“तुला देव नाही असं का वाटतं?”माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसत माझ्याकडे वळून तिने विचारलं.
आज पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना प्रत्यक्षात भेटत होतो. पहिल्यांदाच मी तिला इतक्या जवळून पहात होतो. अनुभवत होतो. तिच्या परफ्युमचा सुवास मला तिच्याकडे खेचत होता. बोलत असताना तिच्या ओठांची होणारी हालचाल पाहायला मला वेगळाच आनंद मिळत होता.
तसं पाहायला गेलं तर आज आमची पहिली भेट होती. ती कोणत्यातरी कॉफीशॉप किंवा रेस्टॉरंटमध्ये व्हायला हवी होती, पण तिने लायब्ररीमध्ये भेटायचं ठरवलं. ही आमच्या शहरातील सगळ्यात मोठी लायब्ररी होती. सगळ्यात मोठी असली तरी इथे गर्दी काहीच नसायची. कामाला असणारे पाच लोक सोडले तर वाचक म्हणून इथे क्वचितच कोणीतरी असायचं. त्यामुळे बोलायला एकांत मिळायचा. म्हणून मीही लायब्ररीत भेटायला विरोध केला नाही. मुळात तिने ही जागा ठरवली ते मला आवडलं.
लायब्ररीत पुस्तके वाचायची असतात, गप्पा मारायच्या नसतात हे मलाही माहिती आहे पण माणूसही एका पुस्तकासारखाच आहे ना…! आम्ही दोघे मागच्या बर्याच महिन्यांपासून संपर्कात होतो. एका डेटिंग एप्लीकेशनच्या माध्यमातून आमची ओळख झाली. पुढे नंबर एक्सचेंज केले गेले आणि नियमितपणे आमचं बोलणं होत राहिलं. शेवटी आम्ही भेटायचं ठरवलं आणि आज ती भेट घडत होती.
मी ठरलेल्या वेळे अगोदर काही मिनिटे त्या ठिकाणी पोहोचलो आणि खुर्चीवर जाऊन बसलो. काही वेळाने ती दारातून येताना दिसली. तिला पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिल्यावर आम्ही बोललेल्या सगळ्या गोष्टी मनात कुठेतरी खोल पुरल्या गेल्या आणि आकर्षणाची एक उंच लाट माझ्या मनात आली. ती माझ्याकडे पाहून हसली आणि हात उंचावत तिने हाय केलं. मी हाय करताच ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि सरळ देवाबद्दल प्रश्न विचारत तिने बोलायला सुरूवात केली.
“मला काय वाटतं किंवा काय नाही यामुळे देवाचं असणं किंवा नसणं ठरत नाही. देवाचं अस्तित्व हे वस्तूनिष्ठपणे सिद्ध झालं तरच मान्य करता येईल.”आमचं या विषयावर अगोदर थोडं फार बोलणं झालं होतं. मात्र यावर आम्ही सविस्तर बोललो नव्हतो. प्रत्यक्षात भेटल्यावर यावर बोलायचं असा आम्ही ठरवलं होतं. तिने आल्या आल्या तो प्रश्न विचारून या विषयाला तोंड फोडलं होतं.
“आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतात प्रकाशापेक्षा गतिमान काहीच नाही हे गृहीत धरलं जातं आणि ते मान्य करूनच त्यावर इतर गोष्टी सोडवल्या जातात. पण प्रकाशापेक्षा गतिमान असं काहीच नाही हे वस्तूनिष्ठपणे कुठे सिद्ध झालं आहे?”
ती योग्य तेच बोलत होती. आईन्स्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत प्रकाशपेक्षा गतिमान काहीच नाही या तत्त्वावर आधारलेला आहे आणि आतापर्यंत ते गृहीतक कधीच मोडलं गेलेलं नाही. मात्र विज्ञान कधीच कोणत्याच गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवायला शिकवत नाही. पुढे जर प्रकाशापेक्षा गतिमान असं काही सापडलं, तर आईस्टाईन सारख्या शास्त्रज्ञाचा सिद्धांतही खोडून काढायला वैज्ञानिक घाबरणार नाहीत.
