मी कॉलेज पार्किंगमध्ये पोहचलो, तेव्हा आभाळ भरून आलं होतं. काळसर निळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात मधूनच वीज कडाडत होती. तेव्हा काही क्षणांसाठी सगळा आसमंत चकचकीत प्रकाशात नाहून निघायाचा. मग पुन्हा अंधार. नंतर मग ढगांचा गडगडाटी आवाज ऐकू यायचा. मी एका डिप्लोमा कॉलेजवर असिस्टंट प्रोफेसर म्हणून नुकताच रूजू झालो होतो. कॉलेज वगैरे सुटलं होतं, पण स्टाफ मीटिंग ठेवलेली होती त्यामुळे मला जरा उशीर झाला होता.
“चला पठारे, नाहीतर पाऊसात अडकून पडाल”माझ्याबरोबरच रूजू झालेला कर्णिक गाडीला किक मारत म्हणाला. तशी त्याची गाडी बटन स्टार्ट दिसत होती, पण काहीतरी अडचण असावी. त्याबद्दल विचारावं असं माझ्या मनात आलं पण कुठे बोलणं वाढवत बसा म्हणून मी काही बोललो नाही.
“हो, निघायला पाहिजे”मी माझी गाडी बाहेर काढत म्हणालो. तो निघुन गेला. मग मी हेडफोन काढत कानाला लावले आणि मस्तपैकी spotify वर indie सॉंग्स प्ले करून घराचा रस्ता धरला. वाहणार्या वार्यात, आभाळ भरून आल्यानंतर, पाऊस पडण्याची शक्यता असताना, गाडीवरून जाताना अशी गाणी ऐकायला काही वेगळीच मजा येते.
वारं खूपच जास्त होतं. पाऊस पडण्या अगोदरच ढग निघून जातील की काय असं मला वाटलं. त्यामुळे मी गाडीचा वेग फारसा वाढवला नाही. गाणं ऐकत आपल्याच धुंदीत मी रस्त्यावरून जात होतो. हळूहळू मी शहराच्या रहदारीतून बाहेर पडू लागलो आणि आमच्या गावाकडे जाणार्या नाक्यावरती पोहोचलो.
आमचं कॉलेज उशिरा सुटायचं. कॉलेजपासून स्टॅन्ड जास्त दूर नव्हतं. कॉलेज सुटलं की पंधरा-वीस मिनिटातच आमच्या गावाकडे जाणारी शेवटची गाडी निघून जायची. त्यानंतर आमच्या गावाला जाणारी कोणतीच एसटी नव्हती. गाव बरच दूर होतं त्यामुळे, दुसर्या सोयी सुद्धा नसायच्या. शेवटची गाडी चुकलेलं कोणी ना कोणी नाक्यावरती उभंच असायचं, गाड्यांना हात करून गावाकडे येण्यासाठी.
मी जाताना कोणाला ना कोणाला सोबत घेऊनच जायचो. रस्ता दूरचा असल्यामुळे बोलायला तेवढीच सोबत व्हायची. आज मात्र नाक्यावरती फिकट लालसर रंगाची नक्षीदार साडी घातलेली स्त्री वगळता कोणीच दिसत नव्हतं. दुरून ती कोण आहे हे मला ओळखू येत नव्हतं. ओळख नसताना तिला स्वतःहून चल कसं म्हणायचं, त्यामुळे अगोदर ती कोण आहे हे तरी पाहूया म्हणून मी गाडीचा वेग मंदावला आणि थोडीशी वाट वाकडी करून तिच्या जवळून जाऊ लागलो. ओळखीची असेल तर आपोआप हाक मारेल, नसेल तर आपलं आ पण जाऊया असा माझा विचार होता.
आता अंधार बराच पडला होता. जवळ जाऊ लागलो तसं तिची आकृती अधिक स्पष्ट झाली आणि तिची ओळख पटली. ती सरिता होती, आम्ही बारावीपर्यंत एकत्रच शिकलो होतो. बारावी झाल्यावर तिचं लग्न झालं होतं. मी इंजिनिअरिंगला गेलो. मी फर्स्ट इयरला असताना तिला एक मुलगा झाला. दीड दोन वर्षांपूर्वीच ती माहेरी राहायला आली होती. तेही कायमचंच. नवर्याबरोबर भांडणे खूप व्हायची. तो तिला मारहाण करायचा. एकदा तर आयसीयुमध्ये ऍडमीट होती वाटतं काही दिवस.
