मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवून, एक दीर्घ श्वास घेऊन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसर्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील ‘राज’ चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजात उभी होती. आकाश नेहेमीच्या रॉयल मूडमध्ये असता तर नक्कीच त्याच्या तोंडून लकेर निघाली असती “घारी गोरी द्वार खडी…” पण आत्ता त्याला तिच्या गोर्या घारेपणाकडे लक्ष दयायला वेळ नव्हता.
“गुड इव्हिनिंग मॅडम, मी आकाश… ‘आकाश इंडस्ट्रीज’चा सीईओ… माझ्या मिसेसशी, प्रेरणाशी, तुमचे बोलणे झाले होते… आ पण डिनरसाठी सात वाजता भेटणार होतो. मी आत्ता इथे जवळ आलो होतो आणि माझे काम संपले म्हणुन मी लवकर आलो. विचार केला तुम्हाला वेळ असेल तर गप्पा माराव्यात… पण तुम्ही बिझी असाल तर मी दोन तास खाली लॉबीमध्ये बसून तुमची वाट पाहतो.”
आपली ओळख करून देत आकाशने माहिती दिली. प्रेरणाचा होरा अचूक निघाला. एका कंपनीचा ‘सीईओ’ म्हटल्यावर त्याला लॉबीमध्ये वाट बघायला सांगणे ‘राज’ला अवघड गेले आणि मनाविरुद्ध तिने आकाशला रूम मध्ये यायचे आमंत्रण दिले. तिची रूम म्हणजे एक मस्त अलिशान सुट होता. बाहेरच्या रूममध्ये एक छोटा आणि एक मोठा सोफा, रायटिंग टेबल, डायनिंग टेबल, मोठा एलसीडी टीव्ही, मोठा फ्रीज, कोपर्यात देशी-विदेशी मद्यांच्या बाटल्यांनी भरलेला लहानसा बार असा सगळा सरंजाम होता. मधल्या उघडया दारातून आतील बेडरूमची भव्यता दिसत होती. खोलीत भिंतीत बसवलेल्या स्पीकर्स मधुन कुठल्यातरी इंग्लिश गाण्याची ट्यून ऐकू येईल-न येईल इतकी हलक्या आवाजात झिरपत होती. खोलीत महागडया झुंबरातून पसरणारा उजेड वातावरणाला साजेसा होता.
त्या उंची वातावरणामुळे आणि भपक्यामुळे आकाश दबून गेला. आलेले दड पण त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होते. ते लपवायचा कुठलाही प्रयत्न आकाशने केला नाही. आश्चर्य म्हणजे ह्या उंची वातावरणाचा आणि भपक्याचा कुठलाही गर्व राजच्या चेहेर्यावर दिसत नव्हता. तिचा चेहेरा अगदी नॉर्मल दि सोफ्यावर बसण्याची खुण केली. आपल्या टायची गाठ सैल करत आकाश सोफ्यावर टेकला. समोरच्या टीपॉयवर
राज वाचत असलेले ‘शिवाजी सावंत’चे ‘मृत्युंजय’ ह्या सगळ्या उच्च वातावरणाशी फारकत घेत उपडे पडले होते. त्या सगळ्या उच्चभ्रू वातावरणात ते अजोड मराठी पुस्तक खुपच विजोड वाटत होते. राज ‘मल्होत्रा’ कडे मराठी पुस्तक बघून आकाश वेडाच झाला.
“सॉरी पण तुम्ही आणि मराठी पुस्तक? नाही म्हणजे वाचू शकता पण एकतर मराठी आणि ते ही ‘असं’ पुस्तक?” आकाशने सहजपणे आपली शंका विचारली.
“हो, मीच वाचते मराठी. मी मुळची मराठी. राजश्री सहस्त्रबुद्धे. लग्नानंतर राजश्री ची राज झाले.” राजने खुलासा केला.
“वा, प्रेरणा तुम्हाला भेटून जाम खुष होईल. आम्हा दोघांनाही मराठी मित्रमंडळी असली की अजुन काहीही लागत नाही.” बोलता बोलता आकाशने प्रांजळपणे तिला आपल्या मैत्रीमध्ये ओढले. पण तसे करताना तो केवळ स्वतःबद्दल बोलत नसून प्रेरणा आणि त्याच्या बद्दल आणि त्यांच्या ग्रुप बद्दल बोलत होता. त्याच्या बोलण्यातला सहजपणा राजला कुठेतरी जाणवून गेला. तिच्या स्टेटस मुळे तिच्यापुढे येणारे एकतर दबून गोंधळून जायचे अथवा आपलेही स्टेटस तिच्या तोडीचे आहे हे दाखवायचा प्रयत्न करायचे. आकाशचे त्याविरुद्ध सहज वागणे आणि निरागसपणे तिला मैत्रीत गृहीत धरणे राजला वेगळे वाटले. मघाशी लवकर येऊन रुममध्ये घ्यायला लावल्याचा आकाशवरचा राग बर्यापैकी कमी झाला.
