“अगं फोनवर न देता येण्यासारखी अशी कोणती खुशखबर होती, ज्यासाठी मला एवढं अर्जंट बोलावलं आहे?”रजनीने दार उघडताच तिच्याकडे एक टक पाहत रवींद्र म्हणाला. तिला पाहिल्यावर अजूनही त्याच्या मनाच्या तळाशी एक बारीकशी कळ उठायची.
“तू आत तरी ये, सगळं सांगते.”त्याच्यात दंडाला धरून आत ओढत रजनी म्हणाली. पूर्वी तिच्या हाताचा साधा स्पर्श देखील त्याला बेभान करून जायचा, पण आता त्या गोष्टीवर नियंत्रण मिळवायला तो शिकला होता. मुळात तिच्या मनात तशा कोणत्याच भावना नव्हत्या हे त्याला माहिती होतं, त्यामुळे त्या स्पर्शाने उलट त्रासच व्हायचा.
“किती गडबड करून आलोय माहिती नाही तुला, एवढा कशाचा आनंद झालाय सांग तरी…”तिच्या चेहर्यावरती पसरलेलं हसू आणि एकूणच देहबोलीतून जाणवणारा आनंद पाहून त्याने विचारलं. ती नक्की कशाबद्दल आनंदी होती हे त्याला कळेना.
“विरेनचा आणखी कुठल्या परीक्षेत नंबर आला की काय?”विरेन रजनीचा पहिल्या लग्नातील मुलगा होता. नऊ वर्षापूर्वी, वयाच्या एकविसाव्या वर्षी तिचं देवराज सोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर चार वर्षातच देवराजचा अपघाती मृत्यू झाला. विरेन तिच्या पदरात टाकून तो तिला एकटं सोडून यमसदनी निघून गेला.
“रवींद्र काका आला, रवींद्र काका आला…”आठ वर्षाचा विरेन अजूनही तो आला की गाणं म्हणत त्याच्या अवतीभवती फिरू लागायचा. विरेनला त्याचा लळा लागला होता आणि त्याच्यावर रवींद्रची माया होती.
“नाही रे, विरेनबद्दल नाही ही खुशखबरी”विरेनला रवींद्रपासून दूर ओढत एका जागी शांत बसवत रजनी म्हणाली.
“अगं मग कशाबद्दल आहे ते सांगशील तरी का?”आता रवींद्रला आणखी रहस्य सहन होत नव्हतं.
“हा प्रज्योत.”तिथेच खुर्चीवर बसलेल्या एका तरूणाकडे हात करत रजनी म्हणाली.
“काका, हा आमचा दुरचा प्रज्योत मामा आहे.”पळत जाऊन प्रोज्योच्या पायाला मिठी मारत वीरेन म्हणाला.
“विरेन, जा बर, मागच्या खोलीत जाऊन खेळत बस. मोठ्यांना बोलायचंय, बोलू दे आणि प्रज्योतला मामा म्हणायचं नाही आजपासून.”रजनी दोन खोल्यांच्या घरात राहत होती. वीरेन लगेच मागच्या खोलीत गेला.
विधवा झाल्यानंतर सासरच्यांनी केलेला छळ तिच्या अजूनही लक्षात होता. तेव्हा तिला त्या घरातून बाहेर पडणं एकटीला शक्य नव्हतं. तेव्हा रवींद्र तिच्या मदतीला आला होता. त्याने शक्य होईल तितकी तिची मदत केली होती. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच तिचं देवराज बरोबर लग्न झालं होतं. लग्न झाल्यावर एका वर्षाच्या आतच विरेन झाला आणि चार वर्षानंतर तर देवराजचा मृत्यू झाला. देवराजच्या मृत्यूनंतर तिची अवस्था फारच विचित्र झाली.
लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता. तिच्या माहेरच्यांनी तर तिच्याशी असलेलं नातच तोडलं. सासरच्या लोकांनी हळूहळू तिला स्वीकारलं आणि ती त्यांच्यासोबत जाऊन राहू लागली. मात्र तेव्हाच देवराजचा मृत्यू झाला आणि तिथून तिच्या खर्या सासूरवासाला सुरूवात झाली.
देवराज तीन भावातील सर्वात धाकटा होता. त्यांचं घर राजकारणी होतं. देवराजचे वडील आमदार होते तर थोरले दोन भाऊ सुद्धा राजकारणात सक्रिय होते. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. तेव्हाच तिच्या सासूने कारण नसताना उगाच भांडण काढून तिला सरळ घरातून बाहेर काढायची धमकी द्यायला सुरूवात केली.
ती आईला फोनवरून बोलत होती. हे सगळं तिने तिला सांगितलं पण सांत्वन करण्यात पलीकडे ती काही करू शकत नव्हती. तिचे वडील आणि भाऊ तिला अजूनही बोलत नव्हते. मग घरी जाऊन राहण्याचा प्रश्नच येत नव्हता. तेव्हाच तिच्या थोरल्या दिराने म्हणजे देवराजच्या मोठ्या भावाने, रविराजने, घरी कोणी नसताना तिच्यावर जबरदस्ती केली आणि तेव्हा तिला सगळंच असह्य झालं.
ग्रॅज्युएशन झालं होतं, पण तोपर्यंत तिने कधीच काम केलं नव्हतं. त्यात विरेनही अजून लहान होता. नोकरी करत त्याला कसं संभाळायचं हे तिला कळत नव्हतं. तेव्हा रवींद्र तिच्या मदतीला आला. रवींद्र तिचा कॉलेजमधील मित्र होता. ते दोघे नेहमीच एकमेकांशी थोडं फार बोलायचे. देवराजच्या मृत्यूनंतर तिला होणारा त्रास वाढू लागला तसतसं त्या दोघांचं बोलणंही वाढलं. रविराजने केलेल्या जबरदस्ती बाबत रवींद्रला सांगताच त्याने तिला तिथे राहायला मनाई केली. सरळ दुसरीकडे राहायचा सल्ला दिला आणि त्यासाठी मदतही केली.
“कोण आहे हा प्रज्योत?”रवींद्रने जवळ जात तिच्या कानात विचारलं.
“अरे सांगितलं नाही का मी तूला, माझ्यासोबत काम करतो म्हणून, माझा जुनियर आहे…”घरातून बाहेर पडल्यावर सुरूवातीचे काही महिने रवींद्रने तिचा संपूर्ण खर्च उचलला आणि तिला नोकरी शोधायलाही मदत केली.
एकदा नोकरी लागली की रजनीने मागे वळून पाहिलं नाही. ती कष्ट करत गेली आणि कष्टाचा फळ मिळत गेलं. पैसे येऊ लागले. मग तिने पहिल्यांदा रवींद्रचे सगळे पैसे दिले. तो नको होता तरीही आणि तेही व्याजासकट दिले. ती एकटीच स्वतंत्रपणे त्या ठिकाणी राहू लागली. तेव्हाच ते दोन खोल्यांचं घर तिने भाड्याने घेतलं.
“प्रज्योत, हा रवींद्र, माझा सगळ्यात जवळचा मित्र.”रवींद्रची ओळख करून देताना ती हमखास ते विशेषण वापरायची. त्याला ते मुळीच आवडायचं नाही. राग यायचा, मी तुझा मित्र नाही हे ओरडून सांगावसं वाटायचं. मात्र तो तसं काहीही करायचा नाही. चेहर्यावरती खोटं हसू आणत शांत रहायचा.
आता ही खोटं हसत, उठून पुढे आलेल्या प्रज्योतचा हात हातात घेत त्याने हस्तांदोलन केलं. नक्की खुशखबर काय आहे आणि तिची ती खुशखबर ऐकण्यासाठी प्रज्योत इथे का आला आहे हे त्याला कळेना. तो तिला काही विचारणार तेवढ्यात ती प्रज्योतला जाऊन बिलगली.
