विलासने एकदम दचकून तिच्याकडे पाहिले. ही बाई मसनात राहते. म्हणजे नक्की खिल्ली उडवत असणार म्हणून त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारले.
“कुठं”?
“म्हणते नव्ह… ख्रिस्ती लोकांच्या मसनात” ती म्हणाली तिच्या चेहर्यावर आतां अपराधी भाव होता.
” माझा दादला ख्रिस्तांच्या मसनात रखवालदार हाय. खोटं कशाला बोलू, त्येच्या पायी मला कोणी काम देत नाय, आता खोटं बोलले तर आज ना उद्या तुमाला कळणारच. मग द्याल मला हाकलून. त्या परास पयलच सांगितलेले बर… पयलाच वेली व्हय तर व्हय… नाय तर नाय… आता तिच्या चेहर्यावरचा अपराधी भाव अधिक गर्द झाला.
तिचे बोलणे ऐकून विलास अगदी आवाक झाला. काही वेळ तिच्याकडे नुसताच पाहत राहिला. ही बाई रोज आपली रात्र स्मशानात घालवून सकाळी आपल्या घरी येणार आणि परत त्या थडग्याच्या गर्दीत रात्र काढणार. आपल्याला इथे मालक का होईना एका विचित्र अवस्थेत काम कराव लागणार. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले एक आर्त याचना होती. त्याला तिची आणखी माहिती काढुशी वाटली
” तुम्ही लग्न स्मशानातल्या रखवालदाराशी का केल?? तुमच्या वर हे लग्न लादल गेले का?? लग्नानंत्तर तुमच्या नवर्याने ही नोकरी स्वीकारली??.”
“तुमी मला काम देणार असाल तर द्या… नायतर सरल नाय म्हना. उगाच चवकशा नका करू. ती पोटतिडकीने बोलली.
“लोक गंम्मत म्हणून ऐकत्यात तोंडादेखल हा- हू करत्यात. अन काय ते कारन देऊन कटवत्यात. काय ते नक्की सांगा… नाय म्या चालली”. एका वाक्यात सुगंधाने तिला मिळालेल्या नकाराचा पाढा बोलून दाखवला. भराभर बोलत ती अर्धवट उभी राहिली.
विलासने तिला हाताने खुण करत थांबवले. तशी ती खाली बसली. तिला कामाची फार आवकश्यता होती हे स्पष्टपणे जाणवत होते.
” हे बघा बाई… थोडा वेळ शांत बसा, मला थोडा विचार करू द्या. अशी काम एका दमात होय किंवा नाही म्हणून होत नसतात. तुम्हाला हे माहिती आहेच. मला तुमच्याकडून सर्व गोष्टी जाणून घेणे गरजेच्या आहेत. मला जरा विचार करू द्या. तेव्हा तुम्ही शांत बसा. हवं असेल तर त्या ग्लासातले पाणी प्या.” विलासने टेबलाच्या ग्लासाकडे बोट करत म्हटले. तिने झडप घातल्यासारखा ग्लास उचलला आणि घटाघटा संपवला. ती आता समाधानाने त्याच्याकडे पाहू लागली.
सुगंधाला कामाची गरज होती. तशी त्यालाही काम करण्यासाठी नोकर माणूस पाहिजे होता. तिला नाही म्हणून त्याला बरेच नोकर मिळाले असते. शिवाय स्मशानात राहणारी बाई आपल्याकडे काम करते याचीही एक अनामिक टोचनी कायमची सलत राहिली असती. तिला पण कुणीतरी काम द्यायला हवे होते. नाहीतर तिची उपासमारच होणार होती. स्मशानतल्या रखवालाला असा कितीसा पगार असणार?… बराच वेळ हनवटीवर हात ठेवून तो विचार करत बसला.आणि शेवटी म्हणाला.
” या बाई तुम्ही कामाला”
तिची कळी खुलली. खुर्चीत ऐसपैस बसत ती म्हणाली.
” नक्की ना… पगाराच… म्या काई इचारनार न्हाय. तुमाला नीट वाटल तसा द्या. तुमी माझं नुकसान करणार न्हाय. मी रोज एरवेळी सात वाजपर्यंत येइल. आणि सांजच्याला सात वाजता जाईल. समदंी काम करेन खाडा करणार न्हाय.” आणि उठता उठता म्हणाली, मग येऊ का?
