बोलता बोलता आकाशने आपले हात पसरले आणि राजश्रीला आपल्या घट्ट मिठीत जखडून टाकले. तो त्याचा पुरुषी राकट स्पर्श तिला आपल्या सर्वांगावर जाणवला. त्या मिठीत कुठलीही भीड नव्हती… राजश्रीची छाती आकाशच्या भरदार छातीवर दाबली गेली. त्या अनपेक्षित भक्कम मिठीत एक क्षण तिचा श्वास गुदमरला. इतक्या वर्षांनी झालेला तो दृढ पुरुषी स्पर्श नकळत राजश्रीच्या शरीरात खळबळ माजवायला लागला. आपले हात वर करून आकाशला घट्ट मिठी मारून आपली संमती द्यावी का त्याला दूर लोटुन या कृती बद्दल त्याला खड्सावावे ह्या निर्णयाप्रत ती पोहोचायच्या आत आकाश तिच्यापासून दूर झाला. त्याच्या चेहेर्यावर एक छान मैत्रीचे स्माईल होते. तिला आकाशच्या चेहेर्यावर कुठलीही लालसा वा वासना दिसली नाही, दिसली निखळ मैत्री…
“राजश्री, मी प्लीज तुझी बाथरूम वापरू?” अचानकपणे आकाशने विचारले. ह्या अत्यंत विसंगत प्रश्नावर आपल्याही नकळत राजची मान होकारार्थी हलली. आकाश आतल्या खोलीत निघून गेला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राज तिथेच उभी राहिली. स्वतःच्या मनाशी झगडत..
‘काय झाले आत्ता? चक्क एका परपुरुषाने मला मिठी मारली? कितीशा ओळखीवर? फारतर तासभराच्या? आणि मी काय केले? अडवले त्याला? झिडकारले? खडसावले? थोबाडीत मारली? का नाही केले ह्यापैकी काहीही? आवडली मला ती मिठी? मग मी त्याला प्रतिसाद देऊन मिठी का नाही मारली? नाही, मला नकोच होती ती मिठी. आणि त्याला अडवले वा झिडकारले नाही कारण ती मिठी वासनेने मारलेली मिठी नव्हती… त्यात मैत्री शिवाय इतर कुठलीही भावना नव्हती… कशावरून? अशी कितीशी ओळखते मी ह्या माणसाला? पण नाही, पुरुषाची वासना त्याच्या डोळ्यात लख्ख दिसते. एका स्त्रीला ती नक्कीच कळू शकते. त्याच्या मिठीत ती वासना नव्हती’ स्वतःच्या मनात उसळलेल्या विचारांच्या कल्लोळात राज बुडाली होती.
‘शिवाय त्याच्या निखळ मैत्रीचा अजुन एक पुरावा… त्याचे त्याच्या बायकोवरचे – प्रेरणावरचे प्रेम. प्रत्येक क्षणी तो तिला गृहीत धरूनच बोलतो. ‘माझ्याशी मैत्री’ नाही म्हणाला तो… ‘आमच्याशी मैत्री’ म्हणाला कायम… खरचं, प्रत्येक गोष्टीत बायकोची आठवण काढतो तो… कशी असेल प्रेरणा? माझ्याहून सुंदर?’ मनातील ह्या नविन विचाराने राजश्री दचकली आणि जणु काही आकाशने ते विचार ऐकले असावेत अशा त-हेने घाबरून तिने आतल्या रुमकडे बघितले. आकाश अजुन आला नव्हता आणि नविन विचार मनातून अजुन गेला नव्हता.
‘इतके प्रेम करतो आकाश म्हणजे नक्कीच ती खुपच सुंदर दिसत असणार. नाहीतर कोणे एकेकाळी ‘कॉलेज क्वीन’ असणार्या माझ्याकडे त्याने एकदातरी ‘तशा’ नजरेने बघितलेच असते. कशी का असेना, ती प्रेरणा नक्कीच लकी आहे. इतका प्रेम करणारा नवरा मिळाला आहे तिला. जर तो तिच्या अपरोक्ष तिचे इतके कौतुक करत असेल तर तिच्या बरोबर असताना काय करत असेल? तिला सोडतच नसेल. घट्ट धरून ठेवत असेल… मघाशी मला धरले तसे… तो मघाचा त्याचा स्पर्श… नुसता स्पर्श नाही, पुरुषी स्पर्श. नुसत्या आठवणीने आत्ताही अंगात कसेतरीच होते आहे. आपल्याला तो स्पर्श इतका अचानक मिळाला की धड नीटपणे तो अनुभवता देखील आला नाही. तरीही त्याच्या मिठीतील ती गुदमर…’ विचारांनी आणि नुसत्या आठवणीने राज विचलित झाली. आत्ता मघाच सारखे घाबरायला नाही झाले. उलट आकाश आला आणि आपल्या मनातील भाव त्याला कळले तर काय होईल ह्या विचाराने ती अजुनच उत्तेजीत झाली.
