काही महिने असेच गेले. सुहासचं येणे जाणे नित्याचे झाले. आता मोहिनीला ही त्याची सवय झाली होती. तो एखादे दिवस आला नाही तरी मोहिनीला चुकल्या चुकल्यासारखे वाटत असे.
असाच एके दिवशी तो आला नाही म्हणून मोहिनी त्याला पहायला त्याच्या घरी गेली. तिने दाराची बेल वाजवलीपण बराच वेळ गेला दरवाजा उघडला नाही. तिने बाहेरूनच सुहासला हाक सुद्धा मारली. तरीही आतून काही प्रतिसाद मिळाला नाही.
कुठे गेला असेलं हा? मोहिनी विचार करू लागली. असं कधीच झालं नव्हतं. सुहास सहसा दुपारच्या वेळी कुठे जात नव्हता. एक तर मोहिनीच्या घरी येऊन गप्पा मारायचा किंवा स्वतःच्या घरी आराम करायचा.
बराच वेळ वाट पाहून, कंटाळून ती निघणार, इतक्यात तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्याबरोबर मोहिनीची पावलं पुन्हा मागे वळली व दारातूनच म्हणाली,
“काय रे किती वेळ लावला दरवाजा उघडायला? काय करत होता इतका.”
बोलता बोलताच ती सुहासची अवस्था पाहून जवळ जवळ किंचाळलीचं. “सुहास सावर.” असं म्हणून तिने पटकन त्याला धरले, अन्यथा सुहास कोसळलाच असता.
तिने तसंच त्याला सावरत बिछान्यावर झोपवले. त्याला सावरताना तिच्या शरीराला तसेच हातांना झालेल्या त्याच्या स्पर्शात तिला चांगलाच चटका जाणवला. सुहासला भयंकर ताप होता. त्याच्यात उठण्याचे त्राण राहिले नव्हते.
तिने ताबडतोब दुध गरम करून त्याच्याबरोबर काही बिस्कीटं त्याला भरवली. त्याचबरोबर घरातून एक क्रोसिनची गोळी आणून त्याला घेण्यास भाग पाडले व आराम करायला सांगून काही वेळ मिठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर घातल्या. थंडी लागत होती म्हणून पांघरून घेऊन झोपायला सांगितले व त्याच्या शेजारी बसून राहिली.
तासाभरात सुहासला जाग आली. मोहिनीने त्याच्या डोक्याला हात लावून पाहिला. ताप उतरला होता. सुहासने पांघरून काढले. त्याचा शर्ट घामाने पूर्ण ओला झाला होता. मोहिनीने त्याला शर्ट बदलायला सांगितले.
पण सुहासमध्ये अजूनही तितकेसे त्राण नव्हते. लाजाळू सुहास, “नको नको, ” म्हणत असताना सुद्धा मोहिनीने त्याचा शर्ट उतरवला व अंगावरचा घाम पुसून दुसरा शर्ट अंगावर चढवत ती त्याला म्हणाली,
“सुहास, आता आराम कर तोपर्यंत मी गावठी तांदळाची पेज बनवून आणते. म्हणजे थोडी अंगात ताकद येईल. पडून रहा असाच, मी आलेच काही वेळात.” असं म्हणून ती घरी निघून गेली व काही वेळातच गरम पेज घेऊन आली.
ताप गेल्यामुळे सुहास बऱ्यापैकी सावरला होता. मोहिनीने आणलेली पेज घेतल्यावर बरीच तरतरी आली. काही वेळातच छान गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता मोहिनीचे आभार मानत तो म्हणाला, वाहिनी आज तुम्ही वेळेवर आलात म्हणून, नाहीतर आज माझे काही खरे नव्हते.
“सकाळपासूनच कणकण भासत होती. थंडी सुद्धा वाजत होती. कसाबसा घरी पोहचलो आणि नंतरच तुम्हाला माहितचं आहे काय झालं ते?”
त्याच्या आभारावर मोहिनी उत्तरली,
“अरे आभार कसले मानतो. माझं कर्तव्यच होते ते. तू नाही का मला प्रत्येक कामात मदत करतो, तशीच आज मी तुला केली त्यात काय इतकं?पण हो. एक कर हा… संध्याकाळी डॉक्टरकडे जा. नाहीतर चल माझ्या बरोबर मीच नेते तुला.”
