अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्यावर असणार्या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वत:च्या चेहर्यावर इतका आनंद पहिला नव्हता.
संध्याकाळी सहा वाजता तिचे ऑफिस सुटणार होते. सहा वाजता जरी ऑफिस सुटणार असले तरी ती आज पावणेसहा वाजता ऑफिसमधून निघायचा तिचा प्लॅन होता. साडे सहा वाजता ती दोघे मरीन ड्राइव्हला भेटणार होते. जरी डेट त्याची साडे सहाला असली तरी ती आताच मनाने त्या डेटपर्यंत पोहोचली होती.
आज तिचे ऑफिसच्या कामात मुळीच लक्ष नव्हते. ती उघड्या डोळ्याने स्वप्न पाहत होती की आजच्या स्वप्नवत डेटमध्ये काय होईल. कधी एकदा मी इंद्रधनुष्यच्या मिठीत स्वत:ला सामावून घेईल. संध्याकाळी घडू शकणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर तिच्या डोळ्यासमोर झर्रकन उभे राहत होते.
सर्व काही साखरेच्या पाकाप्रमाणे गोड वाटत होते, इतक्यातच त्या गोडव्यात मिठाचा खडा पडावा तसे काही खारट घडले. इकडे इंद्रधनुष्य आपल्या रात्रीच्या डेटसाठी खूप एक्साइट होता. त्याच्या मुलाखतीला अजून चार दिवस अवधी होता म्हणून निदान आज तरी त्याने मुलाखतीच्या राऊंडचा विचार बाजूला ठेवला होता. इतक्यात ते घडले ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.
त्याला त्याच नामांकित कंपनीमधून कॉल आला जिथे तो फायनल राऊंडसाठी वीस तारखेला जाणार होता. हा कॉल त्या कंपनीच्या एचआरचा होता. त्या फोनवरून समोरून येणारा आवाज इंद्रधनुष्य बारकाईने ऐकू लागला. त्या कॉलवरील सगळे बोलणे ऐकून त्याचा चेहरा पडला. त्याने पुन्हा त्या एचआरला समजावण्याचे प्रयत्न केले. पण एचआर आपल्या बोलण्यावर ठाम होते. शेवटी त्याने ओके बोलून त्याने फोन कट केला.
जसा फोन कट केला तसा त्याचा चेहरा अजून पडला. सकाळपासून त्याच्या चेहर्यावर दिसणारा आनंद अचानक नाहीसा झाला. तो फोन यासाठी होता की तो ज्या प्रोजेक्टसाठी त्या नामांकित कंपनीमध्ये इंटरव्यू देत होता. ते प्रोजेक्ट त्या क्लायंट गरजेनुसार लवकर इम्पलिमेन्ट करण्याचे ऑर्डर्स आले होते.
त्यामुळे लवकरात लवकर इंटरव्यू घेऊन नवीन एम्प्लॉयी लवकरात लवकर जॉईन करून घेण्यासाठी कंपनी आग्रही होती. त्यामुळे त्या कंपनीने डिसाईड केले होते की जी इंटरव्यू वीस तारखेला होती ती आज म्हणजे सोळा तारखेला प्रेपॉन केली होती.
त्याने एचआरला खूप समजावले पण एचआरने स्पष्ट सांगितले की जर तो या इंटरव्यूसाठी आज आला नाही तर त्याला या पदासाठी कन्सिडर केले जाणार नाही अर्थात त्याला या जॉबसाठी फायनल इंटरव्यू अगोदरच मुकावे लागेल.
इंद्रधनुष्य मोठ्या धर्मसंकटात सापडला. त्याची तशी इंटरव्यूची तयारी झाली होती पण अचानक इंटरव्यू प्रेपॉन झाल्याने तो थोडासा मानसिक रित्या तो कमी पडला होता. कारण खूप कमी वेळ होता. घड्याळात आत दुपारचे तीन वाजले होते. त्यांनी इंटरव्यूसाठी संध्याकाळी सहा वाजता बोलावले होते. यात एचआरने एक सवलत दिली होती की तुम्ही जरा उशिरा आलात तरी चालेल आम्ही सांभाळून घेऊ. पण इंटरव्यू आजच होणार हे मात्र नक्की.
