मोठ्यांचा सल्ला हा सल्ला नसून आदेश असतो. काही तरी अघटीत घडू नये म्हणून स्वानुभवाने त्यांनी ते सांगितलेले असते. स्मशानातून परतताना तो सुगंधाला समजावू लागला. पण सुगंधाला रडु कोसळले.
“खरं हाय तुमचं म्हणणं पण म्या एकली त्या मसणात कशी राहु? म्या तुमच्याकड येणार नसल तर तुमी माझ्या संग चला.
विलास बूचकळ्यात पडला. सुगंधाने दाखवलेल्या हक्काची त्याला जाणीव झाली. तिला राघोजी जाण्याचे दुःख नव्हतेच. आता राघोजी आणि स्मशानापासून तिची कायमची सुटका झाली होती. नवर्याला हवे तेव्हा त्याच्या बेढब, ओंगळवाण्या शरीराचा सामना ती इतके वर्ष करत होती. पण तो गेल्यावरही आ पण ह्या थडग्यांच्या सानिध्यात रात्र का काढावी?? हा प्रश्न तिचा योग्यच होता. शेवटी विलासचा नाईलाज झाला. त्याला तिची विलक्षण दया आली. तिने आपले हक्काचे सुख मिळवले होते. तिने त्याला सर्वस्व अर् पण केले होते.
राघोजीच्या अस्थी विसर्जनासाठी ते दोघेच गेले. समाजाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांना जमेल तसे विलास आणि सुगंधा राघोजीचा अंत्यविधी पूर्ण करत होते. सारे विधी आटोपल्यावर दोघेही नदीवर अंघोळीसाठी गेले. चालता चालता सुगंधा दगडाला ठेचाळली आणि खाली पडली. क्षणभरासाठी ती बेशुद्ध झाल्यासारखी झाली. विलासने लगेच तिला सावरले. आधार देत असताना ती विलासकडे पाहून गोड हसली.
” अगं हळू… खाली बघ तरी… आता पडली असती ना” विलासने म्हटले. यावर परत एकदा लाजत ती गोड हसली आणि म्हणाली
” मी पडले नसते तर तुमचा आधार कसा मला मिळाला असता”??
विलास तिच्या सौंदर्याकडे मन भरून पाहत राहिला. नदीत अंघोळ करून दोघेही वाड्यावर परतले.
“काय रे विलास, आता सुगंधा तुझ्या बायकोसारखीच आहे, मग लग्न का का करत नाही तिच्याशी?” विलासच्या एका मित्राने त्याला सल्ला दिला.
मित्राचा सल्ला योग्यच होता. आतापर्यंत पूर्ण गावातली लोकं त्यांच्याबद्दल बोलू लागले होते. मग चार मित्रांच्या साथीने भटजी समोर मंत्रोच्चारात त्यांनी विवाह उरकून टाकला. संध्याकाळी वाड्यावर त्याने मित्राना खास जंगी पार्टी दिली. नशेत धुंद विलास आणि त्याचे मित्र नाचत होते. थोड्याच वेळात सुगंधा कंटाळली.आणि बेडरूममध्ये निघुन गेली. विलासने आणखी पेग रिचवल्याने तो बेभान होऊन नाचू लागला.
नाचता नाचता एका क्षणी त्याची धुंदी खाडकन उतरली. घरच्या एका कोपर्यात अनिता उभी होती. त्यांच्या रंगलेल्या पार्टीकडे कौतुकाने पाहत होती. विलासची आणि तिची नजरानजर होताच ती हसली. लग्नाननंतर हसायची तशीच. ती हसली खरी, पण तिच्या नजरेने एका क्षणी आत्यंतिक भेसुरपणा जाणवला.अनोळखी माणसात जाणवतो तसा. त्याच क्षणी विलासला शक्तीपात झाल्यासारखे वाटले. त्याला दोन्ही पायावर उभे राहणे अशक्य वाटु लागले. एका मित्राचे त्याच्याकडे वेळीच लक्ष गेले आणि त्याने त्याला सावरले.
“नाही झेपत तर एवढी घ्यायची कशाला?” म्हणत तो बेडरूममध्ये घेऊन आला. बेडवर सुगंधा शांतपणे पहूडली होती. तिच्या लक्षात सारा प्रकार आला.