मोहिनीच्या बोलण्यावर सुहास चाचरत म्हणाला,
“नको वहिनी. आज माझ्यासाठी तुम्ही खूप काही केले. बघा ना माझ्यामुळे तुम्हाला दुपारची झोप सुद्धा मिळाली नाही. तुम्ही काळजी करू नका. आई आल्यावर मी जाईन डॉक्टरकडे. आता तुम्ही सुद्धा आराम करा ताप उतरलाय माझा. काही लागलं तर सांगेन. नक्की सांग हा.”
“चल संध्याकाळी येते. आराम कर तू.” असं म्हणून ती निघून गेली व सुहास निवांत बिछान्यावर पहुडला.
मोहिनी संध्याकाळी पुन्हा सुहासला बघायला आली. सुहासची आई घरी आली होती मात्र सुहास अजून तसाच पहुडला होता. घरात येताच मोहिनीने सुहासच्या आईला विचारले,
“काय म्हणतेय सुहासची तब्बेत?”
तिच्या प्रश्नावर सुहासची आई उत्तरली, “तसा बरा आहेपण अजून कणकण आहे. आता डॉक्टरकडेच घेऊन जातेय. बरं झालं दुपारी तुदेवासारखी धावून आली म्हणून. नाहीतर पोराचं काय झालं असतं कल्पना करवत नाही.”
सुहासच्या आईचे बोल ऐकून मोहिनी उत्तरली,
“देवासारखी वगैरे काही नाही मी फक्त शेजार धर्माला जागले. जसा सुहास आणि तुम्ही जागता अगदी तसच. पण एक बरं झालं त्याला पाहण्याची मला सुबुद्धी झाली. म्हणून निदान वेळेवर गोळी देता आली. नाहीतर एव्हाना तापाने पुरता गर्भगळीत झाला असता.”
मोहिनीच्या बोलण्यावर सुहासची आई हसली व म्हणाली,
“म्हणूनच म्हणाले ना अगदी देवासारखी धावून आलीस. मी घरी येताच सुहासने मला सर्व सांगितले. चल त्याला आधी डॉक्टरकडून आणते मग निवांत बोलू.”
सुहासच्या आईच्या म्हणण्याला दुजोरा देत मोहिनी तिला म्हणाली, “एक काम करते मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. गप्पाच्या गप्पा होतील शिवाय पायही सुद्धा मोकळे होतील. घरात बसून बसून अगदी कंटाळा येतो.”
मोहिनीच्या आर्जवाला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता सुहासची हसत म्हणाली,
“चल तर सोबत मला ही बरं वाटेल.”
सुहासला घेऊन दोघी डॉक्टरकडे आल्या डॉक्टरने तपासून एक इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. “खबरदारी म्हणून उद्या सकाळी रक्त तपासणी करून घ्या आणि रिपोर्ट मला दाखवा.” असही म्हणाला.
डॉक्टरला रूकार देऊन सुहासची आई आणि मोहिनी सुहासला घेऊन घरी निघाल्या. घरी येता येता मोहिनीने बाजारातून किलोभर सफरचंद खरेदी केले व सुहासच्या आईकडे देत म्हणाली,
“तापामुळे सुहासच्या तोंडाला चव नसेल ना. म्हणून ही सफरचंद त्याला खायला द्या म्हणजे कमजोरी वाटणार नाही.”
मोहिनीने पुढे केलेली सफरचंद सुहासच्या आईने आढेवेढे घेत स्वीकारली व काही वेळातच तिघांची स्वारी घरी दाखल झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनीच्या दाराची बेल वाजली. मोहन नुकताच कामावर निघून गेला होता. तोच काहीतरी विसरला म्हणून पुन्हा घरी आला असेल असं समजून ती दरवाजा उघडता उघडता म्हणाली,
“मोहन आता काय विसरला. तरी तुला… ”
इतकं बोलून समोर सुहासच्या आईला पाहून बोलता बोलता थबकली. काहीसे चिंतीत भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले. तेच भाव प्रश्नरूपी तिच्या मुखातून बाहेर पडले,
“अरे सुहासची आई! या आत या. सकाळीच आलात? सुहास बरा आहे ना? ताप उतरला का त्याचा?”
“अगं हो. हो. एका वेळेस किती प्रश्न विचारशील?”
“नाही. सकाळीच आलात ना म्हणून थोडी चिंता वाटली”
“काही चिंता करू नको. तसा सुहास बरा आहे. हा. ताप चढतो उतरतो आहे. पण अजून एक दिवस डोस घेतला तर होईल बरा.”
