दुपारची वेळ होती जेवण करून ते चिंचेच्या झाडाखाली अंथरून टाकून पसरले होते. दोघे एकमेकांच्या शेजारी चिटकूनच झोपले होते.
“आज हुनार नाय सगळं खुरपून, मी म्हणलं हुतं रोजानं दोन बाया लावू.”
ती जराशी रागात होती. त्या दिवशी खुरपणं झालं असतं तर दुसऱ्या दिवशी त्यांना खत टाकून पाणी देता आलं असतं.
ती रागाने बडबडत असताना तो तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिच्या ओठांची होणारी हालचाल त्याच्या नजरेने टिपत होता. त्या ओठांवर ओठ टेकवण्याचा मोह त्याला आवरत नव्हता.
“काय बघताय भुतं बघितल्यासारखं?” तो तिच्याकडे टक लावून बघतो, हे जाणवल्यानंतर ती चिडक्या आवाजात म्हणाली.
“तुलाच बघतुय..” असं म्हणून त्याने एका हाताने तिची मान त्याच्याकडे वळवली आणि तिच्या ओठावर त्याचे ओठ टेकवले.
तिच्या चेहर्यावरचे भाव क्षणार्धात कितीतरी वेळा बदलले. पहिल्यांदा चीड जाऊन त्या ठिकाणी आश्चर्य आलं. मग नवऱ्याचं तिला खूप कौतुक वाटलं आणि नंतर मग लगेच ती लाजून लाल झाली. काही क्षण त्याच्या ओठांचा स्पर्श अनुभवल्या नंतर तिने त्याला हळूच दूर सारलं.
“काय करताय, कुणीतरी बघल की..” असं म्हणत ती उठून बसली. स्वतःचा चेहरा तिने ओंजळीत लपवला आणि बोटांच्या फटीतून तो काय करतोय, हे गुपचूप पाहू लागली.
तोही तिच्या शेजारी उठून बसला. तिचे हात त्याने बाजूला केले.
“बघू दि कुणाला बघायचं त्याला, माझी बायोकाय तू..”
आणि पुन्हा एकदा तिला जवळ ओढले.
ती काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणारच होती पण त्या अगोदरच तिचे ओठ त्याने स्वत:च्या ओठांनी बंद केले आणि तिला मिठीत ओढून तिच्या पाठीवर हात फिरवू लागला.
ती स्वत:ला त्याच्या मिठीत हरवून गेली. मात्र काही वेळातच ती भानावर आली. ते त्यांच्या मळ्यात आहेत, चिंचेच्या झाडाखाली उघड्यावर ते सारं काही करताहेत हे आठवताच इच्छा नसूनही तिने त्याला दूर सारलं आणि मनाचा निर्धार करून उठून उभा राहिली.
“आवं, खुरपणं ऱ्हायलंय अजून..”
तीचं मन अजूनही त्या क्षणात गुंतलेलं होतं. आवाज अजूनही कंप पावत होता. कशाचाही विचार न करता त्याच्यात हरवून जावं, असं वाटत असूनही ती खुरपं घेत दूर निघाली.
मात्र ती जास्त दूर जाण्या अगोदरच त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं.
“कोण येत नाय इकडं, तुला म्हायतीय..”
“अवं पण..” तिने शेवटचा विरोध करायचा प्रयत्न केला पण त्याच्या ओठांची जादू झाली आणि तिचा विरोध मावळला.
भर दुपारी त्या चिंचेच्या झाडाखाली असलेल्या गार सावली ते दोघेही प्रणयात हरवून गेले.
त्या दिवशीही त्यांच्या शेताची खुरपणी काही झाली नाही.