ती गावात आल्यानंतर आमचं बोलणं झालं होतं. होत होतं. म्हणजे मी स्वतःहूनच तिचा नंबर मिळवायची धडपड केली. नंबर मिळाल्यानंतर तिच्याबरोबर व्हाट्सअप वर बोलू लागलो. कधी-मधी फोन सुद्धा व्हायचा. आठवीला पहिल्यांदा ती आमच्या शाळेत आली, तेव्हापासून ती मला आवडत होती. कॉलेजला असताना मला तिला ते सांगायचं होतं पण कधी हिम्मत झाली नाही. नंतर तिचं लग्न झाल्यावर सगळ्याच गोष्टी फिसकटल्या.
“सरिता…?”मी तिच्या समोर गाडी थांबवत, हेडफोन काढत तिला हाक मारली.
“अरे सतीश तू काय करतोयस इकडे?”चिंतीत असलेल्या तिच्या चेहर्यावर हास्य फुललेलं पाहून मला बरं वाटलं.
“कॉलेज सुटलं, आता घरी चाल्लोय, येते ना?”मी विचारलं.
मी तसं विचारल्यावर अचानक तिचा चेहरा उतरला. ती किंचितशी घाबरली.
“का गं, काय झालं?”मला राग आला होता पण मी सामान्य आवाजात विचारलं. रात्री उशिरा एकाकी नाक्यावरती उभा होती म्हणून मी तिला चल म्हणलं, तर ही मलाच घाबरते मी काय तिला…
“अरे नको, तू जा मी येईन एसटीने”तिने सरळ मला नकार दिला. खरंतर माझा दुखावलेला अभिमान तिला त्या ठिकाणी तसंच सोडून सरळ पुढे जायला सांगत होता. पण तिला एकटीला सोडून जायला मन तयार होत नव्हतं. रात्रीची वेळ होती. शेवटची एसटी गेली होती. तिला यायला काही मिळेल ना मिळेल, त्यामुळे तिला मागे सोडून जाणं अयोग्य आहे असं वाटत होतं.
“अगं शेवटची गाडी गेली आहे, परत काही मिळेल असं वाटत नाही. चल तू आणि तसं वाटत असेल तर मी गावाबाहेर सोडेन तुला, तुझं तू जा, माझं मी जाईन.”तिला कदाचित तिच्याबद्दल उठणार्या वेगवेगळ्या अफवांमुळे पुरूषांसोबत दिसण्याची काळजी वाटत असेल म्हणून मी तसं म्हणालो.
“अरे लोकांचा विचार नाही करत मी. लोकांना काय बोलायला तोंड आहे, काहीही बोलतात.”ती माझं बोलणं खोडत म्हणाली.
“मग?”
“अरे कसं सांगू तुला… जाऊ दे चल, येते मी”आणि मग ती येऊन माझ्या मागे बसली. मी गाडी चालू केली आणि आम्ही दोघे गावाकडे निघालो.
आमचं फोनवर बोलणं झालं त्याला आता आठवडा झाला होता. चॅटिंग वर थोडेफार बोलणं व्हायचं पण ते गुड मॉर्निंग, गुड इविनिंगच्या पलीकडे जायचं नाही. कॉलेजला असताना तर आमचा संबंध यायचा नाही, त्यामुळे बोलण्यात जुन्या आठवणी काढण्याचाही प्रश्न नव्हता.
त्याक्षणी आमचं बोलणं होत नव्हतं. वाहणार्या वार्याचा आवाज सोडला तर आमच्या दोघात शांतता होती आणि ती शांतता मला अस्वस्थ करत होती.
“मग काय म्हणतोय दवाखाना?”ती एका दवाखान्यात नर्स म्हणून कामाला होती. काहीतरी बोलायचं म्हणून मी तो विषय काढला.