“अवं, आपली लग्नाला पहिलीच रात हाय आणि तुम्ही एवढी कशा पायी ढोसली” असे म्हणत त्याने त्याला बेडवर झोपवले. मित्रांनी परिस्थिती बघून काढता पाय घेतला.
एका क्षणातच विलासचे सारे भावविश्व् बदलून गेले. अनिताच्या आत्म्याचा इथं या वाड्यात वावर आहे. हे त्याला पहिल्यांदाच कळले होते. त्याला वाटले, कदाचित तो भास असावा. पण तो भास नव्हता. एवढ्या मोक्याच्या क्षणी तिने आपल्याला दर्शन का द्यावे? ती हसली खरी, पण दुसर्याच क्षणी त्याला तिची नजर भेसुर आणि अनोळखी वाटली. आणि ती खरंच इथे आपल्या आसपास वावरात असेल तर ह्यापुढे सुगंधा शी शृंगार कसा करणार आहोत ह्याचा तो विचार करू लागला. शृंगारच्या प्रत्येक क्षणाची ती साक्षीदार असेल. फक्त त्याला दिसणार नाही. ह्या आधीही सुगंधाबरोबरच्या प्रत्येक शृंगारात ती आपल्याबरोबर होती. तसा त्याला भास ही झाला होता. पण ह्या पुढे सुगंधाशी शृंगारचा विचार केला तरी त्याला अनिताची आठवण येणार होती.
“कसला एवढा इचार करताय एवढा?” त्याच्या उघड्या डोळ्यांची दखल घेत सुगंधाने त्याला विचारलं. ती त्याचे डोके मांडीवर घेऊन थोपटत होती. उत्तर न देता तो तिचा हात घट्ट धरून नुसता पडून राहीला.
आज दोघेही अधिकृतरित्या नवराबायको झाल्यामुळे त्यांचा पहिला शृंगार नव्या उमेदीने साजरा होणार होता. सुगंधा त्याच क्षणाची वाट पाहत होती. इतके दिवस त्याच्या सोबत शृंगार करताना तिला अपराधीपणाची भावना व्हायची. लग्नानंतरचा शृंगार समाजाच्या नियमानुसार हक्काचा मानला जातो. पण ह्या मिळणार्या हक्काच्या सुखात अनिताने कोलदांडा घातला होता. अनिताच्या भीतीने तो सुगंधाला जवळ घेत नव्हता. महत्वाचे म्हणजे सुगंधाला तो हे असं किती दिवस वाट पाहायला लावणार ह्याचे उत्तर विलासकडे सुद्धा नव्हते. त्याने जर अनिताच्या अस्तित्वाबद्दल सांगितले असते तर सुगंधा गळाठून गेली असती.
यातून कसा मार्ग काढावा ह्या बाबतीत तो विचार करू लागला. वाडा सोडून दिला असता तर अनिताने त्याचा पिच्छा काही सोडला नसता. त्याचे अनितावर प्रेम नव्हते अशातला भाग नव्हता. उलट तो अनिता वर प्राणापलिकडे प्रेम करत होता. तिने त्याला सोडून जाणे ह्या त्याच्या नशिबातला दुर्दैवी भाग होता. पण नियतीने तसे घडविले होते.आणि अनिताने सुद्धा ते स्वीकारायला हवे होते. असे त्याला वाटले. सुगंधा आता त्याची धर्म पत्नी होती. आणि तिच्या बाजूने त्याला विचार करणे भाग होते. त्याच्या एका जवळच्या मित्राला त्याने वास्तव समजुन सांगितले तर तो म्हणाला.
” एका मांत्रीकाला बोलव आणि तिचा पिच्छा सोडवून घे “
मांत्रीकाची मंत्रगिरी म्हणजे शुद्ध भोंदूगिरी असते असे विलासचे ठाम मत होते. त्यामुळे तो त्याच्या फंदात पडला नाही. अनिताला अशा प्रकारे हाकलून देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मृत्यूपर्यंत तिने केलेल्या प्रेमाच्या वर्षाचा आ पण अपमानच करणार आहोत असे त्याला वाटले. तिच्या अनेक आठवणी त्याच्या जवळ साचून होत्या. त्या आठवणी वरच त्याने आजकाल दिवस काढले होते. सुगंधाच्या आधी आली असती तर विलासने खुशी खुशीने आपल्या आयुष्यात तिला जागा दिली असती. आणि उर्वरित आयुष्य तिच्या सानिध्यात त्याने कंठले असते. आता अपघाताने म्हणा वा नियतीचा खेळ म्हणा तो सुगंधाचा नवरा होता. अनिताने तो हक्क तो गमावला होता. पण त्यात तिची काही चुकी नव्हती हे पण तेव्हढंच खरं होतं.
