ती दररोज सकाळी लवकर उठायची. तिच्या कामाला लागायची. तिचा गजर वाजल्यावर त्यालाही जाग यायची, पण तो अंथरुणातच लोळत पडायचा. आज मात्र गजर वाजताच तो लगेच उठला. ती जागी होण्या अगोदरच त्याने गजर बंद केला. तिला तसच झोपू दिलं. तिचा वाढदिवस होता ना, तिची सर्व कामे पूर्ण करून सकाळी तिला उठवून सरप्राइज द्यायचं त्याने ठरवलं होतं.
उठल्या उठल्या त्याने कामाला सुरुवात केली. घर झाडून स्वच्छ केलं. कालची राहिलेली भांडी घासली. मग हिटर चालू करून पाणी तापवले. स्वत: अंघोळ करून कपडे धुऊन टाकले. नंतर तिच्यासाठी पाणी ठेवून तो किचनमध्ये आला. स्वयंपाकाच्या तयारीला लागला.
तिला लवकर उठायची सवय झाली होती. गजर नाही वाजला तरीही ती आपोआप उठायची. त्या दिवशी मात्र तिला उशिरा जाग आली. ती दचकून अंथरुणावर उठून बसली. मोबाईलमध्ये पाहिलं, तिला उठायला उशीर झाला होता. सगळ्या कामांना उशीर होणार होता. तिने तिच्या शेजारी पहिलं, तिचा नवरा नव्हता. ती उठून बाहेर आली. किचनमध्ये काहीतरी आवाज येत होता. तिने आत डोकावून पाहिलं.
कट्ट्यासमोर उभारून एका हातात चाकू घेऊन कांदा कापताना दुसऱ्या हाताने डोळ्यात येणारे पाणी पुसणारा तिचा नवरा पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हास्याची रेषा उमटली. तिचा वाढदिवस होता हे तिला आठवलं. तीचं सर्व काम करून तो तिला उठवायला येणार होता आणि पुढे त्यांचा संपूर्ण दिवस सेलिब्रेशनमध्ये जाणार होता, हे तिने ओळखलं.
तिला त्याचं कौतुक वाटलं. ती दबक्या पावलाने त्याच्याजवळ गेली आणि त्याला मागून मिठी मारली.
“अरेच्चा!! उठली होय तू..” त्याच्या अंगाभोवती तिची मिठी पडताच तो म्हणाला.
“हो!” त्याच्या पाठीवर तिचे उभार दाबत, पोटावर हात धरून त्याच्या खांद्याजवळ तीचं तोंड ठेवलं आणि ती हसत म्हणाली.
“मला वाटलं तू जागी होण्या अगोदर सारं काम होईल आणि मग तुला उठून आपल्या सेलिब्रेशनला सुरुवात करता येईल.” हातातल्या चाकू खाली ठेवून तिचे हात सोडवत तिच्याकडे वळून तो म्हणाला.
“दिवसभरातील आज माझं हे पहिले गिफ्ट होतं तुझ्यासाठी.” त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला जवळ ओढून मिठी मारली. “आणि ते पूर्ण होण्या अगोदरच तू जागी झालीस.”
“तू मला अजूनपण माझ्या आवडीचं गिफ्ट देऊ शकतोस.” त्याच्या छातीत तीचं तोंड अधिकच रूतवत, हातांनी त्याला अधिकच घट्ट दाबत ती म्हणाली.
त्याच्या स्पर्शाने तिच्या तना मनात वेगळाच अग्नी प्रज्वलित होत होता.
“कोणतं?” तो म्हणाला.
त्याचे दिवसातले पहिलेच गिफ्ट फसल्याने तो जरासा खट्टू झाला होता. विचारात हरवून गेला होता. त्यामुळे ती नक्की काय म्हणतेय याचा अर्थ त्याला लवकर कळला नाही.
“असं काय करतो? मला काय पाहिजे ते तुला माहीत नाही का?” तिने स्वत:ला त्याच्यापासून सोडवून घेतलं आणि खोट्या रागाने त्याच्याकडे पाहिलं.
“मला पाहिजे ते देशील ना?” तिने मादक आवाजात ते वाक्य उच्चारत त्याच्याकडे रोखून पाहिले आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
“ते होय..!” तो आनंदाने चित्कारला. गडबडीत त्याने हात धुतले आणि तिला उचलून घेतलं.
तिच्या वाढदिवसाच्या सकाळी ते दोघे एकमेकांना गिफ्ट देण्यात हरवून गेले.