‘रवि गेल्यापासून आ पण कुठल्याही पुरुषाकडे कधीही तशा दृष्टीने बघितले नाही. कुणालाही जवळ येऊ दिले नाही. लोकलज्जा ह्या मुख्य कारणाबरोबरच भिती हे दुसरे मुख्य कारण होते. आपले हे हाय सोसायटीमधील श्रीमंत विधवा म्हणुन असलेले स्थान सर्वांच्या नजरेत असते. अशावेळेस जवळ येणारे पुरुष ‘एका विधवेचे शरीर’ आणि तिचा पैसा ह्याचसाठी जवळ येतात… पदोपदी आपल्याला जाणवत होते… पण त्या भीतीपोटी शरीराच्या मागणीकडे पाठ फिरवताना झालेल्या यातना कुणाला कळणार? आणि अजुन किती काळ आ पण त्या दडपून ठेऊ शकू?’ विचारांच्या खोल गर्तेत राज बुडली असतानाच आकाश बाहेरच्या खोलीत आला.
“सॉरी… वेळ लागला. पण खरं सांगु? मी बाथरूममध्ये काही करायला गेलोच नव्हतो” राज विचित्र नजरेने त्याच्याकडे बघायला लागली. नुकतेच तिच्या मनात आलेले आणि अजुन पूर्णपणे न गेलेले विचार नवे वळण घ्यायला लागले ‘म्हणजे आकाश देखील उत्तेजीत झाला होता की काय? आणि म्हणुन स्वतःला शांत करायला गेला होता? पण मग ते इतके उघडपणे सांगण्याइतका आकाश निर्लज्ज आणि बेडर आहे?’ राज स्वतःच्याच विचारांत बुडाली आणि तिच्या मनातील विचारांची सुतराम कल्पना नसलेला आकाश पुढे बोलला…
“अग इतक्या पॉश हॉटेल मध्ये नुसते आत शिरायचे हे सुद्धा माझे एक स्वप्नच आहे तर तिथे रूम घेणे वगैरे तर शक्यच नाही. आज तुझ्या निमित्ताने हॉटेलमध्ये प्रवेशच नाही तर खोलीतही प्रवेश मिळाला. अगदीच राहवले नाही. इथल्या बाथरूमसुद्धा पॉश आणि खूप मोठया असतात असे ऐकले होते. बघायचा खूप मोह झाला. म्हणुन गेलो मी. खरंच ग, आमच्या एका रूम इतकी मोठी नुसती बाथरूम आहे. आणि इतकी लॅविश की आत जाऊन काहीही करायला धीरच होणार नाही… श्याsss आत्ता प्रेरणा हवी होती इथे. ती तर बाथरूम मधुन बाहेरच नसती आली..”
आकाशच्या बोलण्यावर राजला मनापासुन हसायला तर आलेच पण त्याचे मोकळे ढाकळे विचार ऐकून तिला स्वतःच्याच विचारांची लाज वाटली. आकाश मात्र स्वतःच्याच विचारांत होता.
“मस्त मजा आहे ग तुझी राजश्री. काय सही सुट आहे हा? एकदम राजमहाल. ही रूम, ती आतली बेडरूम, ते लॅविश बाथरूम… वा… मजा आहे बाबा एका माणसाची… आयला पैसे असतील तर काय सही लाईफ असते ना? हवी ती प्रत्येक गोष्ट मिळते…” आकाश आपल्याच तंद्रीत बोलला. त्याच्या बोलण्याला कुठेही असूयेची किनार नव्हती. पण त्याचे बोलणे राजश्रीला आपल्यातील कमीची जाणीव करून गेले.