आकाश मग तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला लागला. राजला जसा संशय आलेला तसा तो त्याचा बिजनेस, त्याचे प्रोडक्ट्स ह्या बद्दल बिलकुल बोलत नव्हता. बोलण्यातून तिला आकाशचे चौफेर वाचन जाणवत होते. त्यांच्या बोलण्याला एकच असा विषय नव्हता. निर्भेळ, निर्हेतुक, निव्वळ गप्पा. आकाशच्या त्या गप्पांनी स्वतःच्याही नकळत राज मोकळी झाली, तिचा श्रीमंतीचा, हाय स्टेटसचा मुखवटा गळून पडला… राजश्री आकाशशी गप्पा मारायला लागली.
अशा गप्पा तिने कित्येक वर्षात मारल्या नव्हत्या. कॉलेजच्या दिवसांमध्ये तिने बहदा शेवटच्या अशा गप्पा मारल्या होत्या. नंतर रविशी लग्न झाल्यावर तिचे सर्कल बदलले आणि ती एका वेगळ्याच वातावरणात सामावली गेली.
श्रीमंतीच्या आड सगळ्याच गोष्टींवर बंधने आली आणि मनमोकळे बोलणे, बेंबीच्या देठापासून उत्स्फूर्तपणे हसणे ह्या सगळ्या गोष्टी राजला सोडाव्या लागल्या. नविन उच्चभ्रू जीवन शैली जरी तिला आवडली आणि अंगवळणी पडली असली तरी कुठेतरी आधीची साधी पण मोकळी जीवनशैली खुणावत राहायची. रविच्या निधनानंतर तिचे प्रत्येक पाउल तिला जपूनच टाकावे लागत होते. तिच्या श्रीमंतीच्या मोहापायी तिच्या जवळ येऊ आणि तिला ‘आधार’ देऊ पाहणार्यांची रीघ लागली. शेवटी तिने स्वतःला सर्वांपासून तोडले आणि स्वतःभोवती ‘मिस नॉट अव्हेलेबल’चा कोष निर्माण केला. तेव्हापासुन कुणीही तिचे ते कवच भेदून खर्या ‘राजश्री’ पर्यंत पोहोचले नव्हते.
ते काम आज आकाशने अत्यंत सहजपणे केले होते. इतक्या वर्षांनी अत्यंत आवडत्या ‘राजश्री’शी भेट झाल्याने ‘राज’ भयंकर खुष झाली. अनपेक्षितपणे मिळालेले क्षण जास्तीतजास्त उपभोगण्यासाठी तिची धडपड चालू होती. तिच्या ‘सो कॉल्ड’ हाय सोसायटीने नावेही न ऐकलेल्या पुलं, वपु, सुशि, एसडी, आरडी, एलपी ह्याविषयी भरभरून बोलताना ती आणि आकाश फक्त दोन मित्र होते. त्यांच्यात कुठलेही अंतर नव्हते… ना वय, ना श्रीमंती… खूप
वर्षांनी आकाश पहिला पुरुष होता ज्याला राजने ‘मॅडम’ म्हणायच्या ऐवजी ‘राजश्री’ म्हणायला सांगितले. गंमत म्हणजे त्यात आकाशला काही अप्रूपही वाटले नाही.
त्याच्या बोलण्यात सतत येणार्या प्रेरणाच्या नावाने राजला आकाश आणि प्रेरणा तिचे जुने मित्रच असावे असेच वाटायला लागले. तेवढयात तिच्या लक्षात आले की डिनरसाठी तिला प्रेरणाचा फोन आला होता आणि ती स्वतः येणार होती. किंबहूना म्हणुनच राजला ‘नाही’ म्हणणे जमले नव्हते. मग गेली कुठे ती?
“काय रे आकाश, प्रेरणा कुठे आहे? ती म्हणाली होती की ती येणार आहे. नंतर जॉईन होणार आहे का ती?”