“विज्ञानात प्रयोग करून सिद्ध झालेला सिद्धांत मान्य केला जातो. तिथे विश्वास या गोष्टीला काही अर्थ नसतो. आतापर्यंत झालेल्या विविध प्रयोगात प्रकाशापेक्षा गतिमान काहीही सापडलेलं नाही म्हणून प्रकाश हा सर्वात गतिमान असतो हे मान्य केलं जातं. ज्यावेळी प्रकाशापेक्षा गतिमान असं काही सापडेल त्यावेळी आपोआपच ते खोटं ठरेल.”
“मग देवाच्या अस्तित्वा बाबतीतही तसंच असू शकतं ना? आपल्याकडे अजून त्या पात्रतेची टेक्नॉलॉजी नाही म्हणून आ पण देवाचं अस्तित्व सिद्ध करू शकत नसु.
एखाद्या गोष्टीचं अस्तित्व सिद्ध करता येत नसेल तर ते नाहीच असं म्हणणं अयोग्य नाही का? डार्क मॅटर आपल्याला मोजता येत नाही किंवा तपासता येत नाही तरीही ते आहे हे आ पण मान्य करतोच ना? तसंच देवाचं अस्तित्व सिद्ध करता येत नसलं तरीही तो आहे हे मान्य करायला काय हरकत आहे?”
“डार्क मॅटर ही एक संकल्पना आहे. आणि ते मोजता येतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेगवेगळी गणिते सोडवल्यानंतर विश्वाचे वस्तुमान निघतं. ते वस्तुमान प्रत्यक्षात असलेल्या वस्तुमानापेक्षा खूप जास्त आढळतं. मग हे जास्त असलेलं वस्तुमान नक्की काय आहे हे आपल्याला अजून माहिती नाही, त्यामुळे त्याला डार्क मॅटर हे नाव दिलं आहे. डार्क मॅटर बाबतीत पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे, पण देवाच्या बाबतीत तसं नाही.”
” पण पुराव्याची गरजच का आहे? आपल्या अंगावर सूर्याची किरणे पडतात, आपल्याला ऊन लागतं, आपलं शरीर तापतं एवढाच पुरावा सूर्य अस्तित्वात आहे हे मान्य करण्यासाठी पुरेसा आहे. तसंच हे प्रचंड विश्व, त्या विश्वातील पृथ्वी, पृथ्वीवरील सजीव सृष्टी, त्यातील माणसं, हाच देवाच्या अस्तित्वासाठीचा पुरावा असू शकत नाही का?”
“नाही, पुरावा गरजेचा आहे. पुराव्या शिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखं आहे. मुळात जुन्या काळातील लोकांनी न समजणार्या गोष्टी समजून घेण्यासाठी देव या संकल्पनेची निर्मिती केली पण आता आपल्याला बर्याच गोष्टी समजल्या आहेत, त्यामुळे देव या संकल्पनेची गरज उरलेली नाही.”
“मग मला सांग या पृथ्वीची, माणसाची आणि या विश्वाची निर्मिती कोणी केली? विज्ञानाकडे या सगळ्या गोष्टींची उत्तरे नाहीत आणि जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. तिथे देवाची करणी सुरू होते.”
मला या वाक्यावर खरंतर हसू येत होतं पण मी स्वतःला आवरलं.
“विज्ञानाकडे काही प्रश्नांची उत्तरे जरी नसली तरी अनेक प्रश्नांची उत्तरे आता मिळाली आहेत. आणि येणार्या काही वर्षात उरलेल्या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला मिळतील. अध्यात्माकडे मात्र सगळ्या प्रश्नांचं उत्तर देवाची करणी हेच असतं. जेव्हा सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच असतं, तेव्हा एक तर प्रश्न चुकीचे आहेत असं म्हणावं लागेल, किंवा उत्तर तरी चुकीचा आहे असं.”
“मग सांग ना मला विश्वाची निर्मिती कशी झाली?”
“बिग बॅंग थेअरी तर माहीत असेलच की तुला?”
