सुगंधा

गावाच्या वेशीवरच संपतराव पाटलांचा चौसेपी वाडा होता. पाटलांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. त्याबरोबर जोडधंदा म्हणून घरात सहा दुभत्या गाई पाळल्या  होत्या. गावाबाहेर गोपाळ डेअरी चा  मोठा प्लांट होता. सकाळी रोजच्या रोज दुधाचा टॅंकर गावात येत असे आणि सर्व दूध घेऊन जात असे. त्यामुळे घरामध्ये सतत लक्ष्मी नांदत असायची.

सहा महिन्यापूर्वीच संपतरावांनी आपल्या मुलाचे लग्न एकदम थाटामाटात लावून दिले. विलास संपतरावांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासून विलास तसा  खूप महत्वाकांशी होता. त्याला स्वतःची अशी वेगळी ओळख बनवायची होती. संपतरावानीसुद्धा कधीही त्याला अडवले नाही.

शहरात जाऊन विलासने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. त्याच्या शिक्षण आणि हुशारीच्या जोरावर विलासने युरोपमध्ये त्याने मोठ्या जहाजावर कुक म्हणून नोकरी मिळवली. तीन वर्ष समुद्राच्या विश्वात राहून विलासला गावाची ओढ लागली. पैसा तर त्याला हवा तसा मिळत होता. पण घरापासून, गावापासून दूर राहून स्वतःच्या मनाचे तो सुख हरवून बसला. शेवटी सहा महिन्यापूर्वी त्याने गाव गाठले. आपला मुलगा घरी परतल्याने संपतराव आणि त्यांची बायको खूप खुश झाले. त्याचे मन बदलण्याच्या आधीच त्यांनी विलासला लग्नाच्या बेडीत अडकवले.

गावी परतल्यावर विलासने परदेशी जाण्याचा विचार काढुन टाकला. त्याने गावात राहूनच शेती बरोबर अनेक जोडधंदे सुरू केले. त्याला शेतिच्या कामासाठी वरचेवर तालुक्याच्या गावी जावे लागत असे. आपल्या बायकोचे त्याने अजून तोंडही नीट पाहिले नव्हते. अनिता सारखी सुंदर आणि सालस बायको मिळाल्याने विलास मात्र मनोमन खुश होता. परदेशी असताना जहाजावरच्या आखूड कपड्यातल्या बायका पाहून त्याचे मन कामवासनेने जागृत व्हायचे. पण रांगडया विलास पाटलाला लग्नाआधी एकाही स्त्रीचा सहवास लाभला नव्हता. लग्नानंतर अनिताच्या कोवळ्या शरीरावर तो अक्षरशः तुटून पडला. प्रत्येक रात्री तिच्या शरीराचा अगदी चोळामेळा करून टाकायचा. सुरवातीला अनिता अगदी थंड पडून नवर्याच्या हरकती सहन करायची. हळूहळू ती सुद्धा नवर्याबायकोच्या प्रेमाच्या सुगंधाचा मनापासून आस्वाद घेऊ लागली. आपल्या धन्याला नक्की काय हवे आहे तिला अचूक समजले. विलास आणि अनिताचा संसार सुखाने सुरू झाला होता.

विलासने शेतीसाठी नवीन तंत्र गावात आणले. त्यासाठी तो पंचायतसमिती मधल्या अधिकार्यांना भेटायचा. संपतराव आणि त्यांची बायको सुवर्णा शेती पाहायचे. आता नव्याने त्यांची सून त्यांची सून शेतामध्ये न्याहरी घेऊन जाऊ लागली होती. शेजारच्या गावातल्या तुकाराम शेलारचीच मुलगी केली होती.

एके दिवशी विलास तालुक्याच्या गावी गेला होता. शेतात भांगलंणी चालू होती. गावातल्या बायका भांगलणीला लावल्या होत्या. संपतराव देखरेख करत होते. बायकाकडून व्यवस्थितपणे भांगलणी करून घेत होते. मोटेच्या हौदावर पंप चालू होता. पंपाचे पाणी पाटातून उसाच्या फडात शिरत होते. सुवर्णाबाई हौदाच्या बाजूला दगडावर धुणे धूत होती. हौदाच्या दगडावर आपटत त्यांचे धुणे चालू होते. दोन झाडांना एक आडवी तार बांधली होती. सुवर्णाबाई कपडे धुवून त्या तारेवर वाळत घालत होत्या.