“मी आणि प्रज्योत लग्न करतोय”प्रज्योतचा एक हात हातात घेत, त्याच्या खांद्यावरती डोकं टेकवत हसत हसत तिने त्याला ते सांगितलं.
तिचं ते वाक्य ऐकून त्याच्या मनाचे शेकडो तुकडे झाले. त्या झालेल्या शेकडो तुकड्यांची तिच्या शब्दांच्या प्रहाराने माती झाली. त्या मातीतही तिच्याच नावाची हाक ऐकू येत होती.
त्याचं तिच्यावर प्रेम होतं. ते दोघे एकत्र शाळेला होते. एकत्र कॉलेजला होते. कॉलेजला असताना शेवटच्या वर्षी तो तिला प्रपोज करणार होता, पण तेव्हाच देवराजने बाजी मारली आणि त्याच्या अगोदर तिला प्रपोज केलं. तिने होकार दिला आणि दोघाचं लग्न झालं. तेव्हा तो दुःखाच्या गर्तेतत कोसळला होता. नैराश्याच्या सागरात बुडाला होता. त्यातून स्वतःला बाहेर काढता काढता तो मृत्यूच्या दारावर पोहोचला होता. पुन्हा एकदा त्याच्या समोर तेच घडत होतं आणि तो हाताश होऊन त्या दोघांकडे पाहत होता.
“काय?”तो तोंडतल्या तोंडात पुटपुटला.
“मी आणि प्रज्योत लग्न करतोय.”तिने चिमणी सारखं किलबिलत आनंदाने पुन्हा एकदा ते वाक्य उच्चारलं.
तिच्या आवाजाने त्याचा मनाखालची जमनी गायब झाली आणि ते कोसळू लागलं. दुःखाच्या अंधाराने भरलेल्या निर्वात पोकळीत ते अनंत काळासाठी तसंच कोसळत राहणार होतं. अंतरात कोलाहल माजला असला तरीही त्याने चेहर्यावर ते काहीच दिसू नये यासाठी प्रयत्न केला, पण ते दिसलंच
“काँग्रॅच्युलेशन्स”पुन्हा एकदा खोटं हसत तो म्हणाला.
त्याला त्या ठिकाणी थांबवत नव्हतं. त्याच्या समोर त्याचं प्रेम पुन्हा एकदा दुसरा घेऊन जात होता हे त्याला सहन होत नव्हतं. खरं तर तिथेच त्या प्रज्योतचा गळा घोटून रजनीला आयुष्यभरासाठी आपलंस करावं असं क्षणभर वाटून गेलं पण फक्त क्षणभरासाठीच. लगेच त्याने स्वतःची हार मान्य केली आणि लवकरात लवकर तिथून कसं निघून जाता येईल याचा तो विचार करू लागला.
“थँक्स, मला खूप आवडला प्रज्योत. म्हणलं उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याला विचारून बघावं. विचारल्यावर तो हो म्हणला. मग आम्ही लग्न करायचं ठरवलं”
अजून काही वेळ तिचा तो आनंदाने भरलेला किलबिलता आवाज ऐकून स्वतःच्या मनाची शकले करूण घेण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. तो जागीच स्तब्ध होता. होणार्या वेदना सहन करण्यासाठी मनाची तयारी करत होता.
“छानच झालं की.”डोळ्याच्या कडांवर अश्रू जमा होऊ लागले होते. कोणत्याही क्षणी ते ओघळू लागतील अशी भीती वाटत होती. तरीही चेहर्यावरती खोटं हसू ठेवत गहिवरलेला स्वर त्यांना जाणवणार नाही याची काळजी घेत तो कसंबसं बोलला.