“हो, पण बिग बँगच्या अगोदर काय होतं?”
“काहीच नव्हतं.”
“मग बिग बॅंग कसं झालं?”
“Quantum Influction मुळे”
“ते कशामुळे झालं?”
“आता आ पण जो कार्यकारण भाव दररोजच्या जगण्याला लागू करतो, तो क्वॉंटम मेकॅनिक्सच्या प्रांतात लागू पडत नाही. तिथे विचित्र गोष्टी घडतात.”
“कोणताही पुरावा नसताना आंधळेपणाने विज्ञानावर विश्वास ठेवणं ही सुद्धा एक अंधश्रद्धाच झाली ना?”
” पण बिग बँग थेअरीचे पुरावे उपलब्ध आहेत. सध्या तरी ९९.९९% शास्त्रज्ञांना ही थेअरी मान्य आहे. पुढे जर काही वेगळे शोध लागले तर ही थेअरी खोडून दुसरी थेअरी मांडली जाईल. कोणीच आंधळेपणाने या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.”
” पण तू एका प्रश्नाचे उत्तर दिलं नाही.”
“कोणत्या?”
“बिग बँगच्या अगोदर काय होतं?”
“त्या अगोदर काहीच नव्हतं. स्थळ काळ या सर्व संकल्पना तिथूनच सुरू झाल्या. त्या अगोदर काय होतं हे विचारणंच अयोग्य ठरतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बिग बँगच्या अगोदर काय होतं हे विचारणं म्हणजे मुलाने आई-वडिलांच्या लग्नाचे फोटो पाहून तो त्यांच्या लग्नात कुठे होता हे विचारण्यासारखं आहे.”
ते उत्तर ऐकून ती काही क्षण विचारात पडली.
“तुझ्याबरोबर मी बोलायलाच नको होतं. तू मला नास्तिक केल्याशिवाय सोडणार नाहीस.”
“तेच योग्य आहे. देव देव म्हणत आ पण फक्त स्वतःची फसवणूक करतोय. जेव्हा देव नाही हे मान्य करतो तेव्हा अनेक गोष्टींचा तिढा सुटतो.”
“बर क्षणभर मान्य केलं की देव अस्तित्वात नाही. मग मला सांग आपल्यासारख्या गुंतागुंतीचा विचार करू शकणार्या माणसाची निर्मिती कोणी केली?”
“उत्क्रांती आणि नैसर्गिक निवडीने”
“माकडापासून माणूस तयार झाला हे मान्य करायला अजूनही जड जातं मला. म्हणजे आ पण ज्या प्रकारे गुंतागुंतीचा विचार करतो, तसं इतर कोणतेच जीव करत नाहीत. हे फक्त उत्क्रांतीमुळे शक्य झालं या गोष्टी मनाला पटतच नाहीत.”
“पटण्या न पटण्याचा विषयच येत नाही. अनेक पुराव्यातून हे सिद्ध झालेलं आहे.”
“आणि आता तू म्हणशील यापेक्षा वेगळं काहीतरी सापडलं तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांतही शास्त्रज्ञ खोडून काढतील.”
“हो ते खरं आहे, पण सापडणारा प्रत्येक पुरावा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिवसेंदिवस अधिकच मजबूत करत आहे. त्यामुळे तो खोटा ठरेल ही शक्यता नगण्य आहे.”
“बर मान्य केलं. माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली. पण या सगळ्या गोष्टी मागे असं काहीतरी तत्त्व किंवा डिझाईन असायला हवी ना, त्याशिवाय का उगाच अशी गुंतागुंतीची निर्मिती होऊ शकते? जसा कंप्युटरवर प्रोग्रॅम लिहिला जातो, तसंच माणसाच्या निर्मितीचा प्रोग्राम कदाचित देवाने लिहिला असेल. ज्यातून बिग बँग झालं, ज्यातून पृथ्वी निर्माण झाली आणि पृथ्वीवर सजीव सृष्टी मग त्यातून उत्क्रांती होऊन माणूस निर्माण झाला असेल.”