“अगदी खरं सांगु राजश्री? प्रेरणा नाही येणार आज. अगं मला इथे एक काम होते पण ते उशिरापर्यंत चालणार होते. म्हणुन प्रेरणाने तुला डिनरसाठी कंपनी द्यावी असे ठरले होते. पण माझे काम कॅन्सल झाले आणि मी लवकर फ्री झालो. प्रेरणा अजुन घरून निघाली नव्हती. म्हणुन मग असे ठरले की मी इथे येऊन डिनर करावे आणि तिने घरीच रहावे. कितीही नाही म्हटले तरी टॅक्सीने यायचे जायचे म्हटले की दोन चारशे रुपये गेले असते… आणि चांगले ठेवणीतले कपडे घालुन बसने नसते फिरता आले. कुठे धस लागली की गेला कपडा कामातून… सॉरी, पण चालेल ना तुला?” आकाशने प्रांजळपणे सांगुन टाकले. त्याचा तो प्रांजळ स्वर तिला हेलावन गेला. तसेच पैसा पैसा वाचवण्यासाठी माणसाला किती प्रयास पडतात ते तिला आठवले. कॉलेजमध्ये असताना रविशी लग्न होईपर्यंत आपल्या पॉकेटमनी मध्ये सगळे खर्च बसवताना तीही अशीच काटकसर करायची. आता लाखो रुपये सहज खर्च करतानाही तेव्हा काटकसर करताना मिळणारे सुख तिला मिळत नव्हते. त्यामुळे आकाशचे बोलणे आणि त्यातील सहजता तिच्या मनाला भावून गेली.
“खरच राजश्री, मराठी पुस्तके वाचणे वगैरे सगळे ठीक आहे पण डायरेक्ट मृत्युंजय? नाही म्हणजे पुस्तक अप्रतिम आहे, मी स्वतः वाचले आहे, पण तुझ्यासारख्या मोकळ्या बहुश्रुत स्त्रीची ही सिरीयस टेस्ट नाही कळली…” बोलता बोलता आकाशने समोरच्या पुस्तकाकडे निर्देश करून सहज विचारले. इतक्यावेळ प्रफल्लित चेहेर्याने त्याच्याशी गप्पा मारणार्या राजश्रीच्या चेहेर्यावरील भाव ह्या प्रश्नाने बदलले. आत्तापर्यंत खळाळत्या झर्याचे क्षणात अथांग सागरात रूपांतर झाले. चेहेर्यावरील भाव संयमित करायचा कसोशीने प्रयत्न करत राजश्री बोलली…
“कर्णाचे आयुष्य माझ्या सध्याच्या आयुष्याशी समांतर वाटते मला. सगळ्यांमध्ये असुनही तो जसा कायम एकटाच होता तशीच मीही एकाकी आहे. भोवताली हाय सोसायटीच्या लोकांचा इतका गराडा असतो पण त्यांची सोबत न वाटता उलट भीतीच वाटते. मला एकटीला बघून कधी ही ‘व्हाईट कॉलर’ गिधाडं झडप घालतील ह्याचीच कायम भ्रांत असते. आत्ता पुस्तक वाचताना कर्णाशी मी इतकी एकरूप झाले होते की…” बोलता बोलता त्या आठवणीने राजश्री एकदम सेंटी झाली. आपल्या डोळ्यातील अश्रु लपवायला ती पटकन उठली आणि आकाशकडे पाठ करून उभी राहिली. कितीही प्रयत्न केला तरी एक चुकार हुंदका तिच्या तोंडून निसटलाच…
अचानक झालेल्या ह्या वातावरणातील बदलाने आकाश पण जरासा सिरीयस झाला. सोफ्यावरून उठून तोही राजच्या मागे उभा राहिला.
“राजश्री, इकडे बघ, माझ्याकडे.” त्याने तिच्या खांद्याला हलकेच धरून तिला आपल्याकडे फिरवले. त्याच्याकडे वळून ती आपले अश्रु लपवण्यासाठी अधोवदन उभी राहिली. “राजश्री, तू कर्णाबद्दल वाचते आहेस ना? मग त्याने त्याचे एकटे पण घालवण्यासाठी काय केले? त्याने मैत्री केली. तशीच तू आता आमच्याशी मैत्री केली आहेस… सो, तुझ्या ह्या एकटेपणाला आता टाटा बायबाय कर. तरी तू अजुन प्रेरणाला भेटली नाहीस. एकदा तिला भेटलीस की तुला एकटेपणा मिळवण्यासाठी प्रयास करावा लागेल. तिच्या सान्निध्यात कुणी एकटा आणि दुःखी राहूच शकत नाही. आत्ता ती नाही तरी मी आहे ना. आत्ता तुझ्या ह्या मनस्थितीत तिने काय केले असते मला माहित आहे.
आत्ता ह्याक्षणी तुला हवी आहे एक ‘जादू की झप्पी’…”