“अहो तुम्ही मला तुमच्या लग्नाबद्दल सांगणार होता ना”… विलास तिला थांबवत म्हटले. त्याच्या चिवटपणाची नाराजी तिच्या चेहर्यावर स्पष्टपणे उमटली. विलासला तिच्या नवर्याबद्दल आणखी जाणून घ्यायचे होते. तिचा नवरा स्मशानात रखवालदार होता म्हणजे रोगी बिगी तर नाही. त्याच्या मनात शंका आली.
“सांगते… पण त्याआदी माझी एक अट हाय. आतां म्या तुमची मोलकरीण झाली. मग मला अहो… जाओ म्हणायचं नाय. मला आतां पातूर कोणी असं म्हटलं नाय. लय जड जातंय ऐकायला. मला फकस्त सुगंधा म्हणा सुगंधा. आज्ञा दिल्यासारखी तिने समारोप केला.
“तर सांगते” तिने बोलायला सुरवात केली.”
” म्या एक अनाथ हाय. पुण्याच्या एका अनाथ आश्रमात म्या वाढले. तिसरीत व्हते तवाच आय- बा अपघातात गेले. मला दुसरं कोणी नव्हत. मग गावातल्या पुढार्यान मला अनाथ आश्रमात पाठवल. तिथं मुलींना शिक्षण द्यायचे नाही. दिवसभर भटारखान्यात राहायच. धुनी भांडी करायची आणि दोन टाईमाला मिळेल ते खायचं. मोठी व्हतं गेल तशी पुरूषांच्या नजरा माझ्यावर पडायला लागल्या. आश्रमात कोणी येऊन नासवेल याचा नेम नव्हता. म्हणून आश्रमच्या बाईन उजवायच ठरवलं. आश्रमच्या हाफिसात माझं लगीन लागल. अन मुंडावल्यासंग म्या नवर्याबरोबर रिक्षात बसले.
एवढा सविस्तर तपशील विलासला नको होता. तरीही तिला थांबावन त्याला योग्य वाटलं नाही. तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकू लागला.
“मला वाटलं ह्या माणसाच नाय म्हटलं तरी बर्यापैकी घर आसल. आय बा, भाऊ, बैन कोणना कोण असलच. ह्यो माणूसबी काय तरी काम धंदा करत आसल. पण रिक्षा थांबली एका मसनवट्याच्या फाटकात.
” नवरा रिक्षाचे पैसे देऊन आत गेला. म्या मातुर भायेरच थांबले. थडग्याच्या रांगा बघत रायले. म्या मागं मागं नाय म्हंटल्यावर तो परत आला. आणि माझा हात धरून फरफडत फाटकाला लागून असलेल्या खोपट्यात घेऊन गेला.
” आत येताच नवर्यान दाराला कडी घातली. आणि माझ्या अंगाशी झोम्बायला लागला. चार भिंतीच घर. चांगला नवरा, कुटुंब हे सर्व थडग्याच्या गर्दीत हरवून गेल व्हतं. नवरा मात्र ओरबाडत राहिला. बळजबरी म्हणजे काय हे पहिल्यांदाच कळलं.असा आमचा सौन्सार सुरू झाला.
“साहिब म्या लय बोलले… नग ते बोलले. तुम्ही मला थांबावल असत तर थांबले असते. पण मला भान नाय राहिलं. काहीतरी कुठेतरी समदं ओकायच व्हतं. ते ओकून झालं. म्या अजूनबी सांगते. नाय म्हणायचं असलं तर नाय म्हना. म्या न्हाय येणार उद्यापासून कामाला. ती डोळे पुसून म्हणाली.
विलास तिची कथा ऐकून सून्न झाला. तिला काय उत्तर दयावे त्याला समजत नव्हते. त्याला कुठलीतरी गोष्ट त्याच्या मनाला बोचत होती. तो मोठ्या निर्धाराने म्हणाला.
” सुगंधा तू उद्यापासून यायला लाग”
ती उठली आणि टेबलाकडे वळसा घालुन त्याच्याकडे गेली. वाकून तिने त्याच्या पायाला स्पर्श केला. आणि जराही न मागे वळून न पाहता ती निघुन गेली.
सुगंधा रोज सकाळी सातच्या ठोक्याला हजर होत होती. दिवसभराची सारी कामे आटोपून विलासला हवं नको ते सारं पाहत होती. संध्याकाळचा स्वयंपाक आटोपून सात वाजता ती घर सोडत असे. विलासला जास्त काही बघावं लागत नसे.
