इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा वरून जाईमध्ये अडकला होता असे त्याला वाटत होते.
इकडे वहिनी तिला दररोज समजावत होती. जाईच्या दृष्टीने ती फक्त वहिनी नव्हती तर ती तिला मोठ्या बहिणीसारखी होती. गेल्या तीन वर्षात जेव्हा जेव्हा जाईला मदत हवी होती तेव्हा या वहिनीने तिला एखाद्या बहिणीसारखी मदत केली होती. आताही जाईचे लग्न जसे कोमेजून जात होते तेव्हा हीच वहिनी मदतीचा फवारा मारून तिला साथ देत होती.
सांगण्याचा उद्देश हाच की जाईचा भाऊ जरी त्या घरात उपस्थित नसला तरी भावाची जागा वहिनी अगदी मायेने भरून काढत होती. जाई आणि इंद्रधनुष्य मधला जो लग्नाचा ब्रिज तुटला होता तो तुटलेला ब्रिज जोडण्यासाठी वहिनी नावाचा आर्किटेक्ट कम इंजिनियर आला होता असे समजायला वावगे ठरणार नाही.
अखेर वहिनीच्या प्रयत्नाला यशाचे कुंकू दिसू लागले. वहिनीच्या समजावण्यामुळे जाईचा रोष ओसरू लागला. पुर्णतः नाही पण थोडा फार तिचा राग विरघळला. तिने आपल्या वहिनीला स्पष्ट बजावले की आता मी आणि त्याची थेट भेट होईल ती लग्नामध्ये. त्या आधी मी भेटणार नाही. वहिनीने पण सध्या तरी या प्रकरणात तिला जास्त फोर्स करायचे टाळले.
इकडे जेव्हा ही बातमी वहिनीने इंद्रधनूष्यला सांगितली, तेव्हा त्याच्या आनंदाला उधाण आले. त्याने त्याच आनंदात तिला पुन्हा कॉल केला. पण अजून तो ब्लॉकच होता. तरी पण त्याने वाईट वाटून घेतले नाही. आज बऱ्याच दिवसांनी थोडीशी का होईना प्रगती झाली होती. पण यात प्रमुख श्रेय वहिनीचे होते.
तो म्हणाला की वहिनी मला एकदा तिला भेटायचे आहे. भेटून तिचा राग पूर्ण नाहीसा करायचा आहे. त्यावर वहिनी बोलली की सध्या तरी तिला तुला भेटायचे नाही. थोडा तिला वेळ द्या. एकदा तिचा राग निवळला की भेट घालून देते. वहिनीचे शब्द आता त्याला भगवद गीतेसारखे ठाम आणि वंदनीय वाटू लागले होते.
एक-दोन दिवस गेले. इंद्रधनुष्य आपल्या कामात गढून गेला. लग्न जवळ येत होते तसे त्याच्या घरात सुद्धा लग्नाची तयारी जय्यत चालू होती. एके रात्री त्याला गुगल हँगआऊट चाटवर एका अनोळख्या व्यक्तीचा मेसेज आला.
त्या अकाउंटला कोणत्याही व्यक्तीचा फोटो नव्हता. तर डीपीमध्ये जाईच्या फुलांचा फोटो होता. त्याच्या मनात शंका आली की ही तर आपली जाई तर नाहीना.
त्याने साशंक होऊन विचारले की हू आर यु? तिकडून उत्तर आले की मी पंधरा दिवस तुझ्याशी बोलले नाही तर विसरला मला? त्याला हळूहळू कळत होते की ही जाईच आहे. पण तो आपल्या आनंदावर ताबा ठेवत होता. त्याने विचारले की नक्की सांगा तुम्ही कोण? त्यावर उत्तर आले की तू आपल्या जाईला विसरला?
इंद्रधनुष्यची शंका खरी ठरली. ती तर जाईच होती. पण मग जाई होती मग व्हॉट्सॲपवर का बोलत नाही. हे नवीन काहीतरी चाटचे खूळ कसे आले. जाउ दे, बहुतेक तिला पुन्हा दिलखुलासपणे बोलायला थोडे अवघड जात असेल म्हणून हा आड मार्ग अवलंबला असेल. कसेही असो, संवाद साधणं या वेळी महत्त्वाचे होते.
संवादाचे माध्यम सध्या तरी दुय्यमच होते. त्या रात्री रात्री दोन वाजेपर्यंत त्यांनी चाट केले. इंद्रधनुष्यने मनापासून माफी मागितली. तेव्हा तिनेच म्हटले की खरे तर मीच या प्रसंगावर ओव्हर रिॲक्ट झाली म्हणून माझ्याकडून सुद्धा सॉरी. आता इंद्रधनुष्यला वाटू लागले की आपली गाडी पुन्हा रुळावर आली.
पुढे तीन दिवस या चाटला उधाण आले होते. या तीन दिवसात ते एकमेकांशी चाटमार्फत खूप बोलले होते. त्याने एक-दोन वेळा तिच्याशी प्रत्यक्ष कॉलवर बोलण्यासाठी आग्रह धरला. पण व्यर्थ, तिने हुशारीने त्याची मागणी टाळली.
आता दोघेही त्या चाट मार्फत खूप समरस झाले होते. काही गोष्टी ज्या प्रत्यक्षात भेटून जमल्या नव्हत्या, त्या या चाटमध्ये अग्रेसर होऊ लागल्या. आता त्या चाटमधील संवादाला रोमँटिक दागिने ग्रहण होऊ लागले. त्या चाटमधील ऑनलाईन भावनेला सुद्धा मेहंदीचा रंग चढू लागला.
जिथे एका ऑफलाईन चुंबनामुळे इतके रामायण घडले होते तिथे आता ऑनलाईन प्रणयाच्या पहाटेचे तांबडे फुटू लागले होते. तांबडे फुटले तरी त्याला हा जांभळा रंग आता मानवत होता. त्याला हवा असलेला जांभळा रंग आता ऑनलाईन प्रकारात त्याचा झाला होता. फक्त आता तो ऑफलाइन प्रकारात खऱ्या खुऱ्या अर्थाने शिक्का मोर्तब होणे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले होते.
तीन दिवस चाट केल्यावर, त्यामध्ये काही शृंगाराचे लाजून संवाद झाल्यावर त्याने तिला लग्नाआधी एकदा भेटायला विनंती केली. ती नाही नाही म्हणत केव्हा हो बोलली हे तिलाही माहीत नाही पडले. हेच या शृंगाराचे नाविन्य म्हणावे की ज्यात आपला ताबा आपल्या हातून कधी निसटतो हे आपल्यालाच उमगत नाही.
दोघेही आता जमिनीपासून पाच इंच वर अधांतरी संचार करत होती. दोघांचे कोमेजलेले उसासे आता भरधाव वेगाने धावत होते. दोघांचे मूर्च्छित हास्य आता जिवंत झाले होते. त्याने तिला भेटण्यासाठी तयार केले होते. पण तिने कुठे कधी भेटायचे यासाठी मौन बाळगले होते.
त्या दिवशी गुरुवार होता. त्याने पुन्हा पुन्हा तिला भेटायला विनवण्या केल्या. शेवटी त्याच्या प्रेमाच्या विस्तवाची ठिणगी पेटली. तिने भेटण्यासाठी आधीच मंजूरी दिली होती. तिने सांगितले की उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारी संध्याकाळी आपला वीकएंड सुरू होईल तेव्हा निवांत भेटू. त्यालाही नाही बोलायला कुठेच जागा नव्हती.
तिने ऑफिस सुटले की थोडे उशिराच म्हणजे रात्री आठ वाजता वाशी स्टेशनवर बोलावले. त्याच्या चेहर्यावर अजून लकाकी आली. तिने पुन्हा बजावून सांगितले जर तुला उशीर झाला तर मी तिथे तुला न भेटता निघून जाईल. त्याने उशीर होणार नाही याची हमी तिला दिले.