एकीकडे प्रत्यक्ष सुगंधा आणि दुसरीकडे अनिताचा आत्मा. विचाराने त्याचा मेंदू पोखरून निघत होता. शेवटी त्याने ठरवून टाकले, जे काही आहे ते सुगंधाला सांगून टाकायचे.मग जे होईल ते पाहता येइल.त्याने क्षणाचा विलंब न करता तिला जवळ बोलावले आणि म्हंटले,
” सुगंधा, मी काय सांगतोय ते शांतपणे आणि धीराने ऐक, ” असे म्हणत त्याने तिला तपशिलावर सांगितले. तिने शांतपणे सर्व ऐकून घेतले. त्याला वाटले हिला आता ऐकून हूड हूडी भरेल, भीतीने गारठून जाईल. पण तिने हे सर्व पूर्वी माहित असल्यासारखे शांतपणे ऐकून घेतले.
” सुगंधा, तूला हे सर्व ऐकून काहीच वाटले नाही.” तो आश्चर्याने म्हणाला.
“त्यात तिला एवढं काय भ्यायचं. मला ती पहिल्यांदा दिसली तवाच म्या वळखलं. ती आपनास्नी सहज सोडणार नाय म्ह्णून. पहिल्यांदा जरा भ्या वाटली, पण एकदा तुम्ही संग हाय म्हणल्यावर ती काय करणार नाय याची खात्री व्हती.न्हाय तरी मसनात राहण्यापरिस… हे कितीतरी चांगल हाय नव्हं. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
तिचा आपल्यावरचा विश्वास पाहून विलासला अभिमान वाटला. तरी पण त्याने तिला विचारलं.
” पण यातून काही मार्ग काढला पाहिजे ना? मला वाटतं आ पण हा वाडा सोडून जाऊ या. पण ती आपल्या मागे मागे येणार नाही कशावरून?
” न्हाय, म्या ऐकलय, आत्मे आपली मुळ जागा सोडून कुठं जातं न्हाईत. त्यांची एक हद्द ठरलेली असते. त्या पल्याड त्यास्नी जाताच येत न्हाय. सुगंधा आत्मविश्वासाने म्हणाली.
” असं असेल तर उद्याच आ पण हा वाडा सोडून जाउ या. मला वाटतंय आपल्या मळ्यापर्यंत वरती ती येऊ शकणार नाही. तसा आपला मळा गावापासून कसा फारच लांब आहे. आता विलासचा ही आत्मविश्वास वाढला होता.
व्हय आजची रात कशी बशी पार पाडु, सकाळी सकाळीच निघु.” सुगंधा ही उत्सहाने म्हणाली.
अनितापासून सुटका होणार आणि आपल्याला खरेखुरे वैवाहिक सुख मिळणार या आनंदात ते दोघेही झोपून गेले.
दुसर्या दिवशी पहाटे पहाटेच ते तयारीला लागले. सामानाची बांधाबंधी झाली. सुगंधा म्हणाली.
” तुमी पुढं व्हा आणि दरवाजा उघडा म्या आलेचं
विश्वास उत्साहाने पुढे झाला. दार उघडले. समोर अंगणात अनिता उभी होती. तिच्या डोळ्यात अंगार दाटला होता. जणू तिला म्हणायचे होते. ‘ह्या सटवीसाठी तू मला सोडून चाललास. मी तुला जाऊन देणार नाही’ तिचा तो अवतार पाहून विश्वास शक्तीपात झाल्यासारखा थीजून गेला. तिचे असह्य दर्शन टाळण्यासाठी त्याने आपले डोळे गच्च मिटले. मागे सुगंधा होती. तिला विलास का उभा आहे हे कळलंच नाही.ती म्हणाली, “चला ना… का थांबलाय इथं?”