रात्रीचे अकरा वाजले होते तरी विराटचा पत्ता नव्हता. अनघा त्याची वाट पाहत बसली होती. संजना घरी नाही म्हणूनच तो उशीर करतोय यायला, हे अनघाला समजलं होतं. शेवटी तिने विराटला फोन केला.
(विराट एकटाच बारमध्ये पित बसलेला…)
विराट: ह… हॅलो…
अनघा: अरे विराट किती वाजले बघ!! मी कधीपासून वाट पाहत आहे. खूप उशीर झाला आहे, ये बरं लवकर घरी…
विराट: किती वाजलेत ते मला माहीत आहे… पण तू माझी वाट पाहत आहेस?? परत बोल ना अनघा!! खरं सांग, वाट पाहत आहेस ना??
अनघा: हो विराट अरे सातला घरी येणारा तू, आज अकरा वाजून गेलेत. काळजी नाही वाटत का सांग?? ये बरं लवकर…
विराट: (नशेत) येतो ना घर… री…! तू वाट पहातेस ना माझी. एरवी माझ्याकडे पाहत पण नाहीस बोलतही नाहीस. अनु आलोच मी…!
आज विराटने घेतली वाटतं. बोलणं पण आज जरा वेगळंच होतं. असा तो वागत नाही आज काय झालं याला? एक तर संजु घरी नाही आणि त्याचं बोलणं, त्याचं लक्षण, मला ठीक वाटेना. पण मला सावरून घ्यावं लागेल. एक तर संजु आणि त्याच्यात जवळीक पण उशीराच आली होती, माझी अडचण नको म्हणून मी माहेरी पण गेले पण किती दिवस राहणार. दोन महिन्यात परत यावं लागलं.
संजुचा फोटो दाखवला त्याने तेव्हा तो म्हणाला होता, तू सांगतेस म्हणून लग्न करतोय. पण जे घडत जाईल त्याला तू सामोरं जायचं. लग्न झालं तरी ते लवकर बोलत नव्हते पण आता सगळं नीट वाटतंय पण तरीही काहीतरी अपूर्ण वाटतं.
राहिला प्रश्न माझा तर मी विराट शिवाय जगणं शिकले आता. त्याचे आणि माझे ते प्रेमळ क्षण हीच माझी हक्काची मालमत्ता आहे, त्यानेच सुखावते मी. अजून आठवते मला ती आमची पहिली भेट. कॉलेजमध्ये मी भांडत होते आणि तो होता मला सावरायला. ना ओळख ना पाळख पण मला शांत केलं होतं त्याने. मग मैत्री झाली आणि मग प्रेमाला सुरूवात झाली. मी लपवून त्याचं आवडतं जेवण आणायचे डब्यात आणि तो हौसेने खायचा. मग बागेत भेटणे फोनवर बोलणे चालूच असताना, त्याने मला घरी आणले.
अनघा विचाराच्या तंद्रीत असताना डोअर बेल वाजली. अनघाने दरवाजा उघडला. तिची पांढरी शिप्पत काया काळ्या साडीत लपली होती. केसांची बट आंबाड्याला शोभत होती. बटांमधून दिसणारा तिचा चेहरा म्हणजे काळ्या ढगांच्या मागून डोकावणारा चंद्रच जणु. तो तिला पाहतच उभा राहिला, मग तो आत आला. बेडरूममध्ये जाऊन चेंज केलं आणि बाहेर आला.
अनघाने जेवण गरम केलं. दोघांसाठी वाढून घेतले.
विराट: तू जेवली नाहीस अजून?
अनघा: तुझी वाट पाहत होते. आता येशील, मग येशील पण… असो, चल आता जेव. सगळं आवडीचं जेवण आहे तुझ्या.
विराट: (गालात हसत) काय गरज होती इतकं सगळं करायची?
दोघांनी जेवण केलं. ती किचन आवरून आली. आज घरात ते दोघेच होते. विराट टीव्ही चालू करून बसला होता.
अनघा: मी जाते झोपायला. तू लाईट बंद करून जा झोपायला नंतर.
विराट: लगेच झोपतेस…? बस ना थोडा वेळ…
ती थांबली. टीव्हीवर छान सिनेमा लागला होता. दोघे बघत बसले होते. इतक्यात लाईट गेली आणि अनघा घाबरली.
विराट: अगं घाबरू नकोस… मी बघतो काय झालं…
त्याने मोबाईलची फ्लॅश लाइट लावली आणि फ्यूज चेक केला. पण सगळं नीट होतं. तिने मेणबत्ती लावली आणि जाऊन सोफ्यावर बसली तेही त्याच्या शेजारी. ती शांत होती. काही वेळाने लाईट आली आणि टीव्ही पण चालू झाला. तितक्याच दोघेही समोर लावलेली मेणबत्ती सोबत विझवायला गेलेत आणि त्यांची टक्कर झाली आणि दोघेही हसू लागले.
अजूनही विराट तिला एकटक पाहत होता.
अनघा: असा काय बघतोयस रे?
विराट: तुला मन भरून पाहायला पण मला परवानगी नाही अनु? मी तुला म्हटलं होतं की लग्न नको पण तू असं का केलंस? आज मी संजु सोबत असून पण एकटाच आहे, तेव्हा मी अंदाज लावला की तू किती एकटी असशील. मला तुझी पण गरज आहे गं. मला तुझा गून्हेगार बनवलंस तू स्वतः पण मला मी गिल्ट मधून कसा काढू. त्या दिवशी तू मला वचनात बांधलंस पण मला नकोय आज ते बंधन.
अनघा: संजु चांगली मुलगी आहे आणि तुझ्या आई वडिलांच्या पण काही अपेक्षा आहेत ज्या मी पूर्ण करू शकत नव्हते मग मला तुझं लग्न हे गरजेचेच होते मग त्यासाठी मला एकटेपणाही मंजूर होता.
ती रडू लागली. विराटने तिला जवळ घेतलं. आज विराटच्या मनात काहीतरी आहे याची चाहुल तिला लागली होती. खिडकीतून मंद हवा येत होती. रडताना अनघाच्या चेहर्यावर आलेले केस त्याने बाजूला केले. आज अनघा त्याला जास्तच छान दिसत होती पण तिचा सुकलेला चेहरा त्याला सर्व काही सांगून जात होता.
त्याने तिला मिठीत घेतले. अनघा काही बोलणार तेवढ्यात त्याने तिला गप्प केले, तिच्या ओठांवर हात ठेवून. तीचं डोकं त्याने मांडीवर ठेवलं. त्याने तिचा अंबाडा सोडला आणि तिच्या मऊ केसांमध्ये हात फिरवू लागला. अनघा शांत झाली होती. खिडकीतून आलेल्या हवेने सुखावत होती. हवेने तिचा पदर हलत होता.
दोघेही नि: शब्द… एकमेकांचा सहवास अनुभवत होते. तितक्यात विराटला संजुचा फोन आला आणि तो बाजूला जाऊन तिच्याशी बोलून आला, तोवर अनघा टीव्ही बंद करून स्वतःच्या रूममध्ये निघून गेली. ती दरवाजा बंद करणार तितक्यातच विराटने तिला थांबवले.