हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते.
ह्या ट्रेनचे शेवटचे स्टेशन वाशीच होते. त्यामुळे ट्रेन इथेच रिकामी झाली. नवे प्रवासी काही चढले नाहीत. इतक्यात त्याला गुगल चॅटवर एक मेसेज आला. हा मेसेज तिच्याकडूनच आला होता त्याने चटकन तो वाचला. ती म्हणाली की आय एम इन स्टेशन. त्याने उत्तर दिले की बट वेअर? आय कॅनॉट सी यु. त्यावर ती म्हणाली की कॅच दिस ट्रेन.
तो आश्चर्यचकित झाला कारण ती ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. हळूहळू त्या रिकाम्या ट्रेनचे दिवे ऑफ होत होते. याचा अर्थ ती ट्रेन आता पुढे कारशेडवर जाणार होती. वाशी आणि सानपाडा यांच्यामध्ये एक रेल्वे कारशेड आहे. हे तेच कारशेड आहे, ज्याच्यावर गुलाम चित्रपटाची शूटिंग झाली होती. ज्यात आमिर खान आणि दीपक तिजोरी रेल्वे ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव रेल्वे समोर धावले होते.
इंद्रधनुष्यसमोर पेज प्रसंग ओढून आला होता. त्याला कळत नव्हते की या कारशेडमध्ये जाणाऱ्या ट्रेनला पकडून काय भेटणार आहे? पण तो विचार करत होता त्यातच पुन्हा मेसेज आला की लवकर ट्रेन पकड नाही तर ट्रेन चालू होईल. मग मी तुला कधीच भेटणार नाही. त्यावर तो तिला प्रश्न विचारू इच्छित होता. पण इतक्यात अजून एक मेसेज आला की प्लीज काही प्रश्न विचारू नको आणि लगेच ती ट्रेन पकड.
अजूनही त्याच्या मनाची तयारी झाली नव्हती. नक्की हे काय प्रकरण आहे, आपण कुठे फसले तर जात नाही ना? असे प्रश्नचिन्ह त्याच्या चेहर्यावर, त्याच्या डोळ्यात आणि अखंड शरीरावर स्पष्टपणे दिसून येऊ लागले. इतक्यात ट्रेनचा हॉर्न वाजला. ट्रेन सुरू झाली. ट्रेनने मंद वेगात पुढे चालायला सुरुवात केली.
आता त्याची धडधड वाढली. त्याचे प्रश्नचिन्ह अजून मोठे झाले. ट्रेन की प्लॅटफॉर्म या प्रश्नावर अजूनही तो उभा होता. त्याच्याकडे याचे उत्तर अजिबात नव्हते. त्यावर पुन्हा एक मेसेज आला की तू ट्रेन पकडली नसेल, तर मला आयुष्यभरासाठी गमावून बसशील. त्यावर ट्रेनचा हॉर्न अजून एकदा वाजला.
आता त्याने दोन पावले पुढे सरकावले. जो होगा देखा जायेगा, या फिल्मी वाक्यानिशी त्याने ट्रेनच्या दिशेने धावायला सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर लोक त्याला बघून हसत असतील कारण तो एक अशी ट्रेन पकडत होता, जी कारशेडला जात होती आणि त्यातील लाईट्स ऑफ होत्या. पूर्णपणे ट्रेनमध्ये काळोख होता.
त्याने आपल्या धावण्याचा वेग वाढवला. ट्रेन अजूनही मंद वेगात धावत होती. खरं तर कारशेडला जाणारी प्रत्येक ट्रेन ही मंद वेगातच धावते. प्लॅटफॉर्मवर लाऊड स्पीकरवर पुन्हा पुन्हा सूचना देण्यात येत होती की ही ट्रेन कारशेडला जात आहे. कृपया प्रवाशांनी यात चढू नये. तरीही या सूचनेला छेद देऊन त्याने कशीबशी ही ट्रेन पकडली आणि मागे न बघता त्या काळोख्या ट्रेनमध्ये सामावून गेला.