“हा जर एक प्रोग्रॅम आहे असं पण मान्य केलं, तर आ पण एका सिम्युलेशनमध्ये आहोत हे मान्य करावं लागेल आणि ते जर मान्य केलं, तर प्रोग्राम लिहिणारे लोक आपल्यासाठी देव होतील. मात्र अजून तरी तसा कोणताच पुरावा आपल्याला सापडलेला नाही. त्यामुळे या तर्काला फक्त कल्पनारंजन म्हणता येईल.”
“आ पण विषय बदलूया. जेवढं याबाबतीत जास्त बोलतोय, तेवढं मला तुझं बोलणं पटतंय आणि तेवढं जास्त मी नास्तिक होतेय की काय अशी भीती मला वाटतेय”
“तुला मनातून माहिती आहे, फक्त उघडपणे तू ते मान्य करायला घाबरतेय”
“काय माहिती आहे?”
“की देव नाही म्हणून.”
“मग मी ते मान्य करायला का घाबरतेय?”
“कारण एकदा देव नाही हे मान्य केलं की आपल्या मनाभोवती उभी केलेली काल्पनिक संरक्षण भिंत पडून जाते आणि वास्तवासोबत आपला सामना होतो. ते वास्तव खूपच भयान आहे.”मी बोलता बोलता काही क्षण थांबलो.
“हो. काहीच नव्हतं त्यातून विश्वाची निर्मिती झाली मग हळूहळू तारे आणि ग्रह बनले मग योगायोगाने पृथ्वीवर सजीवास पोषक असं वातावरण तयार झालं आणि त्यातून एक पेशीय जीवांची निर्मिती झाली.”मी जे काही बोलत होतो ते सगळं तिला माहिती होतं आणि ते पटतही होतं हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं.
“ते एक पेशीय जीव उत्क्रांत होत होत वेगवेगळे सजीव निर्माण झाले आणि त्या सजीवातून माणसांची उत्क्रांती झाली.”मी तिचं अर्धवट वाक्य पूर्ण केलं.
“माणसाने मेंदूच्या जोरावर प्रगती केली आणि आज तो सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधत आहे पण त्याने कितीही प्रयत्न केला तरी ती उत्तरे त्याला सापडत नाहीत.”ती बोलून थांबली. बोलण्याची दिशा ठरली होती. आमच्या दोघांपैकी कोणीही बोललं तरी ते बोलणं सारखंच असणार होतं.
“हे सगळं विश्व, या विश्वातील अनेक ग्रह, त्या ग्रहातील एक पृथ्वी, पृथ्वीवरील जीवसृष्टी आणि या जीवसृष्टीचा एक घटक म्हणजे मानव. उत्क्रांती व नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून मानवाची निर्मिती झाली असेल तर आपल्या आयुष्याचा अर्थ काय? हे सगळं कशासाठी घडतंय? या सगळ्यांचा हेतू काय हा प्रश्न पडतो?”मी आमच्या दोघांच्या मनात असणारे प्रश्न बोलून दाखवले.
“आयुष्याला काही अर्थ नाही. कुणीही हेतुपूर्वक माणसाची निर्मिती केलेली नाही. ती झाली आणि होत राहील. इतर प्राण्याप्रमाणे आ पण जगतो. जोडीदार शोधतो. मुले जन्माला घालतो आणि मरून जातो. फक्त प्राण्यात आणि आपल्यात एकच फरक आहे. तो म्हणजे बुद्धीचा. जी आ पण जास्त प्रमाणात वापरतो आणि त्यामुळेच पृथ्वीवर आ पण अधिपत्य गाजवत आहोत.”ती बोलली.
“बघ, अवघड नाही ना. साधं सोपं आणि सरळ आहे. सगळा गुंता सुटतो या गोष्टी मान्य केल्या की.”तिला सगळं बोलणं पटलंय हे वाटून मी म्हणालो.
“नाही, गुंता सुटत नाही. तो अधिकच वाढतो. आयुष्याला जर काहीच अर्थ नाही, तर मग आ पण जे काही करतो, मानवाने जे काही केलं आहे, ते सगळं एक प्रकारे निरर्थकच झालं ना.”