नेहमीप्रमाणे आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत ती फुलझाडांना पाणी घालत होती. लग्न झाल्यापासून तिच्या जीवनात हाच काय तो विरंगुळा होता. आजूबाजूची बाग फुलविणे आणि फक्त मोबाईलवर तेही फक्त मैत्रिणींशी गप्पा मारणे. तिच्या कोमल नाजूक चेहर्यावर उगाचच प्रौढत्वाच्या खुणा दिसू लागल्या होत्या! डोळ्याभोवती काळी वर्तुळे वरवर अधिकच गडद होऊ लागली होती.
मन उदास असलं की सौंदर्याला आपोआप उतरत्या कळा लागतात. एक अवखळ अल्लड मुलगी दोन तीन वर्षात अगदी वयस्कर वाटू लागली होती. सगळी भौतिक सुख तिच्या पायाशी लोळण घेत होती. पण पोपटाला पिंजरा लोखंडाचा असला काय किंवा सोन्याचा असला काय, शेवटी तो पिंजराच! अनेकदा अगदी आत्महत्याचे विचारही तिच्या डोक्यात येत पण मागे आता एक मुलगी होती.
दिवसेंदिवस तिची घुसमट वाढतच चालली होती. दिवसभर तासंतास ती स्वत:चा भूतकाळ आठवत स्वत:च्या नशीबाला दोष देत बागेतील कोपऱ्यातल्या झोपाळ्यावर बसून राही.
अख्खा गाव वहिनीसाहेब म्हणून तिच्यासमोर मान झुकवत असे पण तिला त्याचं काहीच नव्हतं. हात पाय कापून एका खोलीत टाकलेल्या धडासारखं तीचं जगणं होतं. सगळ्या झाडांना पाणी घालून झाल्यानंतर ती तिच्या झोपाळ्यावर येऊन बसली आणि नेहमीप्रमाणे विचारात बुडून गेली.
कोमल, ज्युनियर कॉलेजातली सगळ्यात अवखळ आणि खोडकर मुलगी. तिला शांत बसणं कधी माहितीच नव्हतं. अगदी बिनधास्त आणि बेधडक! सगळे तिला भिंगरीच म्हणायचे. दिसायला तशी बरी. नाजूक चेहरा, बारीक अंगकाठी, नावासारखाच कोमल आवाज! तिच्या दिसण्यामुळे नाही पण तिच्या वागण्या बोलण्याने ती कुणालाही प्रेमात पाडेल अशीच.
वर्गातील डझन दोन डझन पोरं तिच्या मागे भिरभिरायची. पण त्यांच्या हाती लागेल ती भिंगरी कसली. ती त्यांच्या फिरक्या घेत ते भिरभिरतच राहतील याची पुरेपूर काळजी घ्यायची.
तिचे वडील अण्णा आपटे त्याच शाळेत क्लार्क होते. एक दिवस कुणाची तरी दृष्ट लागली आणि गावचे पुढारी अप्पासाहेब धनावडेंचा मुलगा उदयसिंहांची नजर तिच्यावर पडली.
एके दिवशी अचानक आप्पासाहेबांचा एक माणूस घरी निरोप घेऊन आला. ‘आप्पासाहेबांनी ताबडतोब बंगल्यावर बोलावलं आहे!’ तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
एखाद्याला उभ्या उभ्या जीवानिशी मारायलाही पुढे मागे न बघणारा माणूस म्हणजे अप्पासाहेब! त्यांनी भेटायला बोलावणं म्हणजे सामान्य माणसासाठी धोक्याची मोठी घंटा!
घाबरत घाबरत तिचे वडील त्यांना भेटायला गेले आणि मान खाली घालून घरी आले. घरी आल्यावर दोन तीन तांबे पाणी घटाघटा पिऊन सोप्यात येऊन अस्वस्थपणे येरझारा घालू लागले.
“मी काय म्हणते! काय झालंय? तुमच्याकडून काही चुकलंय का?” त्यांची पत्नी सुलोचना त्यांना विचारू लागली.
“हो! काळजाचा तुकडा तुझ्या पोटी जन्माला घातला हीच काय ती माझी चूक!” ते मुठी आवळून रागारागाने येरझाऱ्या घालत होते.
“काय झालं? असं वागू नका! नीट बोलाल का माझ्याशी?”
“उदयसिंह धनावडेंना लग्न करायचंय आपल्या कोमुशी!”
