथेतर दोघींना एकमेकींच्या आयुष्याचा आढावा घ्यायचा होता. दुपारी जेवण रुमवर मागवले गेले. प्रेरणाने फक्त एकदा आकाशला फोन करून ‘ऑल इज वेल’ असल्याची चूटक कल्पना दिली. आकाशचे टेन्शन उतरवून प्रेरणा परत राजश्रीमय झाली. दोघी चक्क दुसर्या दिवशी राजश्री फ्लाईट पकडायला निघेपर्यंत एकत्र होत्या. आकाशला भेटल्यावर प्रेरणाकडे राजश्रीशिवाय बोलायला विषय नव्हता.
आणि मग दिवस बदलले. वेळ मिळाला की राजश्रीच्या मुंबई वार्या सुरु झाल्या. तिची वारी आली की आकाशला वार्यावर सोडून प्रेरणा मैत्रिणीबरोबर वेळ व्यतीत करायला लागली. दोघींमध्ये कधीही पैशाचा विषय वा बिजनेसचा विषय निघायचा नाही. त्यांना इतर फालतू विषय इतके असायचे की अशा गहन विषयांवर वेळ घालवायला त्यांना वेळ नसायचा. हळूहळू आकाश वेळ मिळेल तसा त्यांना जॉईन व्हायला लागला. प्रथम साशंक असलेले आकाश आणि प्रेरणा हळूहळू राजश्रीच्या निखळ मैत्रीबद्दल आश्वस्त झाले. त्या तिघांचा एक छानसा ग्रुप झाला. त्यातही त्या दोघींचा एक ग्रुप असायचा, आकाश-प्रेरणाचा एक ग्रुप असायचा. राजश्री-आकाशचा देखील एक ग्रुप असायचा पण तो कधीच उघडपणे नसायचा. राजश्रीच्या दृष्टीने ‘त्या’ रात्रीचे गुपित हे फक्त तिचे आणि आकाशचे होते. आपल्या मैत्रिणीच्या नवर्याबरोबर आ पण रत झालो आहोत हे मैत्रिणीला कळू नये म्हणुन तिचा आटोकाट प्रयत्न असायचा. कधी ‘त्या’ रात्रीचा विषय निघालाच तरी तिघेही एकमेकांकडे एका विशिष्ट नजरेने पहायचे.
पण ते सोडता त्यांची मैत्री घट्ट होतच गेली. हळुहळू राजश्री आकाशची मदत स्वतःच्या व्यावसायिक अडचणींसाठी घ्यायला लागली. आकाशला मुळातच बिजनेस सेन्स होता तर प्रेरणा आर्थिक क्षेत्रात मात्तबर होती. आकाश प्रेरणाने दिलेले सल्ले राजश्री डोळे झाकून मानायला लागली. त्याचा परिणाम दिसायला लागला. आधीच खूप मोठा असलेली ‘मल्होत्रा इंडस्ट्री’ अजुन तरक्की करायला लागली. इथे पहिली मोठी ऑर्डर वेळेत आणि चांगल्या दर्जाच्या उत्पादनाने पूर्ण केल्याबद्दल आकाशच्या कंपनीला ‘रॅविशिंग’ कडून अजुन मोठी आणि जास्त प्राईजची ऑर्डर मिळाली. तो आनंद या तिघांनी रात्रभर मजा करून साजरा केला. ‘रॅविशिंग’चा मुख्य सप्लायर म्हणुन आकाशची मार्केटमध्ये पत वाढली. कधी नव्हे ते आकाश इंडस्ट्रीला चांगले दिवस आले. इतक्या मोठया कंपनीचा प्रमुख सप्लायर म्हणुन इतर कंपन्याही त्यांच्याकडे यायला लागल्या. पैशाकडे पैसा यायला लागला. आकाशला कंपनीचे एक्स्पान्शन करावे लागले. दोन्ही युनिट्स धडाधड कामाला लागली.
त्यांची ग्रहदशा बदल्यावर त्यांची गृहदशा ही बदलली दोघे नविन मोठया घरात शिफ्ट झाले. हाती आलेला पैसा आकाशने योग्य त-हेने बिजनेसच्या वाढीसाठी वापरला. हळुहळू आकाशचे मार्केटमध्ये नाव झाले. इथे ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’चे निर्णय राजश्री आकाश-प्रेरणाला विचारूनच घेत होती. एक यशस्वी बिजनेसमन म्हणुन आकाश-प्रेरणा मानाने मिरवले जाऊ लागले. ‘यश मिळाल्यावर गतकाळातील उपेक्षेला किमंत येते’. त्याप्रमाणे आधी ज्यांनी आकाशचा अपमान केला होता ते आता आकाशची स्तुती करताना, त्याच्या पूर्वीच्या दिवसांचे आणि त्या अनुषंगाने प्रगतीचे दाखले देताना थकत नव्हते. दिवस मस्त चालले होते. आणि आकाश-प्रेरणाला राजश्रीकडून दिल्ली ट्रीपचे बोलावणे आणि बिजनेस क्लासची तिकिटे आली. आश्चर्याचकित झालेले दोघे दिल्लीला पोहोचले तर त्यांच्यासाठी सुट बुक होता. तसाच जसा आकाशला प्रेरणासाठी हवा होता.
