पवन आणि सुबोधला येऊन बरेच दिवस झाले होते नवीन घरात. पवन घरूनच काम करत होता. त्याचबरोबर तो सुबोधचा व्यायाम सुद्धा घेत होता. जेणे करून तो लवकर ठीक व्हावा. टिन्या सकाळी येत घराची सफाई आणि दुपारचं जेवण बनवून जात. परत तो संध्याकाळी येत आणि रात्रीच जेवण बनवून जात असे. सूर्य मावळायच्या आत. अशीच एक शांत शांत दुपार होती. पवनने आज दुपारी टिण्याला थांबून घेतलं होतं. तो घर साफ करून घेत होता त्याच्या कडून.
जिना उतरत टिन्या खाली आला.
“तुमची आणि वरच्या सार्या खोल्या झाडून झाल्या बघा.” त्याने सोफ्यावर बसून लॅपटॉप वर बोटे फिरवत असलेल्या पवनकडे बघत सांगितलं.
“नक्की सगळं साफ केलयस ना?” लॅपटॉपवर नजर ठेवत पवनने विचारलं.
“व्हय जी.”
“ते खिडक्या वरचा कागद पण काढलास ना?”
टिन्या गप्प बसला काही बोलला नाही.
सुबोध तिथेच होता. त्या तीन चित्रांकडे एकटक बघत.
पवनने त्याच्याकडे पाहिलं.
“बरं मला सांग तुम्ही का लावलेत ते कागद, त्या खिडक्यांवर?” लॅपटॉप बाजूला सारत वैतागलेल्या चेहर्याने पवनने विचारलं.
“घरच्या मागचं दिसू नये म्हणून.” टिन्या भीत भीत म्हणाला.
“का? अस काय आहे तिथे?” सुबोधने विचारले.
“कायच नाय. तिथं कायच नाय. जंगल हाय. त्यापाठी नदी. जंगल पांढर हाय. हे घर बांधायच्या आदीपासूनच ते जंगल पांढर हाय.”
“मग विटा लावून कायमची बंद करायची ना खिडकी.”
“कोणत्याबी मालकाला नाय सुचल, तुम्ही अस म्हणार पयलच हाय.” टिन्या गांगारून म्हणाला.
“तू पाहिलयस ते जंगल?” पवनने विचारल.
“नाय बुआ गावची लोक सांगत हुती!”
“हा मग त्यात काय झालं जंगल पांढर हाय तर.” पवन टिन्या सारखा टोन काढत म्हणाला. पवन खेचत होता त्याची.
“ही जी भिंतीवर ज्या माणसांची चित्रं लटकवलेली हायती ना ती मेली हुती तिथं. ह्या तिघांची प्रेत सापडली हुती.” भीत भीत टिन्या बोलला.
“नक्की काय झालं होतं या घरात.” सुबोधची उसुक्ता जागी झाली होती.
“ऐका सांगतो, ही घर हुत या गोर्या सायबाचं. इंग्रजांचा अधिकारी हुता त्यो. त्याला ही जागा आवडली आणि त्यानी घर बांधलं हित. त्यो आणि त्याची बायको दोघेच हित राहायची. ही वरची पयली दोन चित्र त्यांची. त्या गोर्या सायबान एक रखेल ठेवली हुती. कुणाला बी माहिती नव्हत तिच्याबद्दल. ती कुणाला बी दिसली नाय कधी. दिसली ती तीन मढी.”
“पुढे?”
“कोण म्हणतं की गोर्या सायबान तिला रखेल म्हणून ठिवली आन त्याच्या बायकुला कळलं. लय भांडण झाली. लोक आस भी बोलत हुती की त्या सायबाची बायको मरायच्या आधी यडयागत वागत हुती, म्हणून त्यान रखेल ठेवली मग लय दिस सायेब हापिसात नव्हतं आलं म्हणून चार दोन मानस हीत, ह्या घरला आली. कोणी बी नव्हतं घरात. मग पाठी परसात गेली ती माणसं बघायला. तवा ही गोरा सायेब त्याची बायको आणि ती सापडली. मेलेली. तवा आख्या गावाला कळालं त्या रखेलीबद्दल. त्या गोर्या सायबाच्या मांनसानी तिथंच पुरल त्यांना. तसच. कायबी कार्य नाय केलं त्यांचं. गाववाल्याना बगून भी नाय दिल. ही जी शेवटाच चित्र हाय त्या रखेलीच.”