त्या काळोख्या ट्रेनमध्ये कोणीच नव्हते आणि कोणाला वेड लागले आहे का की अशी ट्रेन कोणी पकडेल. पण असे वेडेपण आज इंद्रधनुष्यने केले होते. अर्थातच त्याला आता खूप भीती वाटत होती. कारण ट्रेन आता वाशी स्टेशन सोडून पुढे जाऊ लागली होती.
ट्रेनमध्ये काळा कुट्ट अंधार होता आणि ट्रेन वाशी आणि सानपाडाच्या मध्यभागी आली होती. मध्येच ट्रेनने उजवीकडे वळली आणि वाशी आणि सानपाडाच्या मध्ये असणार्या कारशेडकडे चालू लागली. त्याला काहीच कळत नव्हते की आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही.
इतक्यात त्याला पुन्हा मेसेज आला की डोन्ट वरी मी पण याच ट्रेनमध्ये आहे मी तुला काही क्षणातच भेटणार आहे. आता इंद्रधनुष्य अजून घाबरला. जणू काहीही भुताटकी तर नाही ना आणि आपण या भुताटकीच्या जाळ्यात अडकलो तर नाही ना?
या सर्व प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. पण वेळेकडे नक्कीच त्याचे उत्तर होते. त्यामुळे वेट ॲड वॉच हाच फॉर्मुला सध्या तरी अवलंब करता येणार होता. इतक्यात सानपाडा कारशेडवर ही ट्रेन थांबली. तो मेसेजची आतुरतेने वाट पाहू लागला. मेसेज अजून आला नव्हता. पण त्या सुनसान जागेवर ट्रेन काळोख आणि इंद्रधनुष्य यांच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हते.
त्याच्या मनातील भुताटकीचे विचार आता त्याच्या चेहर्यावर उमटू लागले होते. तो भयभीत नजरेने दोन्ही खिडकीतून मागे पुढे बघत होता. आता प्रश्न हा होता की जाईसारखी नाकासमोर चालणारी मुलगी या आड मार्गावर का येईल. आणि तिला डेट वर जायचे असेल तर मुंबईमध्ये खूप रोमँटिक जागा आहेत.
मग इंद्रधनुष्यला भुताटकीसारखी आपली फसगत तर नाही ना झाली यावर शंका येऊ लागली. त्याने आपले खिशातील पाकिट आपल्या बॅगेत ठेवले. मोबाईल नीट घट्ट पकडून हातात ठेवला. हे सर्व फार कमी वेळेत घडत होते आणि त्याच्या चेहर्यावरचे भाव प्रत्येक सेकंदानिशी बदलत होते.
इतक्यात त्याला पुन्हा मेसेज आला. त्यात लिहिले होते की तू ट्रेनमधून बाहेर उतर. आता या काळोख असलेल्या ट्रेनमधून बाहेर कुठे उतरायचे? असा प्रश्न आला. पण त्याला आता दुसरा मार्ग उरला नव्हता. शिवाय इथून जर पळ काढायचा असेल तरीही ट्रेनमधून बाहेर येणे भाग होते. तो ट्रेनमधून बाहेर येऊ लागला.
आता ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी नव्हती. अर्थातच त्याला तीन ते चार फुटावरून उडी घ्यावी लागली. ट्रेनला दोन पायाच्या शिड्या होत्या पण त्या अंधारात पायाला गवसणे थोडे अवघड होते. खरं म्हणजे असा प्रसंग आयुष्यात पहिल्यांदाच येत होता.
भीतीमुळे त्याच्या पायाला त्या ट्रेनच्या दोन लोखंडी पायऱ्या गवसणे अवघडच होते. वरून त्याची जी घाबरगुंडी उडाली होती. त्यामुळे त्याने लगेच ट्रेनमधून उडी घेतली आणि तो त्याच्या खाली दोन पायावर पडला. नशीब त्याने आपला एक हात जमिनीवर ठेवून स्वत:ला आधार दिला. पाठीवरची बॅग अजून तशीच होती.
