मी श्रेयाला या आधीही अनेक वेळा माझ्या क्रॉस ड्रेसिंगच्या छंदाबद्दल सांगितले होते. पण तिने माझ्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. तुझ्यासारखा देखणा मुलगा कधीच मुलींचे कपडे घालू शकत नाही, असे बोलून ती नेहमी विषय टाळायची.
पण त्या वेळी तिला माझ्या फोनमधील माझे स्त्री रूपातील फोटो दाखवून, माझे म्हणणे खरे आहे, असे पटवून द्यायची माझी कधीही हिंमत झाली नाही. कदाचित, सत्य कळल्यावर ती माझा तिरस्कार करेल किंवा मला सोडून जाईल, या भीतीने मी तिला कधीही सत्य सांगू शकलो नाही.
पण त्यामुळे ‘शिखा’ नावाची माझी कोणी नवीन मैत्रीण आहे आणि मी तिच्यापासून तिला लपवत आहे, अशी तिला शंका आली. शेवटी, तिची शंका दूर व्हावी म्हणून फक्त तिला चिडवण्यासाठी मी ही खोटी कथा रचली होती, असं सांगितलं.
त्यानंतर सर्व काही ठीक झाले. श्रेयाला माझ्यावर पूर्ण विश्वास होता की, मी तिची फसवणूक करणार नाही. त्यामुळे ती बर्याचदा ‘शिखा’ नाव घेऊन माझी मस्करी करायची आणि मला चिडवायची.
त्या दिवशीही ती मला चिडवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर येण्यास सांगत होती. तिला वाटले मी मस्करी करत आहे.
“मला या रूपात व्हिडिओ कॉलवर येण्याची लाज वाटते.”
“प्लीज ना जानू, फक्त एकदा?” श्रेयाने हट्ट केला.
तिच्या हट्टीपणाने माझ्या चेहर्यावर हसू आले आणि मी किंचित कोमल स्वरात म्हणालो, “मी फोन कट करेन आता. फालतू बोलू नकोस.”
“जा मग, कट्टी! मला पण तुझ्याशी बोलायचं नाहिये.”
“ठीक आहे. बाय.” मी चिडून म्हणालो.
“अरे, एवढा काय मनावर घेतोस.” ती गंभीर होऊन म्हणाली.
“तू फालतू बोलत आहेस म्हणून.” मी चिडून म्हणालो.
“अरे बाबा, ऐक तर.” ती किंचित हट्टी स्वरात म्हणाली.
“हो, मॅडम, तुम्ही बोला तर.”
मी जरा आत्मविश्वासाने बोललो. पण तेवढ्यात माझी नजर आरशाकडे गेली. जणू एखादी सुंदर मुलगी पुरूषाचा अभिनय करत आहे, असे वाटत होते.
“तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मला सांग तू फ्लॅटवर आहेस ना?”
“काय सरप्राईज आहे?”
“आधी तू सांग.” श्रेया प्रेमाने आग्रह करत म्हणाली.
“नाही! मी घरी आलो आहे!” मीही खोडकरपणे हसत उत्तर दिले.
आता माझी अस्वस्थता पूर्णपणे दूर झाली होती. एकीकडे मी आरशात माझे सुंदर स्त्री रूप पाहत होतो आणि दुसरीकडे मी माझ्या मैत्रिणीशी पुरूषासारखा बोलत होतो. त्या वेळी मी स्त्री आणि पुरूष दोघेही एकाच वेळी, एका शरीरात होतो.
पण हा अनुभव खूप खास होता. कारण नेहमी असं होतं की, शिखा माझ्या मनात होती आणि शरीर शेखरचं होतं. पण त्या दिवशी दोघांनीही आपापल्या जागा बदलल्या होत्या. शरीर शिखाच्या ताब्यात होते तर शेखरने मनावर ताबा मिळवला होता.
“अरे, सांग ना कुठे आहेस? तुला माझी शपथ!”
“अग मी फ्लॅटवरच आहे.”
श्रेयाची शपथ मी कधीच मोडली नाही, म्हणून मी खरं बोललो.
“आता सरप्राईज सांग.”
“सरप्राईज सांगायचे थोडीच असतं?” श्रेया खोडकरपणे म्हणाली.
“अग, काही हिंट तरी दे.”
“कळेल लवकरच. आता बाय.”
“ठीक आहे बाय.” मी निराश स्वरात म्हणालो.