दुसर्या दिवशी अलिशान कार दोघांना ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’ह्या ऑफिसमध्ये घेऊन गेली. दोघांची बडदास्त एकदम शाही ठेवण्यात येत होती. गाडी थांबताच एक नोकर दार उघडायला धावत आला. दुसरा सुटाबुटातील माणुस रस्ता
दाखवायला आला. अलिशान ऑफिसमधून ‘गुड मॉर्निंग’ विशेस घेत दोघे एका लॅविश ऑफिसजवळ पोहोचले. तिथे मघाच्या माणसाचे काम संपले आणि तो मुजरा करून निघून गेला. आकाश-प्रेरणा संभ्रमित अवस्थेत असताना दुसर्या एका गोड मुलीने त्यांचा ताबा घेतला आणि मोठया अदबीने ती दोघांना ऑफिसमध्ये घेऊन गेली. आतल्या रॉयल चेअरवर राजश्री बसली होती. तिचा त्या वेळेचा रुबाब त्या अलिशान ऑफिस आणि त्या रॉयल चेअरला सुद्धा एकदम देखणे पण बहाल करत होता. राजश्रीला आणि तिच्या पाहूण्यांना अदबीने विश करून ती मुलगी तिच्यामागे दार लावून निघून गेली.
दार बंद होताच आत्तापर्यंत रॉयल चेअरवर बसलेली महाराणी गायब झाली आणि एक षोडशा असल्याप्रमाणे राजश्री उधळली आणि खिदळत प्रेरणाच्या गळ्यात पडली. दोन जिवलग मैत्रिणींची गळाभेट झाली आणि पुढला काही वेळ फालतू गप्पांमध्ये गेला. चहापान झाल्यावर राजश्री जरा सिरीयस झाली आणि परत आपल्या खुर्चीवर बसली. तिच्या टेबलासमोरील खुर्त्यांवर आकाश-प्रेरणा स्थानापन्न झाले. समोरील चष्मा डोळ्यावर लावून राजश्रीने टेबलावरील पेपर्स उचलले आणि चाळायला लागली. गंभीर झालेल्या वातावरणाबरोबर आकाश-प्रेरणाही नकळत गंभीर झाले. शेवटी सगळे पेपर्स चाळून राजश्रीने टेबलवर टाकले आणि चष्मा काढुन त्यावर ठेवला. तशाच धीरगंभीर आवाजात ती बोलायला लागली तेव्हा दोघांचे प्राण कानात गोळा झाले होते.
“परवा आमची ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ची मिटींग झाली. त्यात आम्ही आमच्या बिजनेसचा ताळेबंद बघितला. सगळा हिशोब बघितल्यावर सर्वानी मला जबाबदार धरले. सगळे मला खडसावून विचारायला लागले. मी खूप टाळले पण शेवटी मला सांगावेच लागले आणि तुमचे नाव घ्यावेच लागले. एकदा तुमचे नाव उघड झाल्यावर माझ्यावर दबाव आला की मी तुम्हाला ताबडतोब इथे बोलावून घ्यावे. म्हणुन तुम्हाला इथे बोलावले. सॉरी… मी तुम्हाला आधी कल्पना दयायला हवी होती पण माझा नाईलाज झाला…”
राजश्री बोलायची बंद झाली आणि आकाश-प्रेरणाची बोलती बंद झाली. एकतर त्यांना आपला अपराध कळेना. त्यातून आपल्या प्रिय मैत्रिणीने असे आणि अशा कारणासाठी बोलावले हे पचनी पडेना. पुढे काय लिहून ठेवले आहे माहित नाही. ह्याचे परिणाम माहित नाहीत. नुकतेच श्रीमंतीचा आस्वाद घ्यायला लागलेले त्यांचे मध्यमवर्गीय जीव एकदम कोमेजले. शेवटी त्यांच्या चेहेर्यांकडे बघत राजश्री पुढे बोलायला लागली.
“गेल्या वर्ष-सहा महिन्याचे रिपोर्ट्स बघून कुणाचाच विश्वास बसेना की माझ्या निर्णयांनी कंपनीने इतका नफा कमावला आहे. माझे काम आणि माझा वकूब माहित असलेल्या लोकांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला शेवटी सांगावे लागले की मी सगळे निर्णय तुम्हाला विचारून घेतले. हे ऐकल्यावर त्यांचे एकमत झाले की मी ताबडतोब तुम्हाला इथे बोलवावे आणि आकाशला ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’च्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ मध्ये सामावून घ्यावे. मला माझी मैत्री प्यारी होती पण माझे काहीच चालले नाही. सो, आता प्लीज… मी तयार ठेवलेले पेपर्स साईन कर आणि मला माझ्या मैत्रिणीबरोबर उंडारायला परवानगी दे…”
आपले बोलणे संपवून राजश्री दोघांच्या चेहेर्यावरील भाव मजेने न्याहाळीत बसली. तिच्या अपेक्षेप्रमाणे दोघेही सुन्न बसून होते. ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’चा डायरेक्टर? आकाश? काहीवेळ सुन्न बसून आकाशची मान हलली… नकारार्थी…
“सॉरी राजश्री. मी हा पदभार उचलू शकत नाही. लेट मी बी फ्रँक विथ यू. आम्ही तुझ्या जवळ आलो तेव्हा तुझी श्रीमंती आम्हाला खूप हवीशी वाटली. किंबहूना कधी चुकून आमच्या मनात त्याबद्दल लालसाही आली असेल. पण तुझ्याशी मैत्री झाली आणि राज मधल्या ‘राजश्री’ने आम्हाला ह्या मोहापासून दूर नेले. आता देवाच्या दयेने सध्या आम्हाला चांगले दिवस दिसत आहेत. पण ते तसे नसते तरी मी ही ऑफर तुझ्याशी ‘अशी’ मैत्री झाल्यावर स्वीकारली नसती. तू सुद्धा मान्य करशील की तुझ्या मैत्रीचा आम्ही कधीही गैरफायदा घेतला नाही. तुझ्या रुपाने मिळालेली मैत्री आणि व्यवहार आ पण दूर ठेऊ. मी नाही ही ऑफर स्वीकारू शकत.”