अरुंधतीला परत अवेळी जाग आली. कशानं आली, कोण जाणे? अलीकडे असंच होतं. पहले काही तास गाढ झोप आणि मग जाग. परत तेच स्वप्न. परत तोच दिसला तिला. दिसला म्हणजे तसं त्याला काही रंग रुपच नव्हते. मग नक्की आहे तरी कोण? तिला तो स्वप्नामध्ये ओढून न्यायचा. त्याला पाहण्यासाठी तिची आतुरता वाढत चालली होती. त्यासाठी ती काम आटपून लवकर झोपून घ्यायची. आज तरी त्याचा चेहरा आपल्याला पाहायला मिळेल ह्याच एकाच आशेने ती गच्च डोळे मिटून घ्यायची. निद्रेची झापड डोळ्यावर येताच तिचे स्वप्नाचे दार उघडे व्हायचे. तिची नजर त्यालाच शोधत असे. त्याची चाहूल लागताच ती बेचैन व्हायची. तो आल्यावर ती त्याच्या मिठीत विरघळून जायची. मग दोघेही मुक्तपणे चांदण्या रात्रीमध्ये आपली रासक्रीडा रचायचे. तिच्या सर्वांगाला छेडत अगदी तो तिचे अंतरंग फुलवून टाकत असे.
अरुंधती पूर्णपणे जागी झाली होती. मोबाईलमध्ये तिने वेळ पाहिली. रात्रीचे अडीच वाजले होते. बाजूला झोपलेल्या अखिलेश कडे तिने नजर टाकली. तोंडाचा ‘आ’ वासून त्याचे घोरण्याचे सुर पुर्ण बेडरूम मध्ये घुमत होते. बनियान मधला बाहेर पडणारा पोटाचा डोलारा श्वासामुळे वर खाली होत होता. कालांतराने केसाने त्याच्या मस्तकाची साथ सोडून मर्यादित अशी सीमा आखली होती. पैसा कमवण्याच्या शर्यतीमध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशर, क्लोरेस्टाॅल यांनी कधी गाठले त्यालाच कळलं नाही. एक बायको म्हणुन अरुंधतीने कधीच त्याच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले नव्हते. त्याच्या जेवणाच्या पथ्याची ती पुरेपुर काळजी घ्यायची.
अरुंधतीला गेले आठ महिने अशा विचित्र स्वप्नाची सवय झाली होती. म्हणजे हा तिच्या तीव्र कामेच्छाचा भाग नव्हता. हे सर्व आपोआप जुळून आले होते. सुरवातीला तिला अगदी अपराधीपणाची भावना यायची. पण हळूहळू आपण स्वप्नांमध्ये कधी गुंतून गेलो हे तिलाच समजलेच नाही. आताही स्वप्नामध्ये प्रियकराबरोबर शृंगार रंगताना तिच्या मांड्यामध्ये निर्माण झालेला ओलावा तिला स्पष्ट जाणवत होता. ‘स्वप्नाचा राजकुमार’ ही संकल्पना तशी जुनी आणि रटाळ म्हणावी लागेल. “दिलावले दुल्हनीया…. च्या काजोलने टॉवेल डान्स करून त्यावेळेच्या तरुणींच्या ते डोक्यात खुळ घालण्याचा आगाऊ पणा केला होता. ‘म्हणे मेरे ख्वाबो मे जो आये …..पण चाळीशीच्या दिशेने वाटचाल करताना अरुंधतीला ह्या स्वप्नांचा अर्थ काही लागत नव्हता.
सकाळी बरोबर पाचच्या ठोक्याला तिला जाग आली. हा तिचा उठण्याचा शेवटचा अध्याय असायचा. त्यापुढे तिने अंथरुणात लोळत बसणे घरातल्या लोकांच्या नजरेत गुन्हा व्हायचा. एखाद्या टिपिकल गृहिणीची सकाळ असते तशीच अरुंधतीची सकाळ असायची. प्रत्येक कामाची वेळ तिने ठरवली होती. अमुक वेळेत अंघोळ उरकून ती बैलाला कसा नांगर जुंपतात तशी ती स्वतःला कामासाठी जुंपायची.
