अझलान घाबरला. त्याच्या कपाळावरून घाम वाहू लागला. समोर बघत त्याने पाऊले मागे घेतली. तसाच तो अजून मागे सरकला. एकदाचा तो मागे वळाला. झपाट्याने पाऊले उचलत तो घराकडे निघाला. जंगल शांत होत. फक्त अझलानच्या पावलांचा आवाज होता. जसा जसा तो धुकं पार करत पुढे येत गेला तशी एक आकृती पाठी येत गेली. ही तीच आकृती होती जी न्हाणीघरात होती आणि ही तीच आकृती जिने काही वेळा पूर्वी अझलानचा चिक काढला होता. अझलान त्या आकृतीकडे पाहत पुढे जात होता. तिच्यापासून दूर.
त्याला दरवाजा दिसू लागला. तो पुढे पळणार तेवढ्यात त्याच्या गळ्यात असलेले ताविज कोणी तरी पकडलं. त्याच्या गळ्याला फास लागला. तो जोर लावून पुढे सरकू लागला पण ताविज तर त्याच्या गळ्यात आणखी रूतत चाललं होतं. पाय घट्ट जमिनीत रोवले. एकदाचा त्याने जोर लावला.
“फट” आवाज करून धागा तुटला आणि अझलान काही अंतर पुढे जाऊन पडला. त्याच्या हातापायाला खरचटलं. झाडाच्या फांदीत अडकलेले ताविज तसंच लटकून राहील.
दम खात तसाच तो गुडघ्यावर रंगात घराकडे गेला. आपल्या बाजूने काही तरी सळसळत गेल्याच त्याला जाणवलं. हळूहळू रात्र ही सरली.
सुबोध घरात एकटाच बसला होता. व्हीलचेअरवर. एक विचित्र प्रकारची शांतता होती घरात. सुबोध पवनच्या येण्याची वाट बघत बसला होता. एकटाच होता तो घरात. बाकीचं कोणीही नाही त्याला दिसलं. समोर पाहिले तर समोरून पवन येत होता. पवन घरात आला. पवनने सुबोधकडे पाहिले त्याचा चेहरा खूप पडलेला आणि अस्वस्थ दिसत होता. जणूकाही तो रात्रभर झोपला नाही. पवनने त्याच्याकडे एकटक पाहिले आणि हळूच त्याच्या जवळ येऊन बसला आपले दोन्ही हात व्हीलचेअरवर टेकवले. पवन खाली बसला आणि त्याने विचारले,
“काय रे! असा का बसला आहे?”
तर सुबोध काही बोलला नाही. सुबोधचा चेहरा बघून त्याला काळजी वाटली
“तुझी तब्येत ठीक नाही का?”
सुबोध गप्प होता. पवन स्वयंपाक घरात गेला आणि फ्रीजमधून ज्यूस काढून आणला आणि सुबोधला दिला. सुबोधला जरा तरतरी आल्यासारखे झाले. पवनला पण एक प्रकारची विचित्र शांतता घरात जाणवत होती. घर जरा अस्वच्छ ही वाटत होते. वाटत होतं की घरात ते दोघेच आहेत त्याने परत सुबोधला विचारले,
“टिन्या कुठे दिसत नाही?”
“मला दिसला नाही मी आज उशिरा उठलो लगभग दुपारी. टिंग्या आणि अझलान दोघेही नव्हते.”
पवन म्हणाला “अरे अझलान तर सकाळीच निघून गेला. त्याने तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तू काही उठला नाही, तो घाईत होता म्हणून त्याने मला तसा मेसेज केला की सुबोध झोपलाय तर मी भेट न घेता निघतोय एअरपोर्टला पोहोचलो की तुला मेसेज करतो. आणि हे बघ त्याचा थोड्यावेळापूर्वी मेसेज आला की तो सुखरूप पणे पोहोचला.” पवनने सुबोधला मेसेज दाखवला.
” पण टिन्या दिसत नाही तो कुठे गेलाय?” घरभर नजर फिरवून पावन म्हणाला. “घर सुद्धाअस्वच्छ ठेवलाय.”
“माहित नाही काल रात्री तर होता. पण सकाळी दिसला नाही तसेही मी सकाळी झोपेतच होतो.”
“असं दिसतस की तुझी झोप पूर्ण झाली नाही” खांद्यावर हात ठेवत पवनने विचारलं.
“तुला कसं सांगु कळेना झालंय काय झालं?”
“बोल ना” पवन शांतपणे म्हणाला.
“काल मला खूप काळ झोप लागली. एक प्रकारची गुंगी वाटण्यासारखं झालं. मी झोपी गेलो पण अचानक रात्री एक विचित्र आवाज घुमत होता तो ऐकून मी उठलो. बाहेर पाहिलं तर नीट काही दिसला नाही पण नंतर मला झोपच लागली नाही मी डोळे मिटले पहाट झाली असावी त्यामुळे उशिरा उठलो मी.”
