इयत्ता आठवीनंतर, ऊन्हाळ्याच्या सुट्ट्यांत, मला क्रिकेटचे प्रचंड वेड लागले आणि मला महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टाईल भावली. त्याच्यासारखं दिसावं म्हणून मी माझे केस सुद्धा वाढवले.
माझा चेहरा माझ्या शरीरापेक्षा लहान होता. लांब केसांनी तो थोडा भरलेला आणि आकर्षक दिसत होता. त्यात मी पण लहानपणापासून थोडा लठ्ठ आणि गुबगुबीत होतो. मी क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा बारीक होण्याचे भूत माझ्या डोक्यात शिरले आणि मी डायटिंग सुरू केली.
काही महिन्यांतच माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले आणि मी बारीक झालो. पण माझ्या शरीराच्या तुलनेत माझा चेहरा नेहमीच लहान होता. आता तो आणखी लहान वाटू लागला. डायटिंगमुळे माझे वजन कमी झाले. परंतु, माझ्या नितंबांवरची आणि मांड्यांवरची चरबी फारशी कमी झाली नाही. याउलट, छातीवर जमा झालेली चरबी आता लोंबकळू लागली.
डाएट फॉलो केल्यामुळे क्रिकेट खेळताना शरीरात तेवढी ताकदही जाणवत नव्हती. चालताना माझे मोठे नितंब हलायचे आणि धावताना छातीवरील चरबी वर खाली व्हायची.
गोरा रंग, लहान चेहरा, काळे डोळे, लांब केस आणि शरीराचा असा घाटदार आकार पाहून सगळे मुलं, मला ‘मुलगी’ म्हणू लागले. पण हे सगळं मला कळायला फार वेळ लागला.
सुरूवातीला मी खेळायला जायचो तेव्हा ते माझ्याकडे पाहून फक्त हसायचे आणि मीही हसत हसत पुढे जायचो. ते हसतमुखाने माझे स्वागत करताय, असे मला वाटत होते.
मग हळूहळू ते हसताना काहीतरी कुजबुजायला लागले आणि माझी मजाही घेऊ लागले, तेव्हा मला विचित्र वाटले. कारण ते माझ्याबद्दल काय बोलताय? हे मला कळत नव्हते.
एकदा मी क्रिकेटचा सराव करून घरी आलो होतो. तेव्हा मी डोक्याला रूमाल बांधलेला होता. अचानक दरवाजावर काही आवाज आला, मी माझ्या हातात बॅट घेऊन दरवाजा उघडला.
माझ्या भावाचा एक मित्र त्याच्या मित्रासोबत उभा होता. त्याने भावाबद्दल विचारले. मी त्यांना उत्तर दिले आणि दार बंद केले. तेवढ्यात त्यांचे संभाषण माझ्या कानावर पडले.
“ही मुलगी होती ना?”
“नाही रे, तो मुलगा आहे.”
“नाही रे. तसं वाटत नाही. मला वाटते, ती मुलगी आहे आणि मुलांसारखी राहते.”
“अरे, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला धोनीचे वेड लागले म्हणून त्याने केस वाढवले आहेत. बाकी त्याचा आवाज फक्त मुलींसारखा आहे.”
मला कोणी मुलगी म्हणण्याची ती पहिलीच वेळ होती. मला या गोष्टीचा खूप राग आला.
दुसर्या दिवशी मी मैदानावर गेलो, तेव्हा मुले हसत होती. मी पुढे गेल्यावर मुले पुन्हा जल्लोष करायला लागली. आता मला शंका आली की, तेही मला ‘मुलगी’ तर नाही म्हणत?
माझे दोन चांगले मित्र होते ज्यांच्याशी मी नेहमी बोलायचो. एके दिवशी मी असाच त्या दोन मित्रांसोबत उभा होतो. तेव्हा एक मित्र मला म्हणाला,
“शेखर, तू खूप मेहनत करतोस आणि पथ्य पाळतोस. तसा चांगलाच बारीक झाला आहेस पण तुझी अजूनही खूप मोठी आहे.” असे म्हणत त्याने माझ्या नितंबांकडे इशारा केला.
“हे होय? होईल हळूहळू. उद्यापासून मी धावण्याबरोबरच स्किपिंग करायला सुरूवात करेन.”
त्या दिवशी माझ्या शरीरात काहीतरी चुकीचं असल्याचं, मला पहिल्यांदाच जाणवलं. मग मला भावाच्या मित्रांचे संभाषण आठवले. त्या दिवशी मी डोक्याला रूमाल बांधलेला होता. त्यामुळे माझ्या लांब केसांमुळे नाही, तर माझे नितंब मुलींसारखे दिसतात, म्हणून त्याने मला मुलगी समजले, याची मला जाणीव झाली.