“ते चित्र नीट नाही दिसत. मला तर ती मुलगी वाटत नाही.’ सुबोध म्हणाला.
“कुणालाच ते चित्र नाय समजत. काय काय जण म्हणतात की ती पोर नाय पोरग हाय.” टिन्या कसनुस म्हणाला.
“तवापासून ह्या घरात कुणी टिकत नाही. गोरा सायेब आणि त्याची बायको पण चार पाच महिनच हुत.”
“म्हणजे भूत त्याला टिकून देत नसतील ना?” पवन हसत म्हणाला.
“न्हाय तसं न्हाय!”
“मग!”
“भूत नाय पण ह्य घर लोकांना फसवत! येग-येगळ सपन दावत. लोकांना कळतं नाय समोरच खरं हाय का खोट, भास हाय की आभास. लोकं यडी हुत्यात. काय बी कळत नाय काय हुत त्यांना. मागच्या मालकाला वाटलं त्यो कपडे धुत हाय पण भानावर आलं तवा कळलं की स्वतःच्या पोरांना पाण्यात बुडवलय. तुमच्या आगुदर राहणारी बाय पण अशीच यडी झाली. कुणास ठाव नाय तिला काय झालं. कधी कधी वाटत की ही घर नाय तर ज्या जागेवर ह्य घर उभं हाय ती जागाच वंगाळ हाय.”
“असो ही सगळी अंधश्रद्धा असते.” पवन हसत म्हणाला.
“तुमच्या आदीच सायेब बी असच म्हणायचं, पण नंतर त्यांनी बी घाबरून घर सोडलं. म्हणून तर लय कमी किमतीत तुम्हांसनी घर विकल.” टिन्या छाती फुगवून सांगत होता. त्याला आ पण या सायबला आपलं म्हणणं खरं ते कस पटवून दिलं असे भाव होते.
पवनला आतून त्याच्या भोळेपणाच खूप हसू येत होतं. त्याने टिन्या जवळ बोलवल, “आता मी काय सांगतो ते ऐक, तू ज्या मालकालाबद्दल बोलतोयस तो डोक्यावर परिणाम झालेला माणूस होता. बायकोने घटस्फोट दिला आणि दोन्ही पोरांना घेऊन गेली. त्याच रागात त्याने स्वतःच्या पोरांना पळवल आणि इथं आणलं. बेचारी पोरं आपल्या वडिलांच्या खराब मानसिक स्तिथीला बळी पडली. आणि ती बाई जी वेडी झाली ती ह्या घरात एकटी राहत होती. खूप वर्ष अभ्यास करून पण तिला हवी ती स्कॉलरशिप नाही मिळाली म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झाला.” पवनने उत्तर दिलं. “हे माहीत होतं का तुला?”
त्याचं उत्तर ऐकून टिन्या गप्प झाला.
“राहिली गोष्ट त्या जुन्या मालकाची तो अगोदरपासूनच भित्रा होता. मी सगळी माहीती काढुनच हे घर घेतलंय” पवन शांतपणे म्हणाला.
पवन उठला आणि धडधड जिन्यावरून पाय आपटत त्याच्या खोलीत गेला. सुबोध आणि टिन्या पाहत राहिले. पवनने एक कटाक्ष त्याने कागदाने झाकलेल्या खिडक्याकडे टाकला. तो वेगाने जवळ गेला त्या खिडक्यांच्या आणि दोन्ही हातांनी कागद फाडु लागला. कागदाचे थरावर थर फाडले जात होते. कागदाचे तुकडे इकडे तिकडे सगळीकडे पसरले होते. त्यात नवे जुने सफेद पिवळसर सगळे कागद एकत्र झाले होते. कित्येक दिवस त्याने संयम ठेवला होता. पण जणू त्या खिडक्या त्याला आव्हान देत होत्या. त्याची उसुक्ता चावळत होती.
टक असा आवाज झाला पवनचे हात थांबले. उरलेले काही थर त्याने काढले. त्याच्या समोर एक लाकडाची खिडकी होती. तिची काच त्याने हाताने साफ केली. पण दुधी रंगाची काच काही साफ झाली नाही. त्याने ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. नाही उघडली. वर्षानुवर्षे बंद राहण्याचा हट्ट त्या खिडकीने सोडला नाही. ती खिडकी बंदच राहिली.