पुढे आता काय हा प्रश्न गेल्या एक तासात त्याला अनेकदा पडला होता. आता तो प्रश्न पुन्हा पडला की व्हॉट नेक्स्ट? ३०-४० सेकंद गेली हा प्रश्न अजूनच ठळक झाला. इतक्यात त्या प्रश्नाला उत्तर आले. तिचा मेसेज पुन्हा आला.
त्या मेसेजमध्ये लिहिले होते ट्रेन ज्या दिशेने काही वेळापूर्वी चालत होती त्याच्या विरुद्ध दिशेला चाल आणि ट्रेनचा शेवटचा महिला डब्बा असेल त्यामध्ये चढ. म्हणजेच त्या मेसेजमध्ये म्हटले होते की कारशेडच्या विरुद्ध दिशेने चालत राहा आणि शेवटचा जो महिला डब्बा दिसेल त्यात चढ.
त्याने पुन्हा त्या मेसेजला प्रायोरिटी देऊन तसेच करायचे ठरवले. तो कारशेडच्या विरुद्ध दिशेने चालू लागला. एक दोन मिनिटे चालल्यावर त्याला शेवटचा महिला डब्बा गवसला. आता त्याला ट्रेन समोर असलेल्या दोन पायऱ्यांवर पाय देऊन चढायचे होते. तो जरा घाबरलाच होता पण त्याने आपल्या पाठीवरची बॅग सावरून ट्रेनच्या दांड्याला दोन्ही हाताने पकडून आपला उजवा पाय त्या अडीच फुटावरील पायरीवर दिला. आता डाव्या पायाने तो ट्रेनमध्ये चढला.
ट्रेनमध्ये चढताच त्याने आपल्या पाठीवरची बॅग सरळ केली. आपला मोबाईल खिशात नीट ठेवला. तो डब्यात चढताच तो मागे पुढे बघू लागला. त्याने उजवीकडे बघितले त्याला कोणीच दिसले नाही. त्याला वाटले की फसगत तर झाली नाही ना?
इतक्यात त्याच्या मागून कोणीतरी शुक शुक केले. तो दचकला. त्याने विद्युत वेगाने मागे बघितले. मागे डब्याच्या शेवटच्या सीटवर एक आकृती बसली होती. त्या आकृतीवरून नक्कीच कळत होते की ही आकृती स्त्रीची आहे म्हणजे जर ही भुताटकी असेल तर हे स्त्रीचे भूत असू शकते. बघूया तरी स्त्रीचे भूत कसे असते? त्याचा फिगर कसा असतो? तिचे पाय उलटे असले तरी चालेल पण फिगर मस्त असला पाहिजे अशा प्रश्नांनी त्याच्या डोक्यात विचारसत्र चालू होते.
त्या काळोखात आकृतीने आपल्या हाताने त्याला जवळ बोलावले. तो त्या आकृतीकडे जाऊ लागला. आकृतीच्या जवळ आला आणि त्या काळोखात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण बाहेरून येणार्या चंद्र प्रकाशामुळे तिच्या अंगावर एक पंजाबी ड्रेस होता इतपत नक्कीच समजत होते.
आत काळोख होता म्हणून नक्की फिगर सांगता येणार नाही. पण आकृतीवरून फिगर चांगलाच असेल याची खात्री होती. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्त्रीने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. हा तोच जांभळा रंग ज्याच्यामुळे इतका मोठा प्रणयाचा खेळ घडून येत होता.
आता या नात्याचा पडदा उघडणार होता. तो ज्या जांभळ्या रंगाची वाट पाहत होता तो रंग आज त्याला भेटणार आहे की नाही याची त्याला प्रचिती येणार होती. तो त्या आकृतीकडे बघून बोलला की जाई मला या अशा ठिकाणी का बोलवले आहे? नक्की तुला काय सुचवायचे आहे?
त्याने अपेक्षा केली की तिथून याचे उत्तर येईल. पण दहा ते पंधरा सेकंदाचा एक निरव शांतता होती. तिकडून काहीच उद्गार आले नव्हते. आता नक्की कसे समजायचे की जाईच्या मनात काय आहे आणि अचानक या नाट्यावरचा पडदा उघडला गेला.