“तू तुझी औषध वेळेवर घेतेस ना? मी काही दिवस तुझ्या औषधांकडे लक्ष दिला नाही.”
“मी घेतो, तू काळजी नको करूस”
पवनने सुबोधला त्याच्या खोलीत नेले आणि तोही जाऊन आवरू लागला. स्वतःची खोली पण आवरू लागला मोबाईल घेऊन अजलानला मेसेज केला पोहोचलास का घरी? काही मिनिटांनंतर त्याला रिप्लाय आला. हो. आराम करतोय आता नंतर बोलू या. सुबोधची काळजी घे आजारी वाटत होता तो. मेसेज वाचून पवनने उसासा सोडला आणि बेडवर आडवा झाला.
सुबोध आणि पवन दोघेही टिण्याची वाट पाहू लागले पण संध्याकाळ झाली तो काय आला नाही. पण पवनला राग मात्र खूप आला.
“मला अजिबात वाटलं नव्हतं तो घर असं न सांगता सोडून जाईल. कुठे गेला असावा? तो जाऊच कसा शकतो? पवनसाठी काहीही न बनवता, सगळ्या खोल्या तशाच साफ न करता. उद्या येऊ दे त्याला त्याला बघतोच त्याच्याकडे.”
पवन येरझार्या घालत दिवाणखान्यात फिरत होता घाईघाईने व्हीलचेअर सरकवत सुबोध आला दिवाणखान्यात.
“पवन पवन इकडे ये!” धापा टाकत त्याने पवनला आवाज दिला.
पवनने विचारलं “काय झालं?”
सुबोध त्याला खेचत म्हणाला, “लवकर माझ्या खोलीत पण एक विचित्र प्रकारचा आवाज येतोय.”
दोघेही तडक सुबोधच्या खोलीत आले. एक हलकासा हुंकार त्यांना ऐकू येत होता. पवनने बाहेर पाहिलं डोकं बाहेर काढून पाहिलं कानोसा घेतला ही आवाज काही नीट ऐकू आला नाही. तो खोलीच्या मध्यभागी शांत उभा राहिला आपला कानामागे हात घेऊन तो आवाजाची दिशा शोधू लागला. घराच्या एका भिंती मागून आवाज येतोय असं त्याला जाणवू लागलं. तो भिंतीजवळ गेला तर खाली सरकला आवाज त्याला जरा अजून स्पष्ट ऐकू येऊ लागला. सुबोध एकटक हे सगळं दृश्य बघत होता.
पवन आता डोळे बंद करून आपला कान खोलीची जमीन आणि भिंत जिथे एकत्र होते अशा कोपर्यात लावून ऐकू लागला. आवाज तळघरातून येत होता. एक प्रकारचा खडखडाट होता तो. पवन दिवाणखान्यात आला आणि खालच्या तळघराचा दरवाजा उघडून लागला. त्या तळघराच्या दरवाजा घट्ट बसला होता खूप जोर लावून त्याने तो उघडला आणि आत गेला.
आत गेला आत जाताच तळघराकडे जाणार्या पायर्या सुरू झाल्या. आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्याच्यापाठोपाठ सुबोध देखील.
“काय करतोयस? तू आत का जातोय” सुबोधने विचारलं. पवनने त्याच्याकडे पाहिलं नाही.
“आत कोणीही असू शकतं नको जाऊस” सुबोध घाबरत म्हणाला. पण पवनने त्याचं काही ऐकलं नाही.
पायर्याला लागून असलेले दोन्ही भिंतींवर हात चाचपत पवन खाली उतरत होता. लाकडी भिंतींवर असलेल्या भिंती आणि त्याची जळमटे त्याच्या हाताला लागत होते. त्याचे हात इथे कुठे बटन आहे का ते शोधत होते शेवटी पायर्या संपल्या आणि समोर आला काळा मिट्ट अंधार. त्याचा बरोबर स्पष्ट हुंकार.
“घऊउहहहहहहहहहहहह घहहहहहहहहहह उममममहहहहहहहहह हम्मम्म्मम्म्मम्म”
अगदी कोणी नाका समोर येऊन उभा राहिला तरीही दिसणार नाही असा अंधार तरीदेखील भिंतींचा आधार घेत पवन आपला हात सरकवत भिंतींवर कुठेतरी दिवे चालू करायचे बटन मिळतय का शोधत होता. तो आवाज पण आता त्याला पूर्ण ऐकू येत होता. अचानक त्याच्या हाताला कसलीतरी जाणीव झाली सगळी बटण चालू केली. पण एकच अंधुकसा दिवा त्या तळघरात चमकू लागला.