इंद्रधनुष्य ज्याचा आजचा दिवस आरामात रमत गमत चालत होता. तोच इंद्रधनुष्य आता युद्ध पातळीवर घाई करू लागला. कारण आज संध्याकाळीसाठी त्याने कॅज्युल कपडे तयार केले होते त्याऐवजी त्याला आता फॉर्मल घालायचे होते. महत्त्वाचे म्हणजे त्याला कोणत्याही परिस्थितीत सहा वाजेपर्यंत त्या कंपनीत इंटरव्यूसाठी पोहचायचे होते.
तो लगबगीने अर्धा पाऊण तासात आपली तयारी करून इंटरव्यूसाठी घराबाहेर पडला. घड्याळात चार वाजायला आले होते. सहा वाजता त्याची इंटरव्यू होती आणि साडे सहा वाजता त्याला निशा भेटणार होती. जर इंटरव्यू फक्त पंधरा मिनिटात जरी संपली आणि त्याने ओला पकडून मरीन ड्राईव्हला जायचे ठरवले तरी तो साडे सहाला तिथे पोहचणे शक्य नव्हते.
जॉब आणि आपली प्रेयसी यात त्याला एक गोष्ट निवडायची होती. अशी सुंदर चाळीस वर्षांची विवाहित तिलोत्तमाचे महत्व आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीने किती आहे ते आजच्या तरुण पिढीलाच माहित आहे. एखादी व्हर्जिन मुलगी आणि एखादी सुंदर भरीव विवाहित स्त्री यात आजच्या तरुण पिढीचा नक्कीच विवाहित स्त्रीकडे कल जास्त असतो. त्याला इंद्रधनुष्य पण अपवाद नव्हता.
एकदा त्याच्या मनात आले की असे जॉब छप्पन भेटतील पण अशी मादक विवाहित स्त्री पुन्हा उपभोगायला भेटणार नाही. असे त्याचे एक मन सांगत होते तर दुसर्या बाजूला त्याचे मन सांगत होते की अभियांत्रिकीची पदवी मिळवून जवळ जवळ त्याला सहा महिने झाले होते. एखादा इंजिनियर सहा महिने पगाराशिवाय घरी बसतो ही चिंताजनक बाब आहे. शिवाय इतर शेजारी पाजारी त्याला नाव ठेवतात ते वेगळेच.
त्यामुळे लवकरात लवकर जॉबचे आयडेन्टी कार्ड गळ्यात घालणे हे अति आवश्यक झाले होते. त्यामुळे त्याचे दुसरे मन सांगत होते की आज हा इंटरव्यू क्रॅक करणे जरुरी होते कारण हा जॉब आज भेटला तर अशी सुंदर स्त्री त्याच्या जीवनात पुढेही मिळू शकते पण या नामांकित कंपनीमध्ये पुढे असा जॉब मिळेल ही अशक्यच बाब दिसत होती.
शेवटी त्याचे दुसरे मन जिंकले आणि त्याने पूर्ण लक्ष इंटरव्यूकडे देण्याचे ठरवले. आजची डेट कॅन्सल करू असे कॉल करून सांगण्याचे धैर्य इंद्रधनुष्यकडे नव्हते. शिवाय कॉल करून जे भांडण होईल ते वेगळेच त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या होणाऱ्या इंटरव्यूवर होईल हे नक्कीच. म्हणून त्याने तिला कॉल करायचे टाळले.
शेवटी त्याने घाबरत घाबरत तिला व्हाट्सॲपवर मेसेज केला की एका अपरिहार्य कारणामुळे मी आज भेटू शकत नाही. तरी मला माफ करावे. त्याने तिला हा मेसेज साडे चार वाजता पाठविला आणि निशाने हा मेसेज वाचताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने एक आठवड्यापासून जी स्वप्ने रंगवली होती ती अचानक धुळीला मिळाली होती.
तिने त्याला याचे उत्तर विचारण्यासाठी कॉल केला पण त्याने कॉल उचलण्याचे धाडस केले नाही किंवा त्याने रिस्पॉन्स म्हणून स्वत: कॉल सुद्धा केला नाही. त्यामुळे तिला त्याचा अधिकच राग आला. तिच्या मनात ब्रेकअपचे वारे वाहू लागले.
ती आपल्या टेबलवर डोके ठेवूनच चिंताग्रस्त होती इतक्यातच तिच्या केबिनमध्ये तिला रिपोर्ट करणारा एक कलीग आला आणि तिला कंपनी हेडने मिटिंगसाठी बोलावले आहे असे सांगितले. तिने लगेच प्रसंगावधान राखून आपला लॅपटॉप घेऊन आपल्या कंपनी हेडच्या केबिनमध्ये मिटिंगला गेली.