“तरीपण रक्त तपासणी करायला हवी ना?”
“हो तर. त्यासाठीच तुझ्याकडे आले.”
“म्हणजे?”
“अगं खर तर आज सुट्टी टाकणार होतेपण जमत नाही आहे. जाणं भाग आहे. म्हणून तुझी मदत घ्यायला आले. तुजाशील का सुहासबरोबर पॅथॉलॉजीमध्ये? म्हणजे तुला वेळ असेल तर?”
“काय तुम्ही पण? शिष्टाचार कसले पाळताय? जाईन ना. त्यात काय? मला कुठे कामावर जायचं आहे?”
“अगं तसं नाही. तुला सुद्धा घरची कामं असतील ना?”
“इन मीन दोन माणसांची कसली आलीत कामं? आणि असली तरी नंतर करता येतील.”
“तसा सुहास जाईल एकटा. तो म्हणतो आहेच तसापण मेलं आईच काळीज आहे ना? अशा अवस्थेत कसं पाठवू एकट्याला?”
“बरोबर आहे तुमचं? तुम्ही काळजी करू नका मी जाईन त्याच्याबरोबर. वाटल्यास नंतर रिपोर्ट सुद्धा घेऊन येईन. तुम्ही निश्चिंत मनाने कामावर जा.”
“आता तू जोडीला आहेस म्हटल्यावर काळजीच मिटली बघ. मग ठीक आहे मी सुहासला सांगते तसं आणि कामावर जाते. अधून मधून लक्ष टाक घराकडे.”
“हो. तुम्ही काही काळजी करू नका. मी पाहते सर्व.”
निश्चिंत झाल्या सुहासच्या आईने एक चावी तिच्याकडे दिली व ती कामावर निघून गेली. चावी देण्यामागचा उद्देश हा होता की, यदा कदाचित सुहास झोपून राहिला तर तिला ताटकळत रहायला लागू नये.
मोहिनीने अर्ध्या तासात घरातील सर्व कामं भराभर आवरली. व तयारी करून ती सुहासच्या घरी आली. नशिबाने तिला ताटकळत राहावे लागले नाही. बेल वाजताच सुहासने दरवाजा उघडला. एकंदरीत घरातील स्थिती पाहून ती सुहासला म्हणाली,
“काय रे अजून तयार नाही झाला? आणि हे काय अजून लोळत पडला आहेस? बरं व्हायचं नाही वाटते तुला?”
“नाही उठलोच होतो. पण आवरा आवर करण्याच्या आत तुम्ही आलात.” सुहास चाचरत म्हणाला.
“बरं. बरं. तू तयारी कर. मी आवरते सर्व.” असं म्हणत ती चादरीची घडी घालू लागली.
सुहास तिच्या हातातील चादर ओढत म्हणाला,
“नको वाहिनी. राहू द्या मी करतो.”
सुहास चादर घेतोय हे पाहून तिने ती घट्ट धरून आपली बाजूला ओढली त्या बरोबर तापाने कमजोर झालेला सुहास तिच्याकडे खेचला गेला. नकळत मोहिनीच्या अंगाला त्याच्या शरीराचा स्पर्श झाला. त्याबरोबर कावरा बावरा झाला सुहास चादर सोडून झटकन बाजूला झाला.
त्याची भांबावली अवस्था मोहिनीने जाणली व त्याचा ताण हलका करण्यासाठी म्हणाली,
“काय रे अजून ताप आहे तुला? औषध वेळेवर घेतोस ना? आणि किती कमजोरी आलीय? नुसती चादर खेचली तर इतका धडपडला? सांगितलं होतं ना मी आवरते म्हणून? जा आता लवकर तयार हो मी आवरून घेते.”
आता मात्र सुहास काही न बोलता तयारी करायला गेला. तो तयारी करून येईपर्यंत मोहिनीने घर आवरून घेतले व सुहास येताच त्याच्या बरोबर पॅथॉलॉजीच्या दिशेने निघाली.
रक्त तपासणीच्या सर्व चाचण्या पार पाडून मोहिनी सुहासला घेऊन घरी आली. प्रवासामुळे त्याला बराच थकवा जाणवत होता, हे एकंदर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात येत होतं. मोहिनीने त्याला बेडवर झोपवले. ताबडतोब दुध आणि बिस्किटे त्याला भरवली.