त्याचा प्रकाश तळघरातल्या वस्तू डोळ्यास पडाव्या एवढा नक्की होता. तळघरात पवनच्या काही जुन्या वस्तू होत्या तर काही जुन्या मालकांच्या. त्यातलं एक कपाट होतं खूप जुन मूळ मालकाचा होते बहुतेक. सगळ्या वस्तू तळघराच्या भिंतीला चिटकवून ठेवल होत्या. तळघराच्या मागच्या भिंतिलाच लागून असलेल्या वरच्या छताला थोडीशी फट होती. परसात मागून येण्या-जाण्यासाठीचा दरवाजा होता तो.
“काय करतोयस खाली वर ये” सुबोध बाहेरून ओरडत होता.
पण खाली तळघरात पवन त्या कपाटाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तो काहीच अंतर दूर होता कपाटापासून. ते कपाट थरथरत होत. त्याचा लाकडाचा गडद रंग त्याची मजबुती दर्शवत होता. त्याचे दरवाजे एक कडीने बंद होते. कपाटाचा दरवाजाला अर्ध्यापासून वर तिरप्या फळ्या लावल्या होत्या. दोन फळ्यांमध्ये फट होती. कदाचित हवा खेळती राहायला म्हणून तस असेल.
एक एक पाऊल पवन जस पुढे टाकत होता तस ते कपाट जोर जोरात ओरडत होत. हालत होतं. त्याच्या कंपनाने बाजूच्या वस्तू पण हलू लागल्या.
पवनला नक्की आपला आवाज नाही ऐकू जात या विचाराने सुबोध तळघरच्या दरवाजाकडे सरसावला. कसाबसा तो आत केला. पण अंधार्या पायर्या पाहून तिथेच थांबला.
“पवन” त्याने जोरात आवाज दिला.
पवनला काही कळत नव्हत ते कपाट उघडावे की नाही. पण आता त्याचा निर्णय झाला होता. तो कपाट उघणार नव्हता कारण त्या कपाटाच्या फटी मधून रक्त येत होतं. थेंब थेंब करत आता रक्ताच्या सरी ओघळू लागल्या होत्या. तेवढ्यात एक रडक्या किंकाळीने पवनच लक्ष मागे खेचलं.
“पवऽऽऽsन” त्याने आवाज ओळखला.
तो सुबोधचा आवाज होता. तो सगळं सोडून वर पळाला. दरवाजात असलेल्या सुबोधला पवन बाहेर घेऊन आला. सुबोध ओक्साबोक्सी रडत होता. त्याचा चेहरा रडत लाल झाला होता.
“मी किती आवाज दिला तुला काय झालं असत तर खाली काय होत? काय होत खाली. त्याने तुला काही केलं असत तर?” सुबोध एका दमात म्हणाला. त्याचा स्वर रागाचा होता.
पवनने त्याचे डोळे पुसले. आपले हात गालावर ठेवत तो सुबोधला म्हणाला,
“तू घाबरू नकोस. तुझ्या खोलीत जा. जोपर्यंत मी नाही येत बाहेर नको येऊस.”
” पण तू जातोय कुठे?”
“रघुकडे.”
पवन आपल्या थरथरत्या हाताने गाडी वेगाने गावाच्या दिशेने पळवत होता कानावर फक्त आणि फक्त रघुचे शब्द पडत होते. तू नुसता दरवाजा नाय उघडला. मृत्यूचा दरवाजा उघडलाय. लवकर या घरात परत मृत्यू तांडव करल. तू माझ्याकडं येशील पण लय उशिर झाला असलं त्यावेळी.
अजून उशिर नको व्हायला तो स्वतःशी म्हणाला. स्वतःच्या चेहर्यावरची भीती लपवत तो बाहेर पडला होता. म्हातार्या रघुकडे जाऊन तो पाय धरून माफी मागणार होता. त्याच हे नेबळ रूप त्याला सुबोधच्या समोर नव्हतं आणायचं. घाबरलेल्या सुबोधला कळालं की टिन्या समोर रूबाब झाडणारा, हुशार बनणारा त्याचा पवन प्रत्यक्षात किती घाबरट आहे तर काय होईल या भीतीने त्याने सुबोधला घरीच राहायला सांगितल.
पवन गावात आला पण त्याला रघु भेटला नाही. त्याच उसनं अवसान पण गळून पडलं. रघुच अर्ध वाक्य खरं झालं होतं आणि आता अर्ध? नाही नाही ते नाही होऊ शकत. मनात काहीबाही विचारांची सरमिसळ करत तो परतिच्या मार्गावर वळला होता.