“दवाखाना वेगळं काय म्हणणार, तेच सलाईन, इंजेक्शन, मलमपट्टी, डॉक्टर आणि पेशंट…! कॉलेज काय म्हणतंय तुझं? प्रोफेसर झालास हा?”
“ठरवून झालो नाही. पगार चांगला आहे, कॉलेज गावापासून जवळ आहे, म्हणून मग घेतली नोकरी.”गाडी त्यामानाने हळू होती. आमच्या गावाकडे जाणारा रस्ताही चांगला आहे, पण आलेला स्पीडब्रेकर लक्षात न आल्यामुळे मी ब्रेक दाबला आणि ती माझ्या अंगावर आली.
एक छानसा सुगंध माझ्या नाकात शिरला. तो तिचाच होता. तिच्या शरीराचा स्पर्श होताच कुठेतरी काहीतरी पेटलं. मन अनेक दिवसापासून डोक्यात येणार्या विचारांना जागा करून देऊ लागलं. पहिल्यांदाच माझ्या मनात तिच्याबद्दल उघड उघडपणे आसक्ती निर्माण झाली. मी स्वतःला थांबवलं. मला तिच्याबद्दल तसा विचार करायचा नव्हता. मात्र ते थांबत नव्हतं.
काही वेळ कोणीच बोललं नाही. तिच्या मनात नक्की काय चालू आहे, तिच्या मनात माझ्याबद्दल कोणते विचार आहेत हे जाणून घेण्यासाठी मी काहीही केलं असतं. मात्र ते मला कळत नव्हते. गाडी रस्त्यावरून जात राहिली. अंधार वाढत राहिला. वाहणारा वारा आता कमी झाला होता. ढगांचं गडगडणं आणि विजांचं कडकडणं वाढलं होत.
आम्ही आता नाक्यापासून काही किलोमीटर दूर आलो होतो. गाव अजून पंधरा किलोमीटरपेक्षा जास्तच दूर होतं. आमच्या गावाकडे जायच्या रस्त्यावर अधेमध्ये फारशी वस्ती नाही. चुकून कुठेतरी एखादं घर आहे पण तेही क्वचितच. ओसाड माळरानावर पसरलेल्या काळ्या व विशाल नागासारखा हा रस्ता त्या वातावरणात जास्तच विचित्र वाटत होता.
कुणीतरी नेम धरून बर्फ फेकून मारावा तसा थंडगार टपोरा व जाड पावसाचा थेंब माझ्या मनगटावरती पडला. मग एकापाठोपाठ एक पावसाचे थेंब रिपरिप करत अंगावर पडायला सुरूवात झाली आणि पाऊस कोसळू लागला.
“अरे गाडी थांबव ना, खूप लागतोय पाऊस.”सरिता मला ऐकू येण्यासाठी उंच आवाजात म्हणाली.
“अगं इथे आडोशाला काहीच नाही. थांबलं तरी आ पण भिजायचं ते भिजणारच आहोत. पुढे ढाबा आहे ना बंद पडलेला, तिथे थांबू आपण”मी गाडीचा वेग वाढवला तसं पावसाचे थेंब अंगावर दगड बरसल्यासारखे बरसू लागले.
मी ज्या ढाब्याबद्दल बोलत होतो तो फारसा दूर नव्हता. काही मिनिटातच आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तोपर्यंत पावसाचा जोर वाढला होता. ढगांचा गडगडाट कान बधीर करत होता. कोणत्याही क्षणी अंगावर विज पडेल की काय असं वाटत होतं. ढाब्या समोर एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. ते बरंच जुनं होतं. वार्यामुळे हलत होतं. त्या झाडाखाली गाडी लावायचा माझा विचार होता, पण पडलं तर काय करा, म्हणून मी झाडापासून दूरच गाडी थांबवली.
सरिता उतरली व पळतच त्या आत गेली. मी गाडी बंद करत, स्टॅन्ड व्यवस्थित लावून, चावी काढत तिच्या मागोमाग पळालो. असा आडबाजूला, दूर दूरपर्यंत कोणतंही गाव नसताना हा ढाबा कोणी बांधला असेल? तो बांधण्यामागे त्याने कोणता विचार केला असेल असे प्रश्न मला अनेक वेळा पडत. मी माझ्या परीने तो ढाबा कोणी बांधला होता याची चौकशी करायचाही प्रयत्न केला होता, पण अजून तरी मला त्याच्या मालकाबद्दल कळालं नव्हतं.