“अहो अजून लहान आहे ती आणि ते क्षत्रिय आहेत! त्यांना ब्राम्हणाच्या लेकी केव्हापासून चालायला लागल्या?” सुलोचना काकींनाही थोडा राग आलाच!
“ते आता महत्त्वाचं नाही! माझ्या पिल्लाला कुठे लपवू ह्याची चिंता आहे मला!”
“अण्णा आम्हाला ठाऊक होतं तू हरामखोर आहेस. बोलाव सूनबाईंना! आम्ही अंगठ्या घेऊन आलो आहोत! आज साखरपुडा उरकून टाकायचा आहे!” आप्पांचा भारदस्त आवाज घरभर घुमला.
त्यांच्या सोबत उदयसिंह आणि परशा होते. परशा म्हणजे त्यांचा खानदानी अंगरक्षक अगदी बाहुबलीतल्या कटप्पासारखा! त्याच्या नजरेच्या कटाक्षानेही समोरचा गारद व्हावा असा राक्षसच!
पर्याय नव्हता अण्णांना त्यांचं लाडकं पिल्लू जिवंत रहायला हवं होतं. नाइलाजास्तव त्यांना सगळं ऐकावं लागलं आणि कोमलची गाठ शेवटी उदयसिंहाबरोबर बांधली गेली. अण्णाच्या सात पिढ्यांनी पहिला नव्हता आणि पुढच्या सात पिढ्याही पाहू शकणार नाहीत एवढा दिमाखदार विवाह सोहळा त्यांच्या लेकीचा झाला पण कन्यादान करताना तिच्या चितेला अग्नी देत असल्याचा भास अण्णा आणि सुलोचना काकूंना झाला.
कोमलही अवखळ असली तरी समजूतदार होती. आपल्या बापाची हतबलता तिने जाणली होती आणि आपल्या मनात जन्म घेऊ लागलेला प्रेमाचा अंकुर जाळून टाकत तिने उदयसिंहासोबत सात जन्मांसाठी स्वत:ला बांधून घेतले फक्त आपल्या बापासाठी! आणि तेव्हापासून ती या सोन्याच्या पिंजऱ्यात तडफडत आपल्या मरणाची वाट पाहत होती. रोज शरीराबरोबरच मनावर होणारे बलात्कार सहन करत होती.
तिच्या कॉलेजातील सगळ्यात हुशार मुलगा ज्याने तीचं काळीज कायमचं चोरलं होतं, निशांत वाडेकर! अकरावीपर्यंत तो तिच्याच वर्गात होता. बारावीत तो पुण्याला शिकायला गेला तो थेट डॉक्टर होऊनच परतला.
त्याला तिच्या मनातलं काही सांगण्या आधीच सगळ्या गोष्टी इतक्या भराभर घडल्या की जणू हेच आपलं नशीब हे मान्य करण्यावाचून तिला पर्याय उरला नाही अन तिने तीचं प्रेम तिने भूतकाळाच्या स्मशानात गाडून टाकलं.
हे सगळे विचार रोजच तिच्या डोक्यात भिरभिरत असत. पण हा म्हणजे जणू काही तिचा दिनक्रम झाला होता आता! उदयसिंहाची बाहेरख्याली तर लग्नाआधी पासूनच जगप्रसिद्ध होती. लग्नानंतर दोन आठवड्यातच तो तिला कंटाळला पण तिला तक्रार करण्याचीही मुभा नव्हती.
फक्त स्वत:चे पौरुषत्व जगजाहीर करण्यासाठी त्याने एक अपत्य ठेवले. देवही ज्याचे त्याला योग्य फळ देत असतो. उदयसिंहाच्या पदरातही त्याने अगदी कोमलसारखीच गोंडस मुलगी टाकली होती. पण या सगळ्यात भरडली जात होती ती कोमल!
अचानक एके दिवशी तिची मैत्रिण आयेशाचा तिला मेसेज आला. ‘निशांत लंडनहून परत आलाय!’ अन् सुकून वाळवंट झालेल्या तिच्या मनात आशेची पालवी फुटली. पण आपलं लग्न झालंय आणि आता आपल्या पदरात एक गोंडस मुलगी आहे हे आठवतच तिने ती पालवी स्वत:च खुडून टाकली.
निशांत वाडेकर म्हणजे तालुक्याचे आमदार भाऊ पाटलांचे खास आबा वाडेकरांचा मुलगा. अण्णां एवढंच किंबहुना त्यांच्याहूनही अधिक वजनदार व्यक्तिमत्व! पण एकदम साधेसुधे सरळ मार्गी! आबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानली जायची. त्यानी कधी कुणाला काडीचाही त्रास दिला नव्हता.