एका बाजूला चहाचे पातेलं ठेवत तिने भाजीची तयारी केली. पिठाचं कणिक मळून ठेवुन ती मनू ला उठवायला तिच्या रूम मध्ये गेली.
“मनू, अगं सहा वाजायला आले.. चल उठ लवकर” असे म्हणत तिच्या अंगावरची चादर ओढली.
“मम्मा, पाच मिनिटं फक्त “
“नेहमीचं आहे तुझं, ब्रश करायला एक तास काढतेस, चल उठ.
“उठते गं, तू जा. “
“नाही उठ आधी, तुझ्यामुळे बाबाना नेहमी उशीर होतो. मला ओरडा खायला लागतो.
असे म्हणत ती धावत धावत किचनमध्ये आली. अखिलेश उठुन ऑफिसला जायच्या तयारीला लागला होता. देवघरात सासूबाईंची देवपूजा चालु होती. स्त्रीची किचनमध्ये काम करण्याची यंत्रणाच वेगळी असते. आणि ती जर पहाटेची घाई गडबडीची वेळ असेल तर एकाद्या रोबोटसारखे तिचे हात चालत असतात. अरुंधतीची भाजी पोळी, चहा, नाश्ता सर्वकाही वेळेत तयार झाले.
“अरु, नाश्ता घेऊन ये गं पटकन उशीर होतोय मला” अखिलेश नेहमीच उशीर होण्याचे खापर अरुंधतीवर लादून मोकळा व्हायचा.
“आले आले”
” तू ना माझी एक दिवस नोकरी घालवणार आहेस.
“हे घ्या नाष्टा.”
अरुंधतीने निमूटपणे काही न बोलता त्याच्या हातात प्लेट दिली.
“हे काय, तुला किती वेळा सांगितलं, पोह्यात शेंगदाणे टाकु नकोस म्हणुन”.
“अहो मनू ला आवडतात म्ह्णून टाकलेत. उद्यापासुन नाही टाकणार.
“युजलेस..म्हणजे उद्या पण नाश्त्याला पोहेच असणार?? कधी तरी डोसा, इडली असं काही तरी करत जा.
“अहो आजच्या दिवस खा ना.. उद्या करते डोसे.”
“म्हणजे मी सांगितल्यावरच करणार.
“तसं नाही..सकाळी सकाळी डोसे बनवायचे तर खुप वेळ जातो.
” मग अर्धा तास लवकर उठ.
“हो,
” ठीक आहे..मनू तयार आहे का बघ जरा”
“अगं बाई..तुमची तयारी झाली का? थांबा हा मी दोन मिनिटात मनूला तयार करते.
“अगं मनू काय चाललंय तुझं..चल लवकर शाळेला उशीर होतोय. बाबा तयार पण झाले.
“हो, तेच करतेय, माझी मॅथ्सची बुक सापडत नाही आहे.
“तु आधी कपडे घाल, मी शोधते बुक.”
मनू कपडे घालत असताना अरुंधतीने ड्रॉवर मधुन मॅथ्सची बुक ड्रॉवरमधुन शोधून काढली.
” सापडली??? कुठे होती.”
“आता चौकश्या कशाला पाहिजेत. चल पटकन कर, नाही तर शाळेचा गेट बंद करतील.
अखिलेश आणि मनू घराबाहेर पडल्यावर अरुंधतीने सासूबाईना चहा आणि नाश्ता दिला.
“अरु…घाईत आहेस का?
“नाही..आई बोला ना.”
“अग परवा परांजपे बाई बोलत होत्या नर्मदा परिक्रमणा करण्यासाठी विस जणीचा ग्रुप तयार आहे. मला पण जाण्याची इच्छा होती.
“अहो तुमची इच्छा असेल खरंच तुम्ही जा, त्यात विचारायचं काय?
“नाही म्हटलं तरी पाच- सहा महिने लागतात परिक्रमणेसाठी.
“हो चालेल की, नर्मदा देवी स्वतः हुनच परिक्रमणा करून घेते असं मी ऐकलयं..तुम्हालाही जमेल.
“पण तुझी गैरसोय होईल ना, तुझं हॉस्पिटल असतं, मनू शाळेतून आल्यावर तिला कोण बघणार?
“अहो, त्याची काळजी करू नका, मनू आता मोठी झाली, नाही तरी मी ४ वाजेपर्यंत हॉस्पिटलमधुन येतेच की, तसा फक्त दोन तासाचा प्रश्न आहे. होईल अड्जस्ट…तुम्ही बिनधास्त जा.
“बरं तू जा आता, तुला उशीर होईल नाहीतर”
“मी रात्री बोलते ह्यांच्याशी”
अरुंधतीने किचनचा पसारा आवरून घेतला. कपाटातली गुलाबी रंगाची कॉटन साडी आणि त्यासोबत पांढरा परकर आणि मॅचिंग ब्लाउज घालायला काढले. ती नेहमी हॉस्पिटलमध्ये जाताना शक्यतो साडीच नेसायची. त्यामध्ये तिचे व्यक्तिमत्व खुप खुलून दिसायचे. आणि पेशंटला सुद्धा तिला पाहून अगदी फ्रेश वाटायचे. लॅक्मे फौंडेशन पावडरचा हलकासा लेप चेहऱ्यावर फिरवला. तिच्या गोऱ्या त्वचेवर अशा कुत्रिम सौन्दर्य प्रसाधनेची तशी काहीच गरज नव्हती. तिला मुळातच नैसर्गिक सौंदर्य लाभले होतं. परत एकदा आरशात तिने न्याहळुन पाहिले. तिची नजर घड्याळाकडे गेली. सासूबाईचा निरोप घेत ती घराबाहेर पडली. लिफ्टचं बटण दाबलं आणि ती आत शिरली.
बाराव्या मजल्या वरुन खाली येताना लिफ्टमध्ये आपण एकटे नाही आहोत असं तिला जाणवलं. पण लिफ्ट मध्ये कोणीच नव्हते. लिफ्ट सातव्या मजल्यावर येऊन थांबली तसा दरवाजा उघडला. तिला बाहेर कोणीच दिसले नाही. कोणीतरी वाट बघून जिन्यावरुन खाली गेले असावे असे तिला वाटले. तिने बटण दाबुन लिफ्टचा दरवाजा बंद केला. आता खाली १ ते ६ च्या मजल्यांच्या बटणा वरचा लाल लाईट पेटत होता. तिला नवल वाटले. साहजिकच लिफ्ट आता प्रत्येक मजल्यावर थांबणार होती. लिफ्ट एक एक मजला थांबत खाली तळ मजल्यापर्यंत आली. लिफ्टमध्ये शिरकाव करण्यासाठी प्रत्येक मजल्याच्या पॅसेज मध्ये कोणीही हजरच नव्हते. आपली कोणीतरी थट्टा केली असावी तिला वाटले. तिने जास्त काही मनावर घेतलं नाही. मेनच्या गेटच्या बाहेर येत समोरच्या स्टॅन्ड वरुन रिक्षा पकडली.
रिक्षा ‘मानसी सायकोलॉजी सेंटर’ च्या दिशेने धावु लागली. काही अंतर पुढे जाताच अरुंधतीच्या हाताच्या दंडाला काहीतरी घासल्याची जाणीव झाली. रिक्षामध्ये तिच्याशिवाय दुसरे कोणीच पॅसेंजर नव्हते. ती सरकत सरकत सीटच्या कडेला येऊन पोहचली. स्पर्शाची जाणीव तिला अधिक तीव्र भासू लागली. तीने अंग पुर्णपणे आकसुन घेतले. तिला भीती वाटु लागली. आपल्याबरोबर नक्की काय होत आहे. हा कसला विचित्र भास होतोय आपल्याला? ड्राइवरने आरशातुन तिला अंग चोरताना पाहिले.
“क्या हुआ मेंमसाब कोई दिक्कत हैं क्या..
“न..नही..कोई दिक्कत नही..
“आप चाहे तो रिक्षा रुकवाते हैं, सीट पे कुछ हैं क्या??
“नही..आप जल्दी लेके चलो..
“मेंमसाब इतनी ट्रॅफिक मे तो यही स्पीड सबसे जादा हैं.
” बरं बरं, आप बस चलते रहो.
“रिक्षा तो चालू हैं, मॅडम..बस आप डरी हुई लग रही हैं.
” मी…मी कशाला घाबरेल,..कुछ डरी बिरी नही हू मै,
” मॅडमजी, सीट पे इतनी जगह है, फिर भी आप कोने मे जाके बैठी हो, जैसे कोई बाजू मे भूत बैठा हो.
” भूत????? काही काय बडबडा रहे हो??
“हम बडबडा नही रहे हैं… सच बोल रहे हैं,
“तुम चूपचाप रिक्षा चलाव..बैल गाडी की तरह चलाके अपना मीटर मत बढाव.
” हम चुपचाप ही चला रहे, हम कहा बोल रहे हैं.
अरुंधतीला रिक्षावाल्याचा आता राग यायला लागला होता. तो आता तिच्या डोक्यात जात होता. आधीच तिची फाटली होती. आपल्या बाजूला कोणीतरी बसलंय असा सारखा तिला भास होत होता. ‘नक्की काय चाललंय काहीच कळत नव्हते. लिफ्टमध्ये सुद्धा असाच काहीतरी विचित्र प्रकार घडला होता आणि आणि रिक्षा मध्ये पण तेच.
‘ अरुं…बाई गं शांत हो, हे आपले भास आहेत फक्त, उगाच लोकांना वाटेल तू वेडी बिडी आहेस, पण स्पर्श तर आपल्याला स्पष्ट जाणवतोय, म्हणजे हा म्हणतो तसा कोणी भूत बीत नसेल? छे!! काही काय मुर्खासारखे डोक्यात विचार येतायत. अरुंधती मनात विचार करत असताना रिक्षा सेंटर जवळ येऊन थांबली. तिने रिक्षावाल्या पैसे दिले आणि इकडे तिकडे पाहू लागली. तितक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. अरुंधती एकदम दचकली. छातीत तिच्या एक विज चमकून गेली. तिने मागे वळून पाहिले.
“काय? कुठे बघतेस? डॉ. शुभदा आल्यात. चल लवकर. डॉ. श्रद्धा हास्पिटलच्या गेटवर उभ्या असणाऱ्या अरुंधतीला म्हणाली.
“कुठे काय? काही नाही गं चल. अरुंधती खांद्यावरची पर्स नीट करत म्हणाली.
“गुड मॉर्निंग अरुंधती मॅडम, हिअर इज युअर टुडेज पेशंटस लिस्ट. सिस्टर श्वेता तिच्या हातात केसेसचे डिटेलस देत म्हणाली.
“रंजिता कशी आहे गं ” अरुंधतीने केसचे पेपर चाळत विचारलं
” तुमचीच वाट बघतेय.”
तितक्यात समोरून डॉक्टर शुभदा केबिन मधुन बाहेर आल्या.
“गुड मॉर्निंग अरुंधती, यु आर लुकिंग ग्रेट टुडे, एनीथिंग स्पेशल??
“ओह शुभदा मॅडम, गुड मॉर्निंग..काही स्पेशल नाही मॅडम.
“ओके, अगं रिक्षातुन उतरताना मी तुला पाहिलं तेव्हा तू घाबरलेली दिसली. एनी प्रॉब्लेम? तब्येत ठीक आहे ना?
“काही प्रॉब्लेम नाही मॅडम, ते उशीर झाला म्हणुन म्हणुन जरा धांदल उडाली होती.
“अगं एवढं काय त्यात, घरातली काम सर्व उरकून येता ना थोडा उशीर झाला तरी हरकत नाही.
“नाही मॅडम, घरातून लवकरच निघते, पण ट्रॅफिक मुळे वेळ होतो.
“बरं ठीक आहे, नॉवु बॅक टु वर्क. असं बोलुन डॉक्टर शुभदा केबिन मध्ये निघुन गेल्या.
आज कौन्सिलींग साठी भरपूर पेशंट होते. चांगल्या भविष्याचं आमिष दाखवून ती पेशंटची ट्रीटमेंट साठी मानसिक तयारी करून घेत असे. एक नवा अनुभव. ट्रीटमेंट संपली, केस संपली. कधी पेशंट संपला, केस संपली. कौन्सिलींग, समुपदेशन, म्हणजे काय तर कोणीतरी निर्माण केलेले प्रश्न आपण सोडवत बसायचे. प्रत्येक व्यक्ती ती स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही वयोगटातील असो, अगदी लहान बाळापासुन ते वयोवृद्ध असो. ती आपल्या भावनांच्या अतिरेकाने निर्मित आभासी जगात वावरत असते. जोवर व्यावहारिक जीवनांचा आणि आभासी जगाचा ताळमेळ साधला जातो तोवर सगळ्यांचं व्यवस्थित सुरु असते. अंगवळणी पडलेल्या या तडजोडीतील्या आयुष्याला एकदा का तडा गेला की त्या व्यक्तीचा मानसिक तोल ढासळतो. आणि पैसे देऊन या विषयात शिक्षण घेतलेले आम्ही त्यांच्या मानसिक संतुलनावर क्लिनिकल भाषेतील अवजड शब्द वापरून एखाद्या मानसिक आजाराचे नाव देतो आणि उपचार करतो. आणि उपचार म्हणजे तरी काय? आमच्यासारख्यानीच फार पूर्वी केलेले प्रयोग त्यात उपयुक्त बदल करून आम्ही परत तेच करतो. तेच नोट्स काढतो. अवलोकन करतो. औषधं देतो. आप्तेष्टांना मानसिक आधार आणि काळजी घ्यायला सांगतो. हे अरुंधतीचे तिच्या प्रोफेशनल स्पष्ट मत होते.
अरुंधतीने आपल्या करियरमध्ये आयुष्याचे बरेच रंगरुप बघितले होते. काही ती विसरून जायची तर विचारात घुटमळणाऱ्या केसचे प्रतिबिंब तिच्या पेंटिंग्स मध्ये उमटत असे. हो, अरुंधती एक उत्तम चित्रकार होती. फावल्या वेळात ती आपल्या कल्पना कार्ड बोर्ड वर उमटवत असे.
दिवसभर पेशंट आणि काम. आजचे लंच सुद्धा तिचे घाईघाईत झाले. साडेतीन वाजले तसं तिने आवरायला घेतले. सिस्टरला नोट्स देत ती निघाली.
रात्रीचे १०.३० वाजले होते. किचनचा पसारा आवरून अरुंधती मनूच्या रूममध्ये बघायला गेली. ती झोपलेल्याच्या खात्री करूनच ती बेडरूम मध्ये आली. अखिलेश लॅपटॉप वर ऑफिसचे काहीतरी काम करत होता. अरुंधती बेडवर जाऊन बसली.
“अहो तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.
“परत तुझ्या पेंटिंगस बद्दल बोलून बोर करणार असशील तर राहु दे”
“पेंटिंगस् बद्दल बोलणं मी कधीच सोडून दिलंय”
“व्हेरी गुड, जगात ज्या गोष्टीतुन पैसा मिळत नाही असले शौक कधीच करायचे नाहीत.
अरुंधतीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. म्हणजे तिने स्वतः ला तशी सवयच लावुन घेतली होती.
“अहो आईना नर्मदा परीक्रमनेला जायचे होते.
“ते काय असतं?
“अहो मला पण नीटसं माहिती नव्हतं. मी परांजपे काकुना विचारलं तर त्या म्हणाल्या की खुप धार्मिक व्रत आहे. परिक्रमेत बरीच देवस्थानांचं, आश्रमाचे दर्शन होते.
“अगं ती गेली तर तू काय घरात बसणार आहे का? मनू शाळेतुन आल्यावर घरी कोण नको का?
“अहो, दोन तासाचा प्रश्न आहे, होईल अड्जस्ट.
” हे बघ, हे मला काही पटत नाही.
” देवाचं काम आहे हो…प्लिज नाही म्हणु नका. आणि बरेच वर्ष त्या कुठे गेल्या पण नाही हो.
“आणि मध्येच काही झालं तर??? कोण बघणार आहे तिला तिकडे.
” विस जणीचा ग्रुप आहे. काळजी करायचं तसं काहीच कारण नाही.
” म्हणजे तू स्वतःच निर्णय घेतला आहेच तर..मग मला तरी कशाला विचारतेस.
” नाही हो तसं नाही, तुम्ही ‘हो ‘ म्हटल्यावरच त्या जातील ना. तशी त्यांना पण मनू ची काळजी आहे.
“अच्छा ठीक आहे उदया बोलतो आईशी..आता कान नको चावूस.