ही अचानक बोलावलेली मिटिंग होती ज्यात अजून पण कंपनीमधील महत्त्वाचे पदाधिकारी होते. निशाची कंपनी खूप दिवसापासून एक महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळावे म्हणून प्रयत्न करत होती. शेवटी ते प्रोजेक्ट काही दिवसापूर्वी निशाच्या कंपनीला भेटले होते.
हे नवीन प्रोजेक्ट फार सेन्सिटिव्ह होते कारण यात एक पण चूक मान्य नव्हती. या प्रोजेक्टला रोहित सर लीड करणार होते पण अचानक त्याच्या घरी काही न टाळता येणारे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि त्यांना एक मोठ्या सुट्टीवर जावे लागले.
आता कंपनी समोर फार मोठा प्रश्न हा होता की आता रोहित सराच्या अनुपस्थितित हे प्रोजेक्ट कोण हॅण्डल करणार? म्हणूनच ही मिटिंग तातडीने बोलावण्यात आली. या मिटिंगमध्ये खूप विचार विनिमय झाला आणि संध्याकाळी साडे पाच वाजता एकमताने निशाचे नाव संमत झाले.
आता हे नक्की झाले की या नवीन प्रोजेक्टला निशा आणि तिची टीम लीड करणार आहे. निशाला उद्या नाही, परवा नाही तर या क्षणापासून या प्रोजेक्टला लिड करायला सांगितले. निशा मनोमन खुश झाली. ही खूप मोठी जबाबदारी तिच्या कंपनीने तिच्यावर टाकली होती पण जर तिने ही जबाबदारी योग्य हॅण्डल केली तर तिचे प्रमोशन नक्की होते. प्रमोशन पोटी नव्हे तर एखाद्या चॅलेंजप्रमाणे तिने ही जबाबदारी स्वीकारली.
अशा तर्हेने तिची मिटिंग संपली. ती आपल्या केबिनमध्ये आली. तिला खूप छान वाटत होते. तिची डेट कॅन्सल झाली याचे तिला आता काहीच वाटत नव्हते. जर डेट कॅन्सल झाली नसती तर आज मिटिंग ती अटेंड करू शकली नसती किंवा मिटिंग नंतर तिला दिलेल्या नवीन प्रोजेक्टचे काम ती आज करू शकली नसती यामुळे तिला वाटले की जे देव करतो ते चांगलेच करतो. असा ती विचार करत होती इतक्यातच तिचा ऑफिस लँडलाईन फोन खणाणला.
तो कॉल त्या कंपनीच्या कंपनी हेडचा होता. त्याने एक जबाबदारीचे काम नवीन प्रोजेक्टसाठी आजच करायला सांगितले. तिने पण आता तिची डेट कॅन्सल झाल्यामुळे तिलाही कुठे बाहेर जाण्याची घाई नव्हती म्हणून कंपनी हेडला ओके म्हटले आणि जे आजची जबाबदारीचे काम सोपवले त्याचा विचार करू लागली.
इकडे इंद्रधनुष्य प्रवास करत, ट्राफिकचा सामना करत जेमतेम सहा वाजता त्या नामांकित कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहचला. त्याला एचआरने त्या काचेच्या बिल्डिंगमधील बाराव्या मजल्यावर नेले. तिथे ऑलरेडी पाच जण बसले होते आणि तो या स्पर्धेत सहावा होता. या सहा पैकी एक जण फक्त या पदासाठी नियुक्त होणार होता.
आता सहा जण तिथे ठेवलेल्या सोफ्यावर बसले होते. मग एचआरने सांगितले की एका मागोमाग एक त्यांनी केबिनमध्ये जावे. एक इंटरव्यू देऊन आला की दुसरा जाईल. दुसरा आला की तिसरा. याप्रमाणे पाचवा आला की इंद्रधनुष्य शेवटचा कॅन्डीडेट म्हणून त्या इंटरव्यू केबिनमध्ये जाईल.
इंटरव्यू सुरू झाला. एका मागोमाग एक कँडीडेट आत केबिनमध्ये जात होते. इंटरव्यू खूप वेळ घेत होते. प्रत्येकाला २० ते ३० मिनिटे लागत होते. असे करून एका मागोमाग एक जण इंटरव्यू देऊन बाहेर येत होता. असे करून चार जण इंटरव्यू देऊन बाहेर पडले.