दुध बिस्किटे खाऊन सुहासच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी तरतरी आली. ते पाहून मोहिनीला हायसे वाटले व ती म्हणाली,
“सुहास, आता तू आराम कर, आणि हो आधी त्या गोळ्या घे मग झोप.”
मोहिनीचे बोलणे ऐकून सुहास गोळ्या घेण्यासाठी झेपावलापण गोळी घेता घेता धडपडला. ते पाहून मोहिनीने चटकन त्याला सावरले व गोळ्या त्याच्या हातात देत पाण्याचा ग्लास आणून दिला. गोळ्या घेऊन सुहास बिछान्यावर पहुडला. ते पाहून मोहिनी पुन्हा म्हणाली,
“बरं तू झोप आता मी जेवणाच बघते. पाण्याचा ग्लास आणि ती सफरचंद बाजूलाच ठेवते आहे. भूक लागली तर खा. मी येते दुपारी.”
मोहिनीचे बोल ऐकून सुहासने मूक मान हलवली व त्याने डोळे मिटले.
आज दिवसभर मोहिनीने सुहासच्या सुश्रूषेस वाहून घेतले. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते त्याच्या औषध देण्यापर्यंत इतकंच काय त्याचा संध्याकाळी मिळणारा रिपोर्ट सुद्धा आणायला तीच गेली. तिथून डॉक्टरला दाखवायला सुद्धा गेली.
सुदैवाने रिपोर्ट अगदी नॉर्मल होता. डॉक्टरने मुदतिचा ताप अर्थात व्हायरल फिव्हर असे निदान केले. दोन तीन दिवसात ठीक होईल सांगून काही औषधं लिहून दिली.
मोहिनीने ती औषधं मेडिकल स्टोर्समधून खरेदी केली आणि घरी आली. सुहासची आई तिचीच वाट पाहत होती. मोहिनी येताच तिने काळजीने तिला विचारले,
“काय सांगितले डॉक्टरने? रिपोर्ट काय म्हणतोय? सर्व ठीक आहे ना?”
“हो. हो. सांगते. जरा श्वास तर घेऊ द्या.” मोहिनी हसत म्हणाली.
“तूपण काय आई? जरा निवांत बसू दे त्यांना. सांगतील त्या. पण त्या आधी जरा पाणी वगैरे काही देशील की नाही?”
“अरे हो. विसरलेच बघ. काय करू पोराची काळजी वाटणे स्वाभाविक आहे ना?”
“हो. मी समजू शकते. पण काही काळजी करू नका. साधा मुदतिचा ताप आहे. दोन चार दिवसात बघा कसा उड्या मारायला लागेल. हा बघा रिपोर्ट.”
असं म्हणून संपूर्ण रिपोर्ट वाचून दाखवला.
“चला काळजी मिटली. थांब तुला पाणी आणते आणि जरा चहा सुद्धा ठेवते.”
असं म्हणत मोहिनीच्या प्रतिक्रियेची वाट न पाहताच त्या किचनकडे वळल्या व मोहिनीने आपली नजर रिपोर्टमध्ये खुपसली व रिपोर्ट पाहता पाहता ती सुहासला म्हणाली,
“अरे सुहास. तुझा रक्त गट ओ निगेटिव्ह आहे?”
“हो. का काय झालं?”
“नाही काही नाही. हा रक्त खूप रेअर असतो ना?” मोहिनी विचार करत म्हणाली.
“असेल. पण मला माहित नाही.”
“अरे मी सुद्धा तुला ऐकीव माहितीच पुरवते आहे. मी कुठे वैद्यकीय अभ्यास केला आहे?पण थोडी जुजबी माहिती ठेवावी माणसाने. कधी तरी कामाला येते.”
मोहिनीच्या बोलण्यावर सुहासने स्मित व्यक्त केले इतक्यात आई चहा बिस्किटे घेऊन आली. चहा घेऊन मोहिनी आईचा व सुहासचा निरोप घेऊन तिच्या घरी निघून गेली.
मोहिनी | भाग ४
आपल्याच विचारात हरवलेल्या मोहिनीची तंद्री सुहासच्या हाकेने भंग पावली.“कुठे हरवलात वाहिनी? दोनदा हाक दिली तुमच लक्षच नाही?”“नाही रे सहज विचार करत होते. तुला काही हवं का?”“हो थोडा भात आणि वरण द्या. छान झालंय.”“आवडलं तुला? हे घे.”असं म्हणत तिने ताटात भात वाढला.“हो आवडलं....