“तू किती दिवस बिनालग्नाचा राहणार आहेस, तू पण करून टाक ना लग्न.”तिने अजूनही प्रज्योतच्या हातात घेतलेला हात सोडला नव्हता. प्रज्योतचा तिच्या खांद्यावर असलेला हात अधिकच घट्ट होत होता
त्या दोघांना एकमेकांच्या जवळ आलेलं पाहून त्याच्या हृदयात आग पेटत होती. त्या दोघांना दूर करावं. प्रज्योतला मारावं आणि रजनीला मिठीत घ्यावं असं त्याला वाटत होतं, पण तो शांत उभा होता.
“हो.”ती काहीतरी बोलली होती. तिने काहीतरी विचारलं होतं असं वाटून त्याने काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून ते उत्तर दिलं.
“कुणी आवडते की नाही तुला एखादी?”तिने विचारलं.
‘ तूच मला आवडते. तुझ्यावरच माझं प्रेम आहे. आ पण कॉलेजला होतो तेव्हापासून माझं तुझ्यावर प्रेम आहे ‘ असं बोलायचं त्याच्या जीभेवर आलं होतं पण तो बोलला नाही. शांत राहिला. आता ते सगळं बोलून काही उपयोग होणार नव्हता. तिने दुसर्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. पुन्हा एकदा तो तिला हरवून बसला होता.
“आता तरी बोल”प्रज्योतपासून दूर होत, त्याच्या समोर येऊन उभा राहत ती चिडून म्हणाली.
“काय बोलू?”अचानक तिला काय झालं हे त्याला कळत नव्हतं. ती इतकी का चिडली होती? ती त्याला काय बोलायला सांगत होती?
“मनात जे काही आहे ते बोल ना…!”स्वतःला शांत करत सौम्य आवाजात तिने विचारलं.
“अगं म्हणलं ना काँग्रॅच्युलेशन, अभिनंदन…! अजून काय म्हणू?”त्या दोघांच्या लग्नाच्या बातमीवर त्याने अजून काय बोलणं तिला अपेक्षित होतं हे न समजून तो उपहासाने म्हणाला.
“तुला हे लग्न मान्य नाही असं सरळ का सांगत नाहीस तू”तिच्या तोंडून ते वाक्य ऐकल्यावर त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मनातील भावना तिला कळल्या की काय!
“मी कुठे तसं म्हणलं!”मात्र ती रागावलेली दिसत होती तिला काही कळालं असेल असं वाटत नव्हतं.
“काही गरज नाही, ते सगळं तुझ्या चेहर्यावरती दिसतंय.”ती पुन्हा एकदा चिडली.
प्रज्योत विचित्रपणे त्या दोघांकडे एकापाठोपाठ एक पाहत होता.
“दिसतंय ना, मग समजून घे. प्रत्येक गोष्ट मी सांगायची गरज आहे का?”
“आहे. समजायला काय, मी काही पण समजून घेऊ शकते. सांगितल्यावरच गोष्टी स्पष्ट होतात ना…!”तिच्या बोलण्याचा सूर असा होता की तिला त्याच्याबद्दल आणि त्याच्या मनातील भावनांबद्दल थोडं फार कळालं आहे असं वाटत होतं.
“काय स्पष्ट करून घ्यायचं आहे तुला…?”त्याने भीत भीत विचारलं.
अचानक या सगळ्या भावनांचा गुंता तिच्यासमोर उघड होतंय, तिला त्याच्या मनातील भावना कळत आहेत या जाणीवने तो घाबरला होता.
“अरे प्रज्योत विरेनला घेऊन मिठाई आणायला जातोस ना…!”रवींद्रच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत रजनी म्हणाली.
“हो दिदी.”मागच्या खोलीत बसलेल्या वीरेनला घेऊन प्रज्योत घरातून बाहेर पडला. जाताना त्याने दार ओढून घेतलं.
“दिदी?”रवींद्रने चमकून विचारलं.
“हो दीदी आहे मी त्याची. तो माझा मावस भाऊ आहे. मला भेटायला आला होता.”तिने स्पष्टीकरण दिलं.