मनात त्याने म्हटले की ही लग्नाआधीच मला किती हुकूम देऊ लागली. जाऊ दे तिचे दिवस आहेत. एकदा जवळ आली की मग मी बघतो. मग माझेच दिवस असतील आणि रात्र ही माझी असेल. पण तूर्तास ह्या तहात माघार घेणे गरजेचे होते त्यामुळे तिच्या बोलण्याला त्याने दुजोरा दिला.
शुक्रवारचे आठ कधी वाजतात असे इंद्रधनुष्याला झाले होते. तो ऑफिस मधून वेळेवर निघाला. काळजी घेतली की उशीर होणार नाही. तिने आठचा टाईमिंग दिला होता. पण जर तिने पहाटेचे पाचचा टाइम दिला असता, तरी तो आला असता. इतका तो या भेटीस अधीर झाला होता.
चक्क पंधरा मिनिटे आधी म्हणजे सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला तो वाशी स्टेशनवर सांगितलेल्या प्लॅटफॉर्मवर हजर होता. तिने त्याला वाशी स्टेशनवर तीन नंबर प्लॅटफॉर्मवर उभे राहायला सांगितले होते. अजून पंधरा मिनिटे होती.
स्टेशनवर अल्पवयीन मुले दहा रुपयात लिंबू, संत्री घेऊन विकायला बसली होती. त्यातला एक मुलगा त्याच्या जवळ आला आणि संत्री घ्यायला विनवणी करू लागला. पण आज तो संत्री नाही, तर स्त्री घेण्याच्या मनस्थितीत होता. आज तो लिंबू नाही तर तो त्याच्या जांभळ्या रंगाचे प्रतिक ठरणार्या स्त्रीला बेडवर एका लिंबाला पिळावे तसे त्याला तिचा चोळामोळा करायचा होता.
आठ वाजले तरी तिची काही चाहुल नाही. इंद्रधनुष्याला पुन्हा पुन्हा उशीर करू नको म्हणणार्या स्त्रीला आता स्वत:च उशीर होईल अशी चिन्हे दिसू लागली. पुन्हा त्याने मोबाईलवर टाइम चेक केला. आठ वाजून एक मिनिट वाजले. पण तिचा अद्याप काही मेसेज नव्हता. तो हताश झाला. तो त्या गुगल चाटवर मेसेज करत होता पण तिथून काहीच उत्तर येत नव्हते.
वेळ पुढे सरकत होता तसा त्याचा उत्साह हा निराशेत परावर्तित होत होता. त्याने कपाळावर हात लावला. बाजूने फेरीवाले संत्री घ्या संत्री घ्या असे मोठ्याने ओरडत होते. तो पुन्हा पुन्हा आपल्या मनाला सांगत होता की आज संत्री नको, आज स्त्री हवी. पण स्त्री आहे कुठे. तो जो जांभळा रंग शोधत होता तो आता रात्रीच्या काळ्याकुट्ट आभाळात दिसेनासा झाला होता.
संध्याकाळचे जांभळे आकाश आता काळ्या रंगात विलीन झाले होते. तो काळा रंग हा इंद्रधनुष्याच्या अपयशाला चिडवत होता. अखेर आठ वाजून सात मिनिटे झाले आणि तो हताश होऊन जागेवरून उठला. इतक्यात त्याला गुगल चाटवर मेसेज आला की डोन्ट वरी, आय ॲम कमिंग. तो मेसेज पाहून त्याच्या मेलेल्या आशा पल्लवित झाल्या. त्याने उत्तर दिले की ओके, टेक युअर टाइम. असा मेसेज करून त्याने आपली मनाची झालेली घालमेल लपवली.
आठ वाजून दहा मिनिटे झाली. एक सीएसटी वरून ट्रेन आली. ती तीन नंबर प्लॅटफॉर्म वर थांबली. त्याच्या आशा पुन्हा प्रफुल्लित झाल्या. नक्कीच या ट्रेन मधून आली असेल असे त्याने स्वत:ला आधार दिला. मधाच्या पोळ्यातून मधमाश्या बाहेर येतात, तसे प्रवासी त्या ट्रेन मधून बाहेर आले. त्या गर्दीतील प्रत्येक स्त्रीमध्ये तो आपली जाई शोधत होता. पर्यायाने तो जांभळा रंग शोधत होता.