अचानक सुवर्णाबाईचा तोल गेला आणि पाण्याच्या लोटाबरोबर खालच्या पाटत येऊन पडल्या.

“अगं सुवर्णा… सुवर्णाला काय झालं बघा!” भांगलणी करणार्या बायकांपैकी एकीच लक्ष तिच्याकडे गेले. ती मोठ्याने ओरडून सर्वाना सांगू लागली. तसे संपतराव सावध झाले. ते धावत धावत सुवर्णाकडे गेले. पाठोपाठ सार्या बायकाही त्यादिशेने धावत गेल्या. अनिता नुकतीच न्याहरी घेऊन शेतात आली होती.

“का हो… धावता कशापाई?? कोन… जनावर बिनावर गावलं की काय? सर्व बायकांना धावताना बघून अनिताने तिथल्या एका बाईला विचारले.

“अगं पोरी… तुझी सासू तिथं पाय घसरून पडलीया… चल बिगी बिगी…” तिथल्या एका बाईने अनिताला सांगितले.

“अगं बय्या… सासूबाईऽऽऽ… अरं देवा काय होऊन बसलंय”  डोक्यावरचा डालगा जमिनीवर टाकल्यासारखा करत अनिता सुद्धा धावत सुटली.

सुवर्णाबाई पाटाच्या पाण्यात उपडी होऊन पडल्या होत्या. संपतराव लगेच पुढे सरकले. सुवर्णाला सरळ करण्यासाठी हात लावताच झटका लागून त्यांच्या बाजूला कोसळले. अनिता सुद्धा धावत धावत तिथे आली. सासू सासर्याना पडलेले पाहून तिने पाण्यात उडी मारली. अनिताचा हात दोघांना लागताच तिला ही झटका लागला. आपल्या सासू सासर्याबरोबर अनिताचाही देह खाली गळून पडला. जमलेल्या बायकांना काहीच प्रकार समजत नव्हता. त्यातल्या त्यात थोड्याफार शिकलेल्या गवळ्याच्या सूनेला सारा प्रकार लक्षात आला. तिने मोठ्याने ओरडून सगळ्यांना सतर्क केले.

“थांबा… आता पुढे कोणी जाऊ नका… पाण्याला करंट येतोय.

एव्हाना आजूबाजूला बाजूच्या काम करणारे मजुर तिथे जमा झाले. एकाने प्रसंगावधान राखत धावत जाऊन पाण्याचा पंप बंद केला. गावच्या पोलीसपाटलांना कळवण्यात आले. सर्व गावामध्ये वार्यासारखी खबर पसरली. सर्व गावकरी शेतात गोळा झाले. मजुरांनी पाण्याला करंट लागत नाही याची खात्री करून तिघांना बाहेर काढुन झोपवले. सरपंचानी गणप्या शितोळेला विलासला आणायला तालुक्याला धाडले.

विलास पंचायतसमीतिच्या बाहेरच त्याला भेटला. गणप्या शितोळेची बाईक त्याच्या समोर येऊन थांबली.

“काय र गणप्या… तुझं काय काम काढलस आणखी”??

विलासने उपचार म्ह्णून त्याला विचारले.

“आरं तुझ्याकडंच काम हुतं… गणपा म्हणाला.

“आरं पण मी सांजच्याला गावात येणारच होतो ना… एवढं कसलं अर्जंट काम काढलस… ते तुला इथं घेऊन आलं रे” विलासने जिज्ञासा दाखवत विचारले.

“तस अर्जंटच काम हाय… समदं काय काम तिथल्या तिथं टाक आणं चल माझ्या संग!!  गणपाने मागच्या सीटकडे इशारा करत त्याला बोलला.

“आरं सांग तरी… मी काय नाही येणार म्हणतोय काय?? विलासने जरा खोदून विचारण्याचा प्रयत्न केला.

“अगुदर बस मागं… म्या सांगतो समदं… गणप्या थांबायला तयार नव्हता. विलास मागे बसताच त्याने गाडी पिटाळली. रस्त्यात त्यांने अजिबात तोंड उघडले नाही. गणपाने गाडी घराकडे न नेता शेताकडे गाडी वळवली. विलासने पुन्हा एकदा विचारले. पण तो काहीच बोलला नाही. शेतात गाडी पोहचताच विलासला गर्दी जमा झालेली दिसली. त्याच्या छातीत एकदम धस्स झाले.