एके दिवशी ग्राउंडवर मुलांचा घोळका जमलेला होता. त्या घोळक्यात माझा विषय चालू असल्याचे मला जाणवले म्हणून मी त्यांना विचारले, “तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय?”
सगळे एकमेकांकडे पाहत सांगायला टाळू लागले. त्यातला एक मुलगा, जो माझा सिनियर होता, तो मला म्हणाला, “रजत तुला ‘छक्का’ म्हणाला.”
तेव्हा मला त्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. म्हणून मी त्याला विचारलं, “म्हणजे काय?”
तो हसला आणि काहीच बोलला नाही. मी आग्रह केला तेव्हा तो म्हणाला, “तो तुझी स्तुती करतोय.”
यावर मी हसत त्याला म्हणालो, “मी असं काय केलं की, ज्याची प्रशंसा व्हावी?”
ते सगळे पुन्हा बोलू लागले आणि मी तिथून निघालो.
कदाचित मी त्यांना विचारायला नको होते किंवा विचारण्याआधी मला त्या शब्दाचा अर्थ माहीत हवा होता. कारण ‘छक्का’ हा शब्द मी जितक्या सहजतेने स्वीकारला होता, तितक्याच गंभीरपणे बाकी मुलांनी तो माझ्यावर लादला होता.
काही दिवसांनी मी ग्राउंडवर आलो की आता हसण्यासोबतच ते मुले मला पाहून टाळ्या वाजवायचे. मी जेव्हा त्यांच्याकडे बघायचो, तेव्हा ते गप्प व्हायचे आणि मी मन वळवली की, पुन्हा सुरू व्हायचे. शेवटी वैतागून मी क्रिकेट खेळणे बंद केले.
माझ्या मांड्या आणि कंबरेच्या चरबीमुळे माझे चालणे देखील मुलीसारखे झाले होते. कॉलनीतील टवाळ मुलं वाटेत माझी छेड काढू लागली. त्यामुळे मी खिशात हात घालून चालायला सुरूवात केली.
मग मी मांड्या आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम सुरू केला. काही आठवड्यात माझी चाल सुधारली पण चेहरा आणि डोळे अजूनही मुलींसारखे होते.
एकदा मी माझ्या एका शूज घेण्यासाठी बाजारात गेलो होतो. मी जीन्स, टी-शर्ट आणि स्वेटर घातलेले होते. माझे केस लांब होते पण डोक्यावर टोपी घातलेली होती.
शूज विकत घेऊन मी दुकानातून बाहेर पडलो, तेव्हा ज्या सेल्समनने मला शूज दिले होते, त्याला दुसर्या एका सेल्समनने विचारले, “ती मुलगी होती ना?”
त्यावर पहिला सेल्समन म्हणाला, “नाही रे, तो मुलगा आहे, नेहमी आपल्याकडेच येतो शूज घ्यायला. “
पहिला सेल्समन म्हणाला, “अरे, मला तर त्याच्या चेहर्यावरून तो मुलगीच वाटला.”
एके दिवशी, दुपारच्या वेळी मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होते. त्याचे आईवडील घरी नव्हते. दुपारी टीव्ही बघून कंटाळा आला होता. तो काही वेळाने उठला आणि वडिलांनी लपवून ठेवलेली दारूची बाटली घेऊन आला.
मग त्याने ती ग्लासात ओतली आणि मला प्यायला विचारले. मी त्याला स्पष्ट नकार दिला.
दारूचे दोन पेग पिल्यावर तो मला म्हणाला, “शेखर, आज घरी आ पण दोघेच आहोत. चल ना, थोडी मजा करू.”
“मजा? कसली मजा?” मी आश्चर्याने विचारले.
“अरे, तू मुलीसारखा दिसतो तर मुल-मुली करतात ती मजा करू.”
मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. कदाचित त्याला दारू चढली होती आणि नशेत बडबडत होता.
पण मग तो माझ्या जवळ आला आणि माझ्या छातीवर हात ठेवून ती दाबू लागला, तेव्हा मला खूप विचित्र वाटले आणि मी निघून माझ्या घरी आलो.
दुसर्या दिवशी मला तो भेटला तेव्हा त्याने माझी माफी मागितली. पण मी त्याच्यासोबत बोलायचे कायमचे बंद केले आणि एकटा राहू लागलो.
(क्रमशः)