एक एक करून सगळ्या खोलीतील खिडक्या ज्यातून घरची मागची बाजू दिसायची म्हणून त्या कागदाने झाकल्या होत्या त्याचे कागद पवन फाडु लागला. सुबोधच्या खोलीतील पण कागद फाडले. पण त्याला दुधी रंगाच्या काच असलेल्या न उघडणार्या खिडकी शिवाय काही मिळालं नाही. तो तावातावाने त्या दरवाजाकडे गेला. धुळीने माखलेला तो दरवाजा त्याच्या कोरलेल्या वर्तुळ नक्षीकामात खूप धुळ-माती घेऊन उभा होता. खूप गोष्टी जश्या मनात साचून राहतात तसा तो दरवाजा ती धूळ सांभाळून उभा होता. तो दरवाजा कोणता टाळा ना तबीज ना कोणत्या कुलपाणे बंद होता. फक्त कडी लावली होती. तीच कडी उघडायला पवन सरसावला.
“आस नका करू सायेब… त्यो दरवाजा नका उघडू.” पवनला विनंती करत टिन्या म्हणाला.
“तुम्ही तरी बोला” टिन्या सुबोधला म्हणाला.
सुबोध काही तरी बोलणार तेवढ्यात मोठा आवाज करत पवनने दरवाजा उघडला. हवेचा थंड झोत आत आला. दरवाजा वर असलेले धूळ खाली झडली. सुबोध पवनच्या मागे गेला. दोन्ही हात पसरून पवन उभा होता. त्याचे डोळे मोठे झाले होते. समोर काय होत त्याला कळात नव्हतं. जंगल तर होत. पण पांढर? पांढर जंगल कसं असेल? सगळ्या काचा दुधी रंगाच्या का होत्या त्याला आत्ता कळाला. खरं तर त्या काचा दुधी नव्हत्या. त्या काचेतून बाहेरच धुकं दिसत होतं.
त्या दरवाजाच्या बाहेर खूप झाडी होती. जंगल होत. त्या जमिनीतून वाफेची वलये वर जात होती. गोल गोल गिरक्या घेत झाडाच्या फांद्या पानात अडकत ती वर जात होतं. सगळीकडे सफेद धूर पसरला होता. ते नक्की काय होत धूर, धूप, धुकं, वाफ काही कळत नव्हतं. बर ती झाड नक्की कोणत्या जातीची ते पण कळात नव्हतं.
त्या धुरात हरवलेली झाड नीट दिसत नव्हती. दिसत होत्या त्या फक्त अक्राळविक्राळ पसरलेल्या फांद्या. जणू त्या आभाळात जायला निघाल्या होत्या. त्या झाडांचे जाड बुंधे पण त्या धुरात अस्पष्ट दिसत होते. त्या धुराच्या वलयांनी त्या काळ्या बुध्यांना घेरलं होत. एक गोष्ट होती ती म्हणजे ते जे काही होत धूर-धुकं घरात नव्हतं येत. कुंपणाच्या बाहेर होत.
टिण्याला आ पण काय बघतोय यावर विश्वास नव्हता बसत. गावकर्यांनी सांगितलेलं जंगलाचं वर्णन त्याने खुपदा ऐकलं होतं पण वर्षानुवर्षे ऐकीव कथेतील ठिकाण-जागा अचानक समोर आल्यामुळे त्याच्या चेहर्यावचा रंग उडाला होता. त्याला वाटत होतं पळून जावं इथून पण हळूहळू व्हीलचेअर वरून उभं राहू पाहणार्या सुबककडे गेलं.
हे बाहेरील दृश्य सुबोध पण पाहत होता. आ पण हे कुठे तरी या आधी ही पाहिलंय तो मनात विचार करत होता. तो दरवाजा बाहेरील दृश्य निहाळू लागला. धुकं धुकं धुकं आणि फक्त धुकं.
पवन अजून तसाच उभा होता जणू त्या सफेद धुराने संमोहित केलं होतं.
“सायेब… सायेब” टिन्याने त्याला आवाज दिला. आवाज कसला तो भीतीने दिलेली आरोळी होती ती.
पवन भानावर आला त्याने मागे वळून पाहिलं. टिन्या सुबोधला धरून होता. आणि सुबोध व्हाईलचेअर वर डोळे मिटून मान एका बाजूला टाकून निपचित पडला होता.