“नाही आकाश, पैसा प्रत्येक गोष्ट नाही खरेदी करू शकत…” तिच्याही नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि कंट्रोल करायच्या आधीच फितूर अश्रु डोळ्यात जमा झाले. तिचा बदललेला स्वर आकाशला स्पष्टपणे जाणवला. खाडकन त्याने तिच्याकडे बघितले आणि तेवढयात तिचा एक अश्रु बांध ओलांडून गालावर घरंगळला. आपल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेले बघून आकाशला खूप वाईट वाटले. एक पाउल तिच्याकडे टाकुन त्याने
तिचा चेहेरा ओंजळीत धरला आणि तिला वर बघायला लावले. त्याचे हे कृत्य खुपच धाडसाचे असुनही राजला आवडून गेले. तिने वर बघताच तिचा चेहेरा ओंजळीतून सोडून त्याने आपल्या बोटांनी तिचे अश्रु टिपले. हळुवारपणे पुढे होऊन आकाशने तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले आणि मनापासुन एकच शब्द उच्चारला “सॉरी”. त्याच्या माफीतील सच्चाई तिला जाणवून गेली.
“चल, सात वाजत आले. पटकन तयार होऊन ये. अशीही सुंदर दिसतेस तू पण जरा चेहेरा फ्रेश करून ये. रडक्या मुलीला घेऊन जेवायला जायचे नाही मला…” तिच्या डोक्यावर मैत्रीत एक टप्पल मारून आकाश बोलला. त्याचे ते सिरीयस स्पेल तोडण्याचे कसब आणि मैत्रीत मारलेली टप्पल तिला जाम आवडून गेली. ते त्याचे एक कृत्य तिला कित्येक वर्षे मागे तिच्या स्कूल-कॉलेज डेज मध्ये घेऊन गेले जेव्हा तिच्या निरागस मनाला स्वार्थी आणि व्यावहारिक जगाचा स्पर्श व्हायचा होता. त्याच निरागसपणे खुदकन हसत ती आतल्या खोलीत गेली. चेहेर्यावर पाणी मारून ती जेव्हा बेडरूममध्ये आली तेव्हा मधल्या बंद दाराच्या आडूनसुद्धा तिला आकाशचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. आकाश बहुदा मोबाईलवर त्याच्या बायकोशी बोलत होता.
“अग काय सांगु तुला, कसलं सॉलिड हॉटेल आहे हे आणि कसली रूम आहे ही… अगं, आपल्या बेडरूमपेक्षा ह्याची बाथरूम मोठी आहे. तू पाहिजे होतीस ग आत्ता… बघूनच वेडी झाली असतीस. आणि गेस व्हॉट… अग राज मल्होत्रा आणि मी चक्क मराठीत गप्पा मारतो आहोत… सरप्राईज्ड? अग राज म्हणजे राजश्री सहस्त्रबुद्धे आहे आधीची. मस्त आहे माहितेय मैत्रीला. गेला तासभर इतक्या गप्पा मारतो आहोत आम्ही… तू भेटशील तेव्हा वेडीच होशील. तिला बोललो मी की प्रेरणा खुष होईल तुला भेटून. नाही गं, विसरलो… अजुन विचारले नाही की परत तिची मुंबई भेट कधी आहे ते. पण इतके नक्की की तिच्या पुढच्या भेटीत तुझी आणि तिची भेट पक्की. नाही, राजश्री आत गेली आहे. तयारी करते आहे. हो डिनरला जातो आहे. नाही ग, ह्या हॉटेलात काय परवडणार? इथे नुसता चहा प्यायलो आम्ही दोघे तरी माझे बजेट कोलमडेल. हो, इथे जवळ एक हॉटेल आहे तिथे जाऊ आम्ही. हो आहेत पैसे. क्रेडिटकार्ड आहे ग, पण त्यात जास्त लिमिट नाही उरले. बघू, जास्त खर्च झाला तर बसने येईन मी. काळजी करू नकोस. मी कळवेनच तुला. तू जेऊन घे आणि माझी वाट बघत जागू नकोस. बसने आलो तर यायला वेळ होईल मला. झोपुन जा… आल्यावर उठवेनच तुला… अगं चावटपणा काय? इथे या खोलीत मी एकटाच आहे… बर चल, ठेवतो आता. बाय… मिस यू… लव यू…”