“आणि हो, साडी नेसून कुठे बाहेर जाऊ नकोस. कोणा टपोरीने रस्त्यात तुझी छेड काढली, तर मी नसेल तुला वाचवायला.”
श्रेयाने हसत हसत फोन कट केला.
मी फोन बाजूला ठेवला आणि उभा राहून चालत आरशाजवळ गेलो. आता श्रेयाशी बोलण्या आधीची माझी चाल, माझी वागणूक, माझे हावभाव आणि माझ्या चेहर्यावरील सुंदर स्त्री असल्याचा अभिमान, सर्व काही नाहीसे झाले होते.
आता माझ्या चेहर्यावर तसेच भाव होते, जसे काही वेळेपूर्वी, जेव्हा मी माझ्या पुरूष रूपात असताना साडी नेसण्याचा विचार करताना, माझ्या घाबरलेल्या चेहर्यावर होते. आता माझे शरीर शिखाचे होते पण मन शेखरने काबीज केले होते.
मनात कितीतरी विचार असताना मी घड्याळाकडे नजर टाकली. आता माझ्याकडे खूप वेळ नव्हता. घाईघाईने मी दागिन्यांचा डबा उघडला आणि त्यातून झुमके काढून कानात घातले.
झुमके वजनाने जड होते. त्यामुळे माझ्या कानावर दाब वाढला आणि ते लटकायला लागले. झुमक्यांचा जडपणा मला माझ्या कानावरच नाही तर चेहर्यावरही जाणवत होता.
आता मला इतक्या सहजासहजी माझं डोकं फिरवता येत नव्हतं. कारण मी थोडंसं डोकं हलवलं तरी कानातले झुमके घंटीसारखे हलायचे.
मला असे झुमके घालायला नेहमीच आवडायचे. जेव्हा मी ते घालायचो, तेव्हा मला वाटायचे की, स्त्रिया काय काय सहन करतात, याची पुरूष कल्पनाही करू शकत नाही. पण मी तो भाग्यवान पुरूष होतो, ज्याने केवळ कल्पनाच केली नाही तर त्या कानातल्या झुमक्यांचे वजनही जाणवले.
कानातल्या झुमक्यांचं वजन सांभाळणं अवघड होतं. जेव्हा डोके हलायचे, तेव्हा त्यांचा माझ्या गालाला स्पर्श झाला व्हायचा आणि अंगावर शहारा यायचा.
झुमक्यांचा जडपणा मला पुन्हा एक स्त्री असण्याची पूर्ण जाणीव करून देत असे. त्यामुळे ते कितीही जड असले तरी मला कधी त्यांना काढावेसे वाटले नाही.
मी आता पूर्णपणे तयार झालो होतो. आता मी आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले. नाभीपर्यंत लांब काळे केस, कपाळावर लाल टिकली, काजळ घातलेले डोळे, लाल रसाळ ओठ आणि कानात मोठे सोनेरी झुमके, यामुळे माझा चेहरा पूर्वीपेक्षा गोंडस दिसत होता.
काही वेळेपूर्वी मी स्वतःला टिकली आणि झुमक्यांशिवाय पाहिले होते. पण आता माझे सौंदर्य अनेक पटींनी वाढले होते.
“चेहर्यावरून खाली नजर जाताना हिरव्या साडीच्या अर्धपारदर्शक पदरावरून, लाल ब्लाउजमधून बाहेर डोकावणारे माझे गुबगुबीत सौंदर्य पाहून कोणत्याही खर्या पुरूषाला भुरळ पाडू शकते.” मी स्वतःशीच पुटपुटलो, “कोणत्याही खर्या पुरूषाला! खरा पुरूष म्हणजे माझ्यासारखा नाही!” आणि लाजून माझी नजर खाली झुकवली.
अर्धपारदर्शक साडीतून दिसणारी माझी बारीक कंबर आणि नाभी, तसेच स्लीव्हलेस ब्लाउजमधून दिसणारे लाल बांगड्यांनी सजलेले माझे नाजूक हात सांगत होते की, मी उच्च समाजातील एक अविवाहित मुलगी आहे, जी लवकरच लग्न करणार आहे.
साडीच्या निर्याही चांगल्या बनल्या होत्या. सर्व काही परिपूर्ण होते. देवाने मला इतके नाजूक शरीर बहुधा या दिवसासाठीच दिले असावे. पण ज्या देवाने मला निर्माण केले, आता तोही मी पुरूष आहे की स्त्री, हे सांगू शकत नाही.
(क्रमशः)