ढाबा फारसा मोठा नव्हता, पण समोर पत्र्याचं शेड होतं. त्यखाली कधी काळी टेबल खुर्च्या असतील. सभोवताली सिंगल विटांच्या भिंती. आत किचनची आणि काउंटरची अशा दोन कुलुपबंद खोल्या. ज्या कोणी तो ढाबा बांधला असेल त्याचे आभारच मानायला हवेत, कारण हा ढाबा नसता तर आज आमची चांगलीच पंचायत झाली असती.
पालापाचोळा व थोडीफार माती वगळता त्या ठिकाणी स्वच्छता होती. बंद पडलेल्या ढाब्याच्या मानाने तो बराच स्वच्छ दिसत होता. पाऊस एका बाजूने पडत होता त्यामुळे आमची एक बाजू तेवढी चांगलीच भिजली होती, दुसरी बाजू थोडीफार कोरडी होती. सरिता तर फक्त मागच्या बाजूनेच भिजली होती.
मी माझ्या खिशातील मोबाईल काढून बॅगमध्ये टाकला आणि ओले झालेले केस हाताने निथळू लागलो. वाहणार्या वार्याच्या झुळकीमुळे अंगात हुडहुडी भरून येत होती. रात्र झाली होती. पत्र्यावर बरसणार्या थेंबांमुळे कर्कश्य आवाज होत होता पण त्याला काही इलाज नव्हता. त्या एकाकी ढाब्यावर आम्ही दोघेच होतो. दूर दूरपर्यंत कुठेच माणसं नव्हती. रस्त्यावरून सुद्धा एकही वाहन जात नव्हतं.
ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट करत कोसळणारा तो पाऊस त्या एकाकी वातावरणात जरा भीतीदायक वाटेल असाच होता. तेव्हाच अचानक बॉम्बस्फोट होऊन कोणतंतरी मोठं शहर उडालं असेल असा आवाज करत ढग गरजले. ढंगाच्या आवाजात सरिताच्या ओरडण्याचा आवाज मला जरा उशिराच ऐकू आला आणि मी घाबरून तिच्याकडे पाहिलं.
“काय झालं?”मी तिच्याजवळ जात विचारलं, तिने तिच्या मोबाईलची फ्लॅश लाईट लावली होती.
“अरे काही नाही रे, ते ढग गरजले ना, त्यामुळे भीती वाटली”ती ओशाळून म्हणाली. गरजणार्या ढगांची तिला भीती वाटली हे सांगायला तिला लाज वाटत होती.
ते पाहून मला हसू येत होतं पण मोठ्या प्रयत्नाने मी ते अडवून धरलं. ढगांच्या गडगडटांना एवढं कोण घाबरतं असं काहीतरी मी म्हणणार होतो, पण तिचा चेहरा खरंच भूत पाहिल्याप्रमाणे घाबरलेला दिसत होता. आम्ही उघड्यावर असतो, आमच्या सभोवताली आडोसा नसता तरी थोडं फार घाबरण्याला अर्थ होता. पण आता आम्ही मजबूत निवार्याच्या आत होतो. कितीही गडगडाट झाला आणि वीज कोसळली तरीही आम्हाला काही होणार नव्हतं.
जेव्हा माणसांना पाऊस पडणं काय असतं, वीज का पडते आणि ढग का गरजतात हे माहिती नव्हतं त्यावेळी माणसाचं घाबरणं आ पण समजू शकतो. आता त्या मागची कारणे माहीत झाल्यावरही काही जण इतके का घाबरत असतील. सरिता तर घाबरट नव्हती, पण ढगांच्या गरजण्याने तिला भीती का वाटत असेल बर?
“असं काय बघतोय? प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींच्या भीती वाटतात तसं मला ढगांच्या गरजण्याची वाटते.”माझ्या मनातलं ओळखल्यासारखं ती बोलली.