विलास आणि गणप्या शेतात पोहचला. विलासला पाहून जमलेल्या बायकांनी गळा काढुन रडायला सुरवात केली. विलास स्तब्ध होऊन राहिला. पाटाशेजारच्या मोकळ्या जागेत आपल्या आबा, आई, अनिताची मृत शरीरे त्याने ओळखली होती. विलासने गाडीवरून उडी मारली आणि थेट त्यांच्या शरीरावर त्याने लोळण घेतली. त्याला काहीच समजत नव्हते… काय झालं आणि आ पण काय पाहतोय. त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. शेवटी एकदाचा त्याने हंबरडा फोडला.

आबाऽऽऽऽ… आईऽऽऽऽऽ… अनिताऽऽऽ

गावातल्या दोघां तिघांनी त्याला बाजूला नेले.आणि एका बाजूला बसवले. त्याला पियाला पाणी दिले.

विलासच्या आयुष्यात एक वादळ न सांगता आले आणि त्यात सर्व काही तो गमवून बसला होता. आबा, आई, अनिता सर्व त्याला सोडून गेले होते. सारे अंतिम संस्कार पार पडले. काही दिवसासाठी आलेले अनिताचे नातेवाईक सुद्धा निघुन गेले. शेवटी विलास त्या वाड्यात एकटाच राहिला. कधी कधी एवढा मोठा वाडा त्याला खायला उठायचा. अधून मधून त्याचे मित्र त्याला भेटायला यायचे. त्यांनी त्याच्याजवळ दुसर्या लग्नाचा आग्रह धरला. पण त्याने तो फेटाळला. त्यानंतर एक एक करून मित्र सुद्धा यायचे बंद झाले.

त्या घटनेनंतर विलासने आपली सर्व शेती भाडेतत्वावर गावामध्ये दोघां तिघांना वाटून टाकली. सर्व जोडधंदे त्याने बंद केले. घरातल्या सर्व गाई त्याने विकून टाकल्या. नातेवाईकाचे येण- जाणं बंद झाले. शेतीवर मिळणारे उत्पन्न त्याच्या उपजीविकेसाठी पुरेसे होते. बरीच वर्ष  सरून गेली. आज वीस वर्षानंतरही विलास पाटील वाड्यात एकटाच राहत होता.

वीस वर्षानंतरही विलास पाटलाच्या आयुष्यात काही बदल झाला नव्हता. खिडकी तासंतास तो बसून राहायचा. बंद फाटकापलीकडचा सुमसान रस्ता त्याच्या जीवनाचा भाग बनला होता. रस्त्यावरून जाणारा एकाद दुसरा खिडकीकडे पाहून हसून हात हलवी. तो ही त्याला हात हलवून प्रतिसाद द्यायचा. तेवढाच काय तो त्याचा विरंगुळा. एरवी मात्र शुकशुकाट. एवढ्या मोठ्या वाड्यात त्याच्याशिवाय कोण नव्हते. स्वयंपाकाला कुणी बाई नाही, झाडझूड् करायला नोकर नाही. ही सारी कामे तो स्वतःच करायचा.

आज मात्र तो त्याच्या भावी नोकराची वाट पाहत होता. तशी त्याने वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. त्याला स्वयंपाक करता आला पाहिजे, वाड्याची देखभाल करता आली पाहिजे इत्यादी अटी नमूद केल्या होत्या.

इतक्यात फाटक वाजले. त्याची स्थिर झालेली नजर विचलित झाली. फाटक एक बाई उघडत होती. तिशी पस्तीशीतली, गोरी, सुंदर बांध्याची. शरीराभोंवती सहावारी साडीला तिने चापूनचूपन गुंडाळले होते. साध्या कपड्यामध्येही तिच्या चेहर्यावरचे तेज उठून दिसत होते. विलासने खरं तर पुरूषी नोकर हवा होता अशी जाहिरात दिली होती. कदाचित दुसर्या ही कामाने आली असावी असे त्याला वाटले. फाटक उघडून ती आत आली आणि तिने दार वाजवले. विलासने दार उघडले. त्याच्या पाठोपाठ ती आत आली आणि सांगण्याअगोदरच समोरच्या खुर्चीत बसली. अंगावर स्वच्छ धुतलेली साडी, नीट विंचरलेले केस आणि चेहर्यावर हलकासा टाल्कम पावडरचा पफ फिरवलेला. डोळे मात्र बोलके होते. कसला तरी अनामिक आत्मविश्वास त्यात दाटला होता.

” कोण आ पण आणि काय काम होत? ” विलासने विचारले

“म्या सुंगधा राघोजी विचारे. तुमची जाहिरात वाचून आले. मला थोडु थोडुस वाचता येतं. तिसरी पास का नापास आतां आठवत नाय, पण मला समंध येतं. सैपाक, घराची देखभाल, पोर असली तर त्यांचा सांभाळ, बाकी तुम्हासनी हवं नको ते सगळं.” तिने एका दमात सांगून टाकल.

“म्हणजे”?

“म्हजीं भायेर येण- जाण… बाजारहाट करणं समदं.”

“नाही तुमचा जरा गैरसमज झालाय, मला पुरूष नोकर हवा होता. विलासने तिला स्पष्ट करून सांगितल.

“खरं हाय ते… अव्… पुरूषाना कुठं येतो चांगला सैपाक करता. शिवाय धुनीभांडी, झाडलोट… बायकांना एकाच वेळी धा काम करायची सवय असती. पुरूषांना कुठलं आलं ते जमाया. तवा म्या इचार केला, आ पण सोताच जाव आन समजावून सांगावं. तिने त्याची समजूत काढली. त्याला थोडी गम्मत ही वाटली. त्याने चौकशी पुढे चालू ठेवली.

“कुठं राहता”

“मसनात”

सुगंधा | भाग ६

विलासने डोळे उघडले. समोर अनिता नव्हती. अंगण साफ रिकामे होते. पण उंबरठा ओलांडण्याचे धाडस काही विलासच्याने झाले नाही. त्याच्या पायातली शक्ती संपून गेली होती. शक्तीहीन होऊन तो खाली बसला. सुगंधा त्याच्याकडे हताश नजरेने पाहत राहिली. “नाही ते शक्य नाही. चल ती बॅग आत ठेव."...

सुगंधा | भाग ५

मोठ्यांचा सल्ला हा सल्ला नसून आदेश असतो. काही तरी अघटीत घडू नये म्हणून स्वानुभवाने त्यांनी ते सांगितलेले असते. स्मशानातून परतताना तो सुगंधाला समजावू लागला. पण सुगंधाला रडु कोसळले. "खरं हाय तुमचं म्हणणं पण म्या एकली त्या मसणात कशी राहु? म्या तुमच्याकड येणार नसल तर तुमी...

सुगंधा | भाग ४

विलासला सर्व प्रकार लक्षात आला. मनातल्या भीती पोटी तिला भास झाला असावा. पण लगेच आणखी एक विचार मनात आला. चोवीस तास स्मशानात राहणार्या एखाद्याला एखाद्या प्रेतात्म्यापासून कसली भीती? आणि कसले भास- ती नाटक तर करत नसेल? पण आता वेळ निघुन गेली होती.तिच्या मादक शरीराची उब...

सुगंधा | भाग ३

दोन दिवसानंतर गावातला जॉन फर्नाडिस वारला. त्याच्या अंत्यविधीसाठी विलासला कबरीस्तान जावे लागले. स्मशानात जॉनचे नातेवाईक आणि काही मोजकेच लोक होते. खरे म्हणजे विलासला या निमित्ताने सुगंधाच्या नवर्याला पाहायचे होते. खड्डा खणून तो वाट पाहत बसला होता. अंगाने धडधाकट, रंगाने...

सुगंधा | भाग २

विलासने एकदम दचकून तिच्याकडे पाहिले. ही बाई मसनात राहते. म्हणजे नक्की खिल्ली उडवत असणार म्हणून त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारले. "कुठं"? "म्हणते नव्ह... ख्रिस्ती लोकांच्या मसनात" ती म्हणाली तिच्या चेहर्यावर आतां अपराधी भाव होता. " माझा दादला...

error: नका ना दाजी असं छळू!!