एके दिवशी दुपारी सर्व काम उरकून तिने किचनमध्ये जरा अंग टेकले. विलास आपल्या रूममध्ये वामकुक्षी घेत होता. तेवढ्यात तिला बाथरूममध्ये पाणी विसळण्याचा आवाज आला. ती लगेच उठली आणि बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली. जसं जशी पुढे सरकत होती तसा आवाज अगदी स्पष्ट होत गेला. कोणीतरी बाथरूममध्ये भांडी विसळत होते. तिला समजले हा तर भास नक्की नाही आहे. तिने बाथरूमच्या दरवाजाची कडी काढली आणि झटकन दरवाजा उघडला.
बाथरूम पूर्ण रिकामी होते. बाजूला पाण्याचे दोन लहान ड्रम तसेच भरलेले होते. फरशीवर सुद्धा पाण्याचा काही ओलावा दिसत नव्हता. सुगंधाने परत दार बंद केले. तिला परत आवाज ऐकू येऊ लागला. पुन्हा दरवाजा उघडताच तिच स्थिती पुन्हा दिसली. असे आवाज स्मशानात नेहमीच तिला ऐकू यायचे. विचित्र विचित्र आवाजाची तिला सवय होती. पण ह्या आवाजात विरोध होता. कोणीतरी तिला कसले तरी संकेत देत होते. तिने थेट किचनमध्ये येऊन पुन्हा अंग जमिनीवर टेकले. आवाज वाढत गेला. तिने कानावर हात ठेवून आवाजाकडे दुर्लक्ष केले.
संध्याकाळी परत निघताना ती हॉलच्या कोपर्यात घुटमळत उभी होती. विलास सोफ्यावर बसून पेपर चाळत होता. शेवटी हिंमत करून तिने विलाससमोर तोंड उघडले.
” सायेब, मला तुम्हाला कायतरी सांगायचंय”
“ह्म्म्म, बोल… काय हवयं आहे का?
“नाय सायेब… सैपाक चालू असताना आतल्या घरातनं कसले कसले आवाज ऐकू येतात.
“आवाज, आणि ते कसले??”
“आतल्या मोरीत कुणीतरी भांडी घासतया. भांड्याचा लई आवाज आतून येतो. म्या आत जाऊन बघितलं तर तिथं कोणीच नव्हतं.” बोलताना तिचा आवाज कापरा होत होता.
“काहीतरीच काय, मी इथं नेहमी एकटाच असतो. कित्येक वर्षामध्ये मला कधी असा आवाज ऐकू आला नाही. मला वाटत सुगंधा, तुला भास झाला असेल. यापूर्वी तू कधी अशा बंदिस्त जागेत काम केले नसशील. आणि स्मशानात राहत असल्याने तुझी मानसिकता तशी झाली आहे. तू प्रत्येक आवाजाला भूत वैगेरे समजते.”
” नाय सायेब, ह्यो भास नाय… म्या खरंच सांगते… त्यो आवाज मला काहीतरी मला खुणावतोय… जाम भ्या वाटतंय.
“भ्या??… अग कशाच?? एक काम कर… उद्या असा आवाज आला तर मला बोलव. मी पाहीन. जा आता” विलासने तिला समजावलं.
सुगंधा तिथुन निघुन गेली. विलास मात्र विचारात पडला. सुगंधाने अशी का तक्रार करावी?? कदाचित तिला काम सोडावासे वाटत असेल?? पण नाही… एवढ्या मिन्नतीने मिळवलेले काम ती सहजासहजी सोडणार नाही. विलासला तिचे वागणे थोडे विचित्र वाटले. तो विस वर्ष एकटाच राहत होता. कुटुंब उध्वस्त झाल्यावर सुरवातीला वाडा त्याला खायला उठत होता. पण विलासला भीती अशी कधी वाटली नाही. अधून मधून वाड्याच्या सफाईसाठी सफाई कामगार बोलावून घेत असे. स्वतःच्या देखरेखेखाली तो वाड्याचा कोपरा न कोपरा झाडून घेई. त्यांनीसुद्धा त्याच्याकडे अशी तक्रार केली नव्हती. स्मशानात राहत असल्याने तिला आपल्या आजूबाजूला कोण तरी आहे असा नक्की भास होत असेल असे समजुन त्याने डोक्यातून विचार झटकून दिले.