निशांतही अगदी आपल्या वडीलांवरच गेला होता. शेवटी खाण तशी माती! राजकारणात त्यांच्या नावाला इतकं वजन होतं की गावातल्या राजकारणात ज्याला टिकायचं असेल त्याला आबांना धरूनच राहावं लागे. आप्पाही याला अपवाद नव्हते. इच्छा नसूनही आप्पांना आबांशी गोड राहावं लागे.
एक दिवस अशीच झोपाळ्यावर बसलेली असतानाच तिला समोरून एक उंची गाडी गेटमधून आत शिरताना दिसली. ती घाई घाईने मागच्या दाराने घरात गेली व आपल्या रूममध्ये जाऊन बसली.
‘बाहेरचे लोक आले की घरातल्या बायकांनी समोर यायचं नाही’ असा धनावडेंच्या घरचा नियमच होता. तिच्या रूममधून दिवाणखान्यातली बैठक स्पष्ट दिसत असे. खास उदयसिंहांसाठी तशी रचना केलेली होती.
काही सेकंदातच उदयसिंह, आप्पा आणि निशांत! हो निशांतच होता तो! तिघे आत आले आणि बैठकीच्या ठिकाणी बसले. तिचा स्वत:वर विश्वासच बसेना. चक्क तीचं पाहिलं आणि अर्थात शेवटचं प्रेम तिच्या नवऱ्यासोबत आणि सासऱ्यासोबत गप्पा मारत तिच्याच घरात बसले होते.
त्याला ओळखण्यात तिच्याकडून चूक होणं शक्यच नव्हतं! हो तो निशांतच होता. बराच वेळ गप्पा मारून तो निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तिच्या डोक्यात निशांत घुमत राहला. उदयसिंह आल्यावर तिने हिंमत करून विचारलं.
“अहो एक विचारू का?”
“काय?”
“ते निशांत वाडेकर होते ना? सकाळी आलेले?”
“हो. तुला काय करायचंय! आणि तू कशी ओळखतेस त्या हरामखोराला?” त्याचं प्रश्न वजा उत्तर ऐकून त्याच्या कानाखाली आवाज काढावा असं तिला वाटलं.
“आम्ही एका वर्गात होतो.” तिने स्वत:ला सावरत उत्तर दिलं.
“म्हणजे तोही ओळखत असेल तुला!”
“माहित नाही. अभ्यासू होता तो. मुलींकडे फारसं लक्ष नसायचं त्याचं!”
“तो मोठं हॉस्पिटल टाकतोय गावात हायवेला! करोडोने पैसा ओतणार आहे. आपली जमीन आहे वाडी जवळ, तिथे हॉस्पिटल करून आपल्याला पार्टनर करून घ्यावं अशी आप्पांची इच्छा आहे. पण तो हरामखोर मानायलाच तयार नाही!” उदय जणू स्वत:शीच बडबडत होता.
“तुम्ही शांततेत घ्या, तो ऐकेल. शांत स्वभाव आहे त्याचा! सगळ्यांना मदत करायचा तो!”
“तेच तर! झाटू साला! समाजसेवेचे डोहाळे लागलेत त्याला. पैसा नाही कमवायचा म्हणे! लोकांना मदत करायचीय डॉक्टर साहेबांना!” उदयचा पार चढू लागला.
“गैर काय आहे? आपल्याकडे पैशाची कमी आहे का? लोकांना थोडं दिलं म्हणून काय बिघडतं?”
“ते काय देतात आपल्याला? एका मताचे पाच पाच हजार मोजून घेतात माकडं!”
तिने त्याच्याशी वाद घालायचं टाळलं. त्याच्या डोक्यात अचानक काहीतरी चमकलं आणि त्याने तिला विचारलं.
“तू बोलशील का त्याच्याशी एकदा? आपल्या पार्टनरशिपसाठी?”
“मी?” तिच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता.
“हो हो तूच!”
“मला काय कळतं त्यातलं?”
“कळायचं काय त्यात, मी सांगेल तेवढं करायचं फक्त!”
“नको! मामंजी मारून टाकतील मला!”
“मी सांगतो त्यांना! हा प्रोजेक्ट हातचा जाता काम नये”
“तुमचं तुम्ही ठरवा!” असं म्हणत तिने पांघरून घेतलं आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली.