एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यला आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव ‘इंद्रधनुष्य’ का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता.
त्याच्या जीवनात आलेल्या सहा स्त्रिया या साधारण नव्हत्या. प्रत्येक स्त्री ही आपल्यातच नाविन्यपूर्ण होती. अनेक वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये घेऊन पृथ्वीतलावर आपला सुगंध दरवळत होती. या सहा स्त्रिया इंद्रधनुष्यच्या जीवनात आल्या हा दैवी चमत्कार म्हणावा.
ता वरून तारुल, ना वरून नाजूका, पि वरून पियूषा, ही वरून हिना, नि वरून निशा, पा वरून पायल म्हणजे त्याच्या जीवनात आलेले इंद्रधनुषी सहा रंग होय. ता ना पि ही नि पा होय. पण इंद्रधनुष्यातील सात रंगातील एक रंग अजून शिल्लक होता तो म्हणजे जा वरून जांभळा.
आता ही जा वरून स्त्री कुठे शोधायची की ती पण इतर स्त्री सारखे स्वत:हून समोर येईल आणि तिचा प्रेमरस इंद्रधनुष्यला चाखायला देईल असे अनेक प्रश्न त्याला पडत असे. पण हेच जीवन होते म्हणून सध्या तरी वेट आणि वॉच हेच इष्ट होते.
आता इंद्रधनुष्य अठ्ठावीस वर्षांचा झाला होता. आपल्या जॉबमध्ये तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अविवाहित तरुण मुलगा स्थिरावला की त्या मुलांपेक्षा त्याच्या पालकांची चुळबुळ सुरू होते ते त्याच्या लग्नासाठी. इंद्रधनुष्यची आई सुद्धा त्याच्यासाठी मुलगी शोधू लागली. इंद्रधनुष्य नेहमी म्हणत असे की मला अद्याप लग्न नाही करावयाचे आहे. पण त्याची आई काही त्याच्या या बोलण्याला जुमानत नसे.
आईनेच मग पुढाकार घेऊन त्याचे नाव विविध वधू वर सूचक मंडळात नोंदवले. जशी अपेक्षा होती तसाच प्रतिसाद इंद्रधनुष्यच्या स्थळाला भेटू लागला. असे अनेक मुलींचे फोटो आई ही इंद्रधनुष्यला व्हॉट्सॲप करत असे पण इंद्रधनुष्य मात्र काहींना काही कारण काढून त्यातले एकही स्थळ पसंत करत नसे.
एके रात्री इंद्रधनुष्य भूतकाळातील आपल्या आठवणीत एकटाच रमला होता. अठ्ठावीस वर्षांचा इंद्रधनुष्य हळूहळू एक एक वर्ष मागे जात आपल्या जुन्या आठवणी जाग्या करत होता. त्याच्या लाईफमध्ये आलेल्या सहा स्त्रिया आणि त्याच्या बरोबरचा प्रणय आठवून तो मनोमन हसत होता. त्याला त्या शृंगारीक आठवणी जणू काही गुदगुल्या करत होत्या.
आठवणींचा प्रवास उलट्या दिशेने करता करता तो आपल्या ज्युनियर कॉलेजमधील दिवसात गुंतला. त्याला तो निरागस इंद्रधनुष्य आठवला ज्याला कोणतीही मुलगी घास घालत नव्हती. कोणतीच मुलगी ढुंकून सुद्धा बघत नव्हती. पण या सुमार वातावरणात त्याला आपल्या कॉलेजमधली जाई आवडत होती.
जाईला विचारण्याचे धाडस कदापि त्याला झाले नव्हते,यद्यपि त्याला जाई काही पटली नाही. जाईच्या मागे कॉलेजच्या मजनूची इतकी भली मोठी फौज होती की त्यात इंद्रधनुष्यला जाई पटली या पेक्षा तिची पातळी गाठणे सुद्धा अवघड होते.
त्या वेळी कमीत कमी एक प्रेयसी हवी या गरीब वातावरणातून त्याने आजतागायत सहा स्त्रियाचा उपभोग घेतला अशा श्रीमंतीत तो आता जगत होता. असो ते कॉलेजचे दिवस तो मागे सोडून तो आता आपल्या जीवनात चांगलाच रमला होता.
एक दिवस ऑफीसमध्ये काम करत असताना इंद्रधनुष्याच्या व्हॉट्सॲपची टोन ‘टिंग टिंग’ करून वाजू लागली. एकावर एक मेसेज येत होते म्हणून ‘टिंग टिंग टिंग’ काही थांबत नव्हती. इंद्रधनुष्यने हलकेच व्हॉट्सॲपचे नोटिफिकेशन पाहिले तर हा काही ऑफीशियल मेसेज नव्हता. तर हा मेसेज त्याला आपल्या आईकडून येत होता.
सकाळी सकाळी आई इतके मेसेज का पाठवत आहे. जणू काही दिवाळीत फराळ करण्यासाठी साहित्याची यादी पाठवत आहे असे एकावर एक मेसेज येत होते. शेवटी बारा ते पंधरा मेसेजनंतर ही मेसेजची आगगाडी थांबली. आधी इंद्रधनुष्यने दुर्लक्ष केले.
पण आई वडील असतात तेव्हा आपण नकळतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा आई वडील कायमचे आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा त्याच्या आठवणीने डोळे ओलवतात, मन व्याकूळ होते. असे दर रविवारी आपण व्हॉट्सॲपवर मेसेज वाचत असतो. त्यातून अल्प प्रमाणात असलेल्या ज्ञानातून इंद्रधनुष्य पालक साक्षर झाला होता. त्यामुळे आईच्या मेसेजकडे दुर्लक्ष न करता त्याने आईचे मेसेज पाहिले.
मेसेज पाहताच त्याला हसू आले कारण ते मेसेज नव्हते तर लग्नासाठी इच्छुक मुलीचे फोटो आणि बायोडेटा होते. त्या मेसेजची रांग पाहून त्याने कपाळाला हात लावला आणि त्याने आपल्या ऑफीस लॅपटॉपला अनलॉक करून ऑफीस कामात तोंड खुपसले.
संध्याकाळी आईने चांगलाच समाचार घेतला. आईने विचारले की तुला कोणती नक्की मुलगी आवडली? त्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. आईने त्याला वेगळ्या शब्दात खडसावून विचारले की तुला लग्न करायचे आहे की नाही? त्याने यावर पण काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा आईला कळून चुकले की या गाढवाने सकाळी पाठवलेल्या फोटोपैकी एकही फोटो पाहिला नाही. त्यावर त्याची आई चांगलीच रागवली पण या दगडावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही.
परिणाम तरी कसा होईल? कारण यांनी ऑलरेडी सहा फक्त स्त्रियांना नव्हे तर मादक स्त्रियांच्या पायाच्या तळव्यापासून त्यांच्या केसापर्यंत चांगलाच आस्वाद घेतला होता. भाबडी आई मात्र त्याच्या लग्नासाठी चिंतित होत होती. आई रूसली, आई रागवली, शेवटी आईच्या अति आग्रहामुळे त्याने रात्री झोपताना आपल्या मोबाईलमध्ये आईने पाठवलेले फोटो पाहू लागला.
पहिला फोटो पाहिला, नाक मुरडले, दुसरा फोटो पाहिला, नाक मुरडले, तिसरा फोटो पाहिला, मान नकारात्मक फिरवली, प्रत्येक फोटोत तो नाखूष होता. शेवटी तो शेवटच्या फोटो जवळ आला. तोही आवडणार नाही याची त्याला जाणीव होती पण तरी औपचारिकता म्हणून त्याने शेवटच्या फोटोवर क्लिक केले.
फोटो डाऊनलोड झाला आणि त्याच्या समोर उघड झाला. फोटो पाहताच त्याच्या तोंडातून कधी वा शब्द आला हेच त्याला कळले नाही. पुन्हा पुन्हा तो फोटो पाहत होता आणि प्रत्येक वेळी त्याच्या तोंडातून ‘छान, भारी’ असे शब्द येत होते. फोटो तसा ओळखीचा वाटत होता पण नीट आठवत नव्हते.
इतक्यात त्याने फोटो बरोबर असलेली बायोडेटाची पिडीएफ ओपन केली. ती वाचतच असताना त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य युक्त आनंद फुटू लागले. मुलीचे नाव जाई होते. ही तीच जाई होती जी त्याला कॉलेजमध्ये जीवापाड आवडत होती. त्या वेळी ढुंकून सुद्धा न पाहणारी मुलगी आज त्याच्यासाठी स्थळ म्हणून आले होते. जग हे गोल आहे हे पटवून देण्यासाठी यापेक्षा उत्तम उदाहरण कुठे सापडणार आहे.
दुसर्या दिवशी सकाळी आईने अपेक्षेप्रमाणे त्याला ‘त्या फोटोतील कोणती मुलगी आवडली?’ याबद्दल प्रश्नाचे रहाट लावले. त्याला जाई आवडली होती पण नेहमी नन्नाचा पाढा गिरवणारा आज अचानक कसा होकाराचा पाढा गिरवू लागला याबद्दल आईलाच नवल वाटेल म्हणून त्याने उघड उघड जाईचे नाव घेणे टाळले.
पण आईच्या प्रश्नांची सरबत्ती काही थांबत नव्हती. अशा वेळी आईच्या मनात जाई नावाची मेणबत्ती दिपवण्याची गरज होती. शेवटी त्याने नेहमीप्रमाणे आपण या कार्यक्रमात उत्साही नाही असा आविर्भाव आणून जाईच्या फोटोकडे बोट दाखवून सांगितले की ही त्यातल्या त्यात ठीक आहे. त्याचा दहा टक्के होकार पण आईसाठी गगनात आनंद मावण्यासाठी पुरेसा होता.
पुढे बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. जाईची फॅमिली तशी मोजकीच होती. तिचे आई, वडील, तिचा मोठा भाऊ आणि तिची वहिनी. असे पाच जणांचे कुटुंब. आज बघण्याच्या कार्यक्रमात जाई तशी खुश होती कारण तिचा भाऊ या कार्यक्रमात येणार नव्हता असे वाटले होते पण त्याने नागपूर मुंबईची फ्लाईट पकडून खास या कार्यक्रमासाठी तो मुंबई आला होता.
दादा हा नागपूरमध्ये कामाला होता. तीन ते चार महिन्यांतून एकदा खेप मारायचा. दादा आणि वहिनीचे लग्न होऊन तीन वर्ष झाले होते. वहिनी पण एखाद्या मोठ्या बहिणीसारखी तिला साथ द्यायची. असे कुटुंब भेटले असेल तर अजून काय हवे या जगात?
कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे यशस्वी पार पाडला. या कार्यक्रमात जाई खूपच लोभस दिसत होती. एक कांजीवरम जांभळ्या रंगाची साडी घालून ती खूप सुंदर दिसत होती. तिचा बांधा आता खूपच भरीव झाला होता. त्या जांभळ्या रंगाच्या साडीत सोनेरी किनार अजून चमक देत होती. तिच्या भरीव बांध्यात तिचे हाफ स्लिव्ह ब्लाऊज छान वाटत होते.
इंद्रधनुष्यच्या जीवनात अजूनपर्यंत आलेल्या सहा स्त्रिया आणि त्यांचा अनुभव हा त्याला स्त्री वाखणण्यासाठी पुरेसा होता. फक्त एका नजरेत त्याने जाईचा फिगर हा ३२ २८ ३४ आहे हे ओळखले. यात एक गोष्ट त्याच्या लक्षात आलीच नव्हती जी उशिरा का होईना आता लक्षात आली होती.
त्याच्या जीवनात ‘ता ना पि ही नि पा’ या अक्षरा वरून स्त्रिया आल्या होत्या. इंद्रधनुष्य पूर्ण होण्यासाठी अजून एक स्त्रीची गरज होती. ती पण जांभळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करणारी जा वरून नाव असणारी हवी. अशी स्त्री नियती स्वत:हून पाठवणार की आपण शोधायचे हेही प्रश्नचिन्ह.
पण या द्विधा मनस्थितीत त्याच्या समोर नियतीने कधी ही स्त्री पाठविली हे त्यालाच समजले नाही. गावात वळसा आणि काखेत कळसा यासारखेच काही होते. तिने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाची साडी त्याच्या डोळ्यात भरली. जा वरून जाई त्याला आवडली.
त्याच्या जा वरून स्त्री शोधण्याचा शोध अखेरीस इथे येऊन संपला होता. त्यामुळे नियतीने दिलेला हा इशारा टाळण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून त्याने लगेच या स्थळाला होकार दिला. या आधीच्या सहा स्त्रिया या वक्षस्थळ बघून होकार दिला होता आज मात्र हे स्थळ वधू मनासारखी आहे म्हणून या स्थळाला होकार दिला होता.