आता माझ्या मेकअपमध्ये मला फक्त दागिन्यांची कमतरता जाणवत होती आणि जे वॉर्डरोबच्या वरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले होते. समोर झुकून मी दागिन्यांचा बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात माझ्या पायाची करंगळी ड्रेसिंग टेबलच्या कोपर्यावर आपटली.
“आउचऽऽ!!”
वेदनेने मी जोरात ओरडलो आणि पटकन पायाची बोटं पकडून बेडवर बसलो. मला रडू येत होते पण आता रडून मला माझा मेकअप खराब करायचा नव्हता. माझ्या वेदना लपवण्यासाठी मी माझे दोन्ही ओठ दाताखाली दाबून डोळे मिटले.
दोन मिनिटांनी मी पुन्हा उठलो आणि तो बॉक्स काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवला. मग मी वॉर्डरोबचा दुसरा ड्रॉवर उघडला. त्यात वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्यांचे अनेक बॉक्स ठेवले होते. त्यातील वर ठेवलेला बॉक्स घेऊन मी ड्रेसिंग टेबलच्या दिशेने निघालो.
तेवढ्यात माझा फोन वाजू लागला. आईचा फोन आला होता. पण फोन उचलायला मी घाबरत होतो, जणू साडी नेसून या रूपात मी आईला सामोरे जात आहे, असे मला वाटत होते.
भीती वाटणे साहजिकच होते. कारण तिचा लाडका मुलगा, ज्याच्यावर तिला गर्व आहे, तो एकांतात असे कृत्य करत होता, ज्यामुळे तिचे डोके शरमेने झुकले असते. साडी नेसलेल्या आपल्या तरूण मुलाला पदराने स्तन लपवताना पाहून कोणत्या आईला गर्व वाटेल?
पण मला फोन उचलावा लागला. फोन उचलला नाही म्हणजे आई आणि वहिनीची काळजी वाढली असती. मग उद्याच एक तर ती स्वतः मला भेटायला आली असती किंवा तिने दादाला पाठवले असते.
मी फोन उचलला आणि ड्रेसिंग टेबल जवळील स्टूलवर आरशासमोर बसलो.
“हॅलो, आई.”
“शेखर बेटा, तुझे कपडे धुतले आहेत. ये आणि घेऊन जा.”
“मी सोमवारी घ्यायला येईन, आई.”
“अरे, तू ऑफिसच्या कामात व्यस्त असशील तर मी रूपालीला पाठवते.”
“नको आई! वहिनीला उगाच कशाला त्रास?”
मग मी हळू आवाजात बोललो, “ती न आलेलीच बरी!”
“बरं, ठीक आहे, नाही पाठवत तिला. पण चार दिवस झालेत. तुझे बाकी कपडेही घाण झाले असतील. तू काय घालशील? तू आता काय घातले आहेस?”
आईने हे विचारताच, जणू तिने मला साडी नेसताना रंगेहाथ पकडले, असा धक्काच बसला.
या गोंधळात माझ्या साडीचा पदरही हातातून खाली पडला. माझ्या पदराला सावरत, आरशात स्वतःकडे बघत मी हळूच म्हणालो, “कपडे घातले आहेत, आई, आणखी काय घालणार?” आणि लाजून मी तोंडात बोट घातलं.
पण आईपासून काही लपवणे एवढे सोपे असते का?
“असा का बोलत आहेस? कुठे हरवला आहेस? कामात व्यस्त आहेस का, बेटा?”
मी मनात बोललो, “इश्श्य! आई तुला मी कसं सांगू की, मीही तुझ्यासारखीच साडी नेसली आहे आणि आपल्या साडीच्या पदराशी खेळण्यात हरवलो आहे.”
“काही नाही, आई, एका प्रोजेक्टवर काम करतोय.”
मी माझ्या आईशी कधीच खोटं बोलत नाही. पण मी तिला पुढे सांगूही शकलो नाही की, मी ज्या प्रोजेक्टवर काम करतोय, त्या प्रोजेक्टमध्ये मी स्वतः साडी नेसून एका स्त्रीची भूमिका करत आहे.
“ठीक आहे. तुला कपडे हवे असल्यास मला सांग. खूप घाणेरडे कपडे घालू नको. गरज पडल्यास नवीन अंडरवेअर बनियान घे.”
मी माझ्या साडीचा पदर आणि लांब केस हाताळत आरशासमोर उभा राहून म्हणालो, “हो आई, सांगेल.”
शहरात एकट्या राहणार्या आपल्या मुलाची काळजी आईने करणे योग्यच होते. तिला माहीत नव्हते की, गेल्या तीन-चार दिवसांपासून तिचा मुलगा फक्त मुलींचेच कपडे आहे, त्यामुळे त्याचे कपडे खराब होण्याचा प्रश्नच नव्हता.
तिला माहीत नव्हते की, तिचा तरूण मुलगा शरीराने पुरूष असला तरी मनाने तो एक स्त्री बनला आहे, जिच्याकडे डझनभर साड्या, ब्लाउज, परकर, नाईटी, सलवार कमीज आणि ओढण्या आहेत आणि त्याच्याकडे अंडरवेअर बनियान नसले तरी तो ब्रा पॅन्टी घालून आपले काम करेल.
आईने फोन कट केला. मी ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला दागिन्यांचा बॉक्स उघडला. मग त्यातून आठ पितळच्या बांगड्या काढल्या. मग त्यातील दोन-दोन बांगड्या मी माझ्या दोन्ही हाताच्या मनगटात घातल्या.
मग मी ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला बांगड्यांचा डबा उघडला. त्यातून माझ्या लाल लिपस्टिक, नेल पॅन्ट आणि ब्लाउजच्या रंगाशी जुळणार्या दोन डझन लाल काचेच्या बांगड्या काढल्या.
हळू हळू मी माझ्या दोन्ही मनगटात प्रत्येकी एक डझन बांगड्या घातल्या आणि शेवटी उरलेल्या दोन-दोन पितळच्या बांगड्या घातल्या. अशाप्रकारे प्रत्येक मनगटात ४ पितळच्या बांगड्या आणि १२ काचेच्या लाल बांगड्या घातल्याने, माझे मनगट वजनामुळे आपोआप खाली वाकले.
आत्तापर्यंत माझे नटणे शांततेत चालू होते. पण आता माझ्या शरीराची किंचितशी हालचाल होताच संपूर्ण रूम माझ्या हातातल्या बांगड्यांच्या किणकिणने गुंजू लागली.
ही खरंच एक सुंदर अनुभूती होती. जेव्हा मी माझ्या चेहर्यावरील बटा हाताने माझ्या कानामागे करायचो, तेव्हा कानाजवळ माझ्या हातातील बांगड्यांचा होणारा आवाज माझ्या हृदयात आणि मनात गुंजायचा.
आता जर या अवस्थेत जर मला कोणी, ‘हातात बांगड्या घालणारा हा कसला पुरूष आहे? हा तर नपुंसक आहे!’ असे जरी म्हणले, तरी मला या गोष्टीचे बिलकुल वाईट वाटणार नाही.
ज्या पुरूषांना आपले पुरूषत्व दाखवता येत नाही, त्यांना लोक नेहमीच टोमणा मारतात की, ‘तू पुरूष नाहीस, बांगड्या घाल.’ पण मी एक पुरूष असूनही स्त्री रूप धारण केल्यावर मला बांगड्या घालण्यात मजा यायची. यात मला कुठलाही अपमान वाटायचा नाही.
माझे मनगट एखाद्या मुलीसारखे किंवा त्यापेक्षा खूप नाजूक आहेत. एकदा मस्करीत वहिनीने माझे मनगट घट्ट पकडले होते, तेव्हा मला सोडवणे खूप कठीण झाले होते. जेव्हा मी रडायला लागलो, तेव्हा कुठे तिने सोडले होते.
माझे गोरे, सडपातळ, गुळगुळीत आणि नाजूक मनगट बांगड्या घालून अतिशय आकर्षक दिसत होते. जणू त्या बांगड्या याच मनगटासाठी बनविल्या गेल्या आहेत, असे वाटत होते.
एक पुरूष म्हणून मला माझे मनगट दाखवायला लाज वाटते, त्यामुळे मी नेहमी लांब बाह्यांचे सैल टी-शर्ट घालतो. पण आता मनगटात बांगड्या घातल्यावर मला लाज वाटण्या ऐवजी अभिमान वाटत आहे.
तेवढ्यात मला काहीतरी आठवले आणि मी घाईघाईने वॉर्डरोबच्या उघड्या ड्रॉवरकडे गेलो आणि एका कोपर्यात ठेवलेले टिकल्याचे पाकिट उचलले.
मग त्या पाकिटातून एक मध्यम आकाराची गोल लाल रंगाची टिकली काढून आरशासमोर आले आणि आरशात पाहत ती टिकली माझ्या कपाळावर लावली.
तेवढ्यात पुन्हा फोन वाजला आणि स्वतःला आरशात पाहण्यापूर्वीच फोनच्या स्क्रीनवरील नाव पाहून माझ्या हृदयात धडकी भरली.
माझे हृदयाचे ठोके अनेक पटींनी वाढले, श्वास वेगवान झाला, हात थरथरू लागले, अंगाला घाम फुटला आणि मी फक्त चिंताग्रस्त चेहर्याने फोनच्या स्क्रीनकडे पाहू लागलो. मला फोन उचलण्याचे धाडस